डॉ श्रीराम गीत

नमस्कार, यूपीएससी परीक्षा हिंदीसह मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत देता येते का? हिंदी आणि इंग्रजीमध्ये परीक्षा देता येते एवढी कल्पना आहे. परंतु इंग्रजी भाषेत परीक्षा देणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होतात हे किती खरे आहे, मार्गदर्शन करावे. – संदीप क्षीरसागर

ही परीक्षा विविध भारतीय भाषातून देता येते. तसेच इंग्रजीतूनही देता येते. इंग्रजीतून परीक्षा देणारे संख्येत खूप असल्याने त्यात यशस्वी होणारे जास्त असतात. इंग्रजीचा पेपर किमान गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असते. तीच बाब सी- सॅट या पेपरची आहे. हे दोन पेपर उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अन्य सारे पेपर कोणत्याही भाषेतून देता येतात, मुलाखतीचेही तेच आहे. दुभाषा मार्फत मुलाखत घेतली जाते. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसंदर्भात ती कोण देऊ शकतो? म्हणजे पात्र असतो? असे म्हणण्यापेक्षा ती देण्यासाठी किमान स्वत:ची क्षमता व गुणांची पातळी काय पाहिजे? याचा विचार करणे गरजेचे असते. तो न करता परीक्षांना बसणारे विद्यार्थी स्वत:चीच फसवणूक करून घेत असतात.

मी बारावी विज्ञान ६० टक्क्यांनी उत्तीर्ण झालो. मला एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी करायाची आहे. सध्या मी बीएसाठी प्रवेश घेतला आहे. इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेत कमी मार्क मिळाले होते. तर माझा हा निर्णय योग्य आहे? माझे आई-वडील पुन्हा प्रवेश परीक्षा दे आणि अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एमपीएससी कर म्हणाले तर हे कितपत योग्य? – दिगंबर फराडे

हेही वाचा >>> व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास

तुला राज्यसेवा स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्याला अजून तीन वर्षे अवकाश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठीची तीव्र स्पर्धा तुला अजून लक्षात येत नाही, म्हणून ती वास्तव शब्दात सांगत आहे. तुझे दहावीचे मार्क तू कळवलेले नाहीस पण बारावीला मिळालेले ६० गुण व सीईटीचे मार्क इंजिनीअरिंग प्रवेशासाठी पुरेसे नव्हते हे तूच लिहिले आहेस. हाती एखादी पदवी लागली की राज्य स्पर्धा परीक्षा देता येते, म्हणजे त्यात कोणालाही यश मिळते हा गैरसमज प्रथम मनातून काढून टाक. आपण आजवर अभ्यासात का कमी पडलो? कुठे कमी पडलो? त्यावर नीट विचार करुन त्यासाठी तीन वर्षे दे. बीएला ८० टक्के मार्क मिळवण्याचे ध्येय ठेव. हे जमले तर स्पर्धा परीक्षांचा विचार करून तयारी करून तुला यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी सोयीचे असे चार विषय बीए ला निवडलेस तर त्याचा उपयोग होतो. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल याचा नीट अभ्यास कर. तोवर करियर वृत्तांतचे वाचन व माहिती घेणे या पलीकडे स्पर्धा परीक्षेचा विचारही नको. इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा पुन्हा देणे अजिबात उपयोगी पडणार नाही. बारावी सायन्स घ्यायचे. मार्क कमी पडले किंवा आवडले नाही म्हणून बीएला जायचे. मग स्पर्धा परीक्षांचा रस्ता धरायचा, असे मनात आणणाऱ्या सगळ्या अन्य विद्यार्थ्यांसाठी तुझ्या निमित्ताने मुद्दाम हे सविस्तर लिहिले आहे.

मी तृतीय वर्षाला शिकत आहे. राज्यशास्त्र हा विषय माझा स्पेशल आहे. द्वितीय वर्षाला ८७ टक्के मिळाले आहेत. आता एमपीएससीची तयारी करत आहे. स्टेट बोर्डची पुस्तके वाचत आहे. पण संदर्भ पुस्तके कधीपासून वाचायला सुरुवात करू? स्टेट बोर्डच्या पुस्तकांचे किती वेळा वाचन करू? २०२५ ची परीक्षा देऊ की २०२६ ची? मला समजत नाही. तृतीय वर्षाला असल्यामुळे माझा तो पण अभ्यास असतो तर मी त्याचा अभ्यास कसा करावा? तृतीय वर्ष संपल्यानंतर एमए व त्याच बरोबर एमपीएससीचा अभ्यास करावा का? – वेदिका मुटे

वेदिका, तुझ्या सर्व प्रश्नांची एकेका वाक्यात उत्तरे देत आहे. सध्या फक्त तृतीय वर्षाचे मार्क टिकवण्यावर लक्ष द्यावे. ते साध्य होईपर्यंत स्पर्धा परीक्षा हा विषय डोक्यातून काढून टाकावा. बीए नंतर २०२५ ची परीक्षा देण्याचा विचार नको. एमए करण्याचा विचार फारसा उपयोगी पडणार नाही. कारण ते करून प्लान बी यशस्वी होणार नाही. त्यातून नोकरी नाही. जर्नालिझमचा विचार केलास ते करताना सामान्य ज्ञान पूर्ण वाढेल व एमपीएससीची तयारी करण्याकरता त्याचा फायदा होईल. त्यातून कदाचित नोकरीचा रस्ता सुरू होतो. नोकरी करताना एमपीएससीचा अभ्यास करणे व यश मिळवणे दोन्ही शक्य होईल. यावर नीट शांतपणे विचार करावा.

Story img Loader