डॉ श्रीराम गीत
बारावीनंतर ३ वर्षे स्थापत्य अभियांत्रिकी करत असताना पहिल्यावर्षी ६ विषयांसह नापास झालो आणि मग पुढचे २ वर्ष राहिलेले विषय पास होण्यासाठी घरी बसूनच प्रयत्न केले. शेवटी बी एस्सी केमिस्ट्री या पदवी ला प्रवेश घेऊन ६१.३७ एवढ्या गुणांसह ४ वर्षांमध्ये पदवी पूर्ण केली. या दरम्यान पदवी नंतर करोना काळामध्ये घरी मेडिकल असल्याने डिप्लोमा इन फार्मसी ची पदविका पूर्ण केली. त्यांनतर एक वर्ष अभ्यासामध्ये खंड पडला. तरीही या दरम्यान होईल तेवढा अभ्यास करून काही सरळसेवेच्या परीक्षा दिल्या असता त्यांचा निकाल अपेक्षेपेक्षा जास्त आल्याने (१४२/२००) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास गांभीर्याने सुरू केला. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासह पदव्युत्तर पदवी पूर्ण करावी म्हणून बी.एड. आणि कायदा या पदव्यांचा प्रवेश परीक्षा दिल्या आहेत. यासह वय वर्षे २८ पूर्ण होत असल्याने त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावे. – चंद्रा
आपल्या हातात कायद्याची पदवी नाही. त्याला तीन साल शिकावे लागेल. बी.एड.चा नोकरीला उपयोग नाही. एमपीएससी कोण, कधी, केव्हा पास होईल सांगता येणार नाही. यापेक्षा तुमच्या हातात त्यासाठी चार ते पाच वर्षे आहेत त्यावर विचार करावा. माझ्या दृष्टीने तुमचे वय २८ आहे. कोणते काम करून दरमहा स्वत:ची रोजी रोटी कमवायला सुरुवात कशी करणार यावर नीट विचार करावा. हातात असलेल्या फार्मसी पदविकेचा उपयोग करून त्यातून काही मार्ग निघू शकतो. प्रथम अर्थार्जन मग एमपीएससी असा मार्ग स्वीकारल्यास अभ्यास नीट होईल व यश मिळेल.
मला दहावीला ९५.८० तर बारावीला ९१.८३ गुण आहेत. मला यूपीएससी करायचे आहे. मी बी.ए. करत आहे. मला नेमकी सुरुवात कुठून व कशी करावी हे कळत नाही.
– राजेश गायकवाड
हेही वाचा >>> नोकरीची संधी : स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती
किमान ८० मार्क मिळवून आधी बीए. त्यानंतर एमए करत असताना यूपीएससीचा अभ्यास अशी तुझी वाटचाल योग्य राहील. तोपर्यंत करिअर वृत्तांतचे वाचन त्याची कात्रणे कापून ठेवणे, कॉलेजच्या गटचर्चा मध्ये भाग घेणे, वृत्तपत्रातील अग्रलेख वाचून त्यावर स्वत:च्या टिप्पणी करण्याचा प्रयत्न सुरू करणे हीच तयारी राहील. येत्या दोन अडीच वर्षांत पाचवी ते बारावी शास्त्र विषयाची एनसीईआरटीची पुस्तके वाचून काढावीस. यावर आधारित पूर्व परीक्षेत अनेक प्रश्न येतात.
मी स्वत: फक्त १२ वी पर्यंत शिकलो आहे. मला माझ्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासंबंधी मार्गदर्शन करावे ही विनंती. माझी मुलगी सध्या १० वी – सीबीएसई बोर्डाला आहे. तिची इच्छा मायक्रोबायोलॉजी विषय शिकण्याची आहे. त्याविषयी आमच्या खालीलप्रमाणे शंका आहेत… त्या म्हणजे १. सर्व महाविद्यालयातून हा विषय शिकता येईल का? २. त्यासाठी नीट/सीईटी द्यावी लागते का? ३. या विषयातील पदवी नंतर नोकरी / व्यावसायिक संधी कशा असतील?
– प्रवीण मधुकर अहिरे, बोईसर, जिल्हा पालघर.
मायक्रोबायोलॉजीत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर चांगल्या संधी उपलब्ध होतात. यासाठी प्रथम बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तीन विषय घेऊन किमान ७० टक्के मार्क मिळवण्याचे उद्दिष्ट मुलीने ठेवावे. स्वायत्त कॉलेज प्रवेशासाठी कॉलेज प्रवेश परीक्षा घेतात. अन्यथा बाकी सर्व शास्त्र महाविद्यालयातून बहुतेक मोठ्या शहरात मायक्रोबायोलॉजी शिकता येते. रुग्णालये, पॅथॉलॉजी तपासण्या केंद्रे, औषध निर्माण कंपन्या व संशोधन संस्था यात काम मिळते. प्रगती यथावकाश होत जाते. आपल्या मुलीने जमल्यास गणित हा विषय बारावीपर्यंत ठेवावा अशी मी सूचना करत आहे. मायक्रोबायोलॉजीचा विचार बदलल्यास त्यासाठी तिला उपयोग होऊ शकेल. मी दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता येत्या तीन वर्षात मायक्रोबायोलॉजी मास्टर्स करून काम करणाऱ्या कोणत्याही २५ वर्षांच्या मुलीचा शोध घ्यावा व तिच्याकडून सगळी माहिती सविस्तर ऐकून घ्यावी, मग निर्णय मुलीचा.
माझे २०२२ ला कृषी पदवी झाली. मी पदवीच्या शेवटच्या वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करत आहे. मी तांत्रिकी कृषी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षा दिली पण काही मार्कानी राहून गेली. आता अभ्यास सुरूच आहे. पण कृषीमध्ये पदे नाहीत. म्हणून मग सरळसेवा देणार आहे. अभ्यास कसा करायचा? मदत करा. – क्षितिजा नितळे
हातात छानशी पदवी असून गेली दोन वर्षे तू स्पर्धा परीक्षेच्या मृगजळामागे धावत आहेस ते प्रथम थांबव. अॅग्रो मार्केटिंग मध्ये मिळेल त्या नोकरीला सुरुवात कर. ती करताना एमपीएससी सरळ सेवेचा तू अभ्यास करू शकतेस. कारण दोन वर्षे अभ्यास केल्यामुळे त्याचे स्वरूप तुला चांगले कळाले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे पायावर उभे राहून कमावता येते याची खात्री केली आहे त्यांना स्पर्धा परीक्षात यश मिळते. परीक्षा देत राहण्यासाठी तुझे हाती दहा-बारा वर्षे आहेत. मात्र पुन्हा नोकरी मिळण्याची संधी येत्या वर्षभरात कायमची निघून जाईल.