मी सध्या बीए प्रथम वर्षात शिकत आहे. मला यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली आहे. परंतु यूपीएससीच्या दृष्टीने कोणत्या बातम्या आणि लेख वाचावेत हे समजत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
– गिरीश रूपाली गोरख वाघमारे.
मला दहावीला ५३ टक्के व बारावीला ६३ टक्के गुण आहेत. मला यूपीएससी करायची आहे. मी बीएला इतिहास हा विषय निवडला आहे. मी पदवीच्या द्वितीय वर्षात आहे. मी सुरुवात कशी व कुठून करावी हे कळत नाही.
– प्रणाली जाधव
गिरीश आणि प्रणाली या दोघांनाही यूपीएससी फक्त खुणावते आहे. या दोघांनीही प्रथम इंग्रजी, मराठी लेखन, वाचन करून वृत्तपत्रातील बातम्यांवर स्वत:चे लेखी मत मांडणे एवढ्या साध्या गोष्टीवर भर द्यावा. गिरीशने स्वत:चे कोणतेही मार्क कळवलेले नाहीत. प्रणालीचे मार्क खूप वाढवण्याची गरज आहे. पदवीला दोघांनीही ७५ टक्के मार्क मिळवले तर एमपीएससीचा विचार त्यांनी जरूर करावा. त्यातून मिळेल ते पद घेऊन कामाला लागावे हे त्यांच्यासाठी उपयुक्त राहील. मात्र, त्या परीक्षेतून तीन प्रयत्नात काहीच न मिळाल्यास अन्य रस्ता पदवीधर म्हणून पकडणे गरजेचे राहील. नंतर वयाच्या २६ किंवा २७ व्या वर्षी नोकरीमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर यूपीएससीचा विचार योग्य राहील. या दोघांच्या निमित्ताने एक गोष्ट नोंदवून ठेवतो. गेल्या पंचवीस वर्षात यूपीएससी झालेला प्रत्येक विद्यार्थी सातत्याने प्रत्येक परीक्षेत किमान ७० टक्के मार्क मिळवणाराच असतो. या उलट पदवी हातात आहे म्हणून मी यूपीएससीची परीक्षा देतोय अशी भाबडी समजूत करून घेणारे ग्रामीण भागातील वा शहरी भागातील लाखो विद्यार्थी या रस्त्याला जात आहेत. आयुष्यातील मोलाची वर्षे त्यांची वाया जातात. आई-वडिलांनी चार वर्षे त्यांच्यावर केलेल्या खर्चाची मोजदाद मी येथे करतच नाही.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : एलआयसीमधील संधी
मी या वर्षी ९५ टक्के गुण प्राप्त करून १०वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शालेय जीवनात असताना स्कॉलरशिप, ज्ञानांजन यांसारख्या परीक्षांमध्ये मी यशस्वीरीत्या यश संपादन करून शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत. भविष्यात यूपीएससीची स्पर्धात्मक परीक्षा देऊन एक स्थितप्रज्ञ व प्रामाणिक अधिकारी बनणे माझे ध्येय आहे. प्लॅन बीसाठी मी १२वी मध्ये इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा देणार आहे. तरी यूपीएससी परीक्षा देण्यापूर्वी प्रथम राज्य परीक्षेमध्ये यशपूर्ती करून, मग केंद्रीय परीक्षेची तयारी करावी का? हा प्रश्न पडतो. तसेच या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मला आत्तापासूनच काय करावे लागेल? या प्रश्नांबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
– सिद्धी जाधव उत्तम मार्काने बारावी परीक्षा व त्यानंतर एमएचटी सीईटी पास होणे हे सोपे नाही. नंतर चार वर्षाचे इंजिनीअरिंग कोणत्याही शाखेतून पूर्ण करणे व त्यात डिस्टिंक्शन मिळवणे हे तुझे ध्येय राहील. त्यानंतर किमान दोन वर्षे नोकरी करत असताना एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास समजावून घेत अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्लॅन बी आपोआप तयार होत असतो. या उलट दहावीपासून एमपीएससी का यूपीएससी अशी चर्चा करणाऱ्यांच्या संदर्भात पदव्या घेत असताना घसरण सुरू होते. तुझे ध्येय, तुझे स्वप्न, तुला मिळालेले गुण चांगले असले तरी पुढील वाटचालीच्या रस्त्याचे खडतर स्वरूप तुला विस्ताराने सांगितले आहे. त्यावर विचार कर. योग्य निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा.