डॉ श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या माझे बी.एड चालू आहे. माझे एम.एस्सी झाले आहे. तरी पुढे मी रोजगार मिळवण्यासाठी काय करू? – प्राची रोडे

तुझा एमएस्सीचा विषय कळवलेला नाही. त्यामुळे उत्तराला खूप मर्यादा येतात. बीएड पूर्ण झाले तरी नोकरीची शाश्वती अजिबात नाही, हे तू लक्षात घेतलेले नाहीस. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रीतसर भरती करण्याऐवजी घड्याळी तासावर अशा शिक्षकांना व लेक्चररना कामाला ठेवले जाते. ही गेल्या पंधरा वर्षाची परंपरा आहे. क्वचितच यातील काहींना कायमस्वरूपी नोकरी मिळते. त्याचे आर्थिक गणित सर्वांना माहिती आहे. तरीही भाबडेपणे बीएड करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. म्हणून लोकसत्तेच्या माध्यमातून अनेक वाचकांसाठी हे कटू वास्तव पुन्हा लिहीत आहे. तुझ्या विषयातील शिकवण्या करायला सुरुवात करणे हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आठवी नववी प्रथम, मग दहावी व जमल्यास अकरावी बारावी साठीची एखाद्या मोठ्या क्लासमध्ये मिळणारी नोकरीची संधी शोधणे हा तुझ्यासाठी चा राजरस्ता राहील. केमिस्ट्री वा फिजिक्स हे दोन विषय असल्यास त्या संदर्भातील काम करणाऱ्या एखाद्या उत्पादन संस्थेमध्ये नोकरीची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Success Story: हातात फक्त १०० रुपये, पण मेहनतीच्या जोरावर उभी केली ११,५०० करोडोंची कंपनी अन् झाले शाहरुख खानचे शेजारी

मी राज्यशास्त्र विषयातून ६५ गुण घेऊन यावर्षी बीए उत्तीर्ण झालो आहे. यूपीएससी द्यायची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात एमए किंवा एमबीए करण्याचा पर्याय आहे. कोणता पर्याय निवडावा? मला दहावीत ९४ व बारावीत (विज्ञान) ९७ गुण होते. – चैतन्य

एमबीए करावे हे सगळ्यात उत्तम. कारण एमए केले व यूपीएस्सी उत्तीर्ण नाही झालास तर नोकरी मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. मात्र एमबीएचा सर्व अभ्यासक्रम इंग्रजीतून असतो व त्यासाठी तुला माहीत नसलेले अनेक विषय शिकावे लागतात याची संपूर्ण माहिती घेऊन प्रवेश घ्यावा. मला पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तुला सोडवायचे आहे. दहावी बारावीचे मार्क यांचा पदवीच्या मार्काशी सुतराम संदर्भ मला दिसत नाही. एम ए किंवा एमबीए करताना सीजीपीए साडेआठच्या पुढे लागेल याची तुला आठवण करून देतो. ते पूर्ण होईल तोवर रोज अर्धा ते एक तास यूपीएससीचा प्राथमिक अभ्यास चालू ठेव.

मी सध्या विधी महाविद्यालयाच्या पाचव्या वर्षात शिकत असून मला गेल्या वर्षी ६० गुण मिळाले. मला इकॉनमिक्स, फायनान्स, बिझनेस स्टडी यामध्ये रस आहे. त्या अभ्यासक्रमात गुण ही चांगले मिळतात, व्यावहारिक ज्ञान ही चांगले आहे. माझे व्यक्तिमत्त्व हे न्यायालयीन सरावास जुळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करावे की मी पुढे बँकिंग परीक्षेसाठी तयारी करावी का? एमबीए फायनान्स करावे? की कॉर्पोरेट लॉयरसाठी प्रयत्न करावे?

कार्तिकी खरोटे कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यात काम करण्याची इच्छा नाही असे तुझे एक वाक्य आहे व शेवटी कार्पोरेट लॉयर म्हणून काम करण्याबद्दलची विचारणा तू करते आहेस. या दोन्हीचा अर्थ तुलाच नीट लावायचा आहे. मला कळले ते एवढेच की कॉर्पोरेट लॉयरचा पगार तुला आकर्षित करत आहे. पण ते काम मिळणे, व त्यात मन लावून काम करणे इतके सोपे नाही. हे पदवी हातात आल्यावर तुझ्या लक्षात येईल. मुंबईतील परळ येथील एखाद्या नवीन काम सुरू केलेल्या कार्पोरेट लॉयरला भेटून या प्रकाराची संपूर्ण माहिती घ्यावीस. दुसरा तुझा प्रश्न एमबीएचा आहे. उत्तम संस्थेतील एमबीएच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असते. त्या प्रवेश परीक्षेतील गणित हा विषय तुला पाच वर्षाच्या कायद्याच्या अभ्यासातील गॅप नंतर कितपत जमतो याचा अंदाज घ्यायचा आहे. या स्पर्धेत तुझ्याबरोबर सर्व इंजिनीअर्स असतील व त्यांचे गणित लखलखीत असेल याची कल्पना देऊन ठेवतो. एमबीए फायनान्स रस्ता तुला आवडत असलेल्या विषयातून सुरू होतो मात्र खऱ्या अर्थाने फायनान्स या विषयातील कामाला पाच वर्षाच्या अनुभवानंतर सुरुवात होते. तोपर्यंत प्रशिक्षण व अनुभव यातून जाण्यासाठी वेळ लागतो. बीकॉम झाल्यानंतर मला फायनान्स आवडते असे म्हणणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा नोकरीच्या सुरुवातीलाच भ्रमनिरास होतो याचा तुझ्या निमित्ताने उल्लेख करून येथे थांबतो. बँकेच्या परीक्षा हा तुझा रस्ता नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70
Show comments