डॉ श्रीराम गीत
मी इंजिनीअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. यूपीएससीची तयारी सुरू केली आहे. इतिहास, भूगोल विषयांची सहावी ते बारावीची राज्य मंडळाची पुस्तके वाचत आहे. पण संदर्भ पुस्तके कधीपासून वाचायला सुरुवात करू? २०२५ ची परीक्षा देऊ की २०२६ ची? मला समजत नाही. मला यूपीएससीची परीक्षा मराठी माध्यमातून द्यायची आहे, पण एनसीआरटीचे पुस्तक मराठीत उपलब्ध नाहीत. ग्रॅज्युएशन संपल्यावर मास्टर करत यूपीएससीची तयारी करू की फक्त यूपीएससीची तयारी करू? तसेच यूपीएससीची मराठीत तयारी करण्यासाठी लागणारे पुस्तकांचीही कृपया माहिती द्यावी. – शुभम आव्हाड
तुझे इंजिनीअरिंगचे शेवटचे वर्ष आहे. नऊ सीजीपीए कसा मिळेल यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावेस. यूपीएससी हा शब्द आता अजिबात नको. पदव्युत्तर पदवीसाठी न जाता मिळेल ती नोकरी करायला सुरुवात कर. दोन वर्षे नोकरी करताना यूपीएससीचा रोज रात्री एक तास अभ्यास कर. जोडीला दर रविवारी सहा तासाचा अभ्यास शक्य आहे. परीक्षा कधी द्यावी हा विचार डोक्यात काढून टाकावा. प्रथम उत्तम मार्काने पदवी, नंतर दोन वर्षे नोकरी आणि त्यानंतर यूपीएससीचे तीन प्रयत्न व त्यातून यश मिळवशील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीमुळे तुला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य येईल. नाहीतर कायम यूपीएससी नाही मिळाले तर माझे काय होणार हे चिंता रात्रभर सतावत राहील.
मला दहावीत ८२ तर बारावी विज्ञान शाखेत ७० टक्के होते. मला नीटला ३५० गुण मिळाले. त्याचबरोबर पीसीएमच्या सीईटीला ६० टक्के होते. मी आता सिव्हिल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. मी केंद्रसेवा, राज्यसेवा या परीक्षांपैकी कोणती परीक्षा देऊ आणि कशी तयारी करू. कृपया मार्गदर्शन करा. सत्यजित पाटील
तुझ्या गुणांचा आलेख खालीखाली जात आहे हे तुला कळले नाही काय? सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चार वर्षात हे गुण पुन्हा ७५ टक्क्यांवर नेऊन पोहोचवणे हे एकुलते एक काम आहे. त्यात यश मिळाले तर स्पर्धा परीक्षांतही यश मिळेल. स्पर्धा परीक्षा हा शब्द ते यश मिळेपर्यंत मनातून बाजूला ठेवावा.
माझी मुलगी आठवीत शिकत आहे. तिला शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे. यूपीएससीच्या तयारीसाठी या पायरीवर मी तिची काय काय तयारी करून घेऊ शकते. ती क्लास मध्ये टॉपर असते त्यामुळे मला असे वाटते की ती तयारी करू शकेल. – डॉ. वैशाली राऊत
डॉक्टरांच्या हुशार मुलीच्या निमित्ताने मी काही मूलभूत प्रश्न प्रथम उपस्थित करतो. नंतर त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात पूर्ण सविस्तर उत्तर देतो. आपली मुले हुशार आहेत. वर्गात किंवा शाळेत कायम पहिली येतात. ९५-९९ टक्क्यांच्या आसपास सर्व विषयात गुण असतात. शालेय स्तरावरच्या विविध स्पर्धा परीक्षात ती यश मिळवून उत्तीर्ण होतात. त्याच वेळी शाळेत होणाऱ्या सर्व अवांतर गोष्टीतही त्या मुलांना छान यश मिळते. असे सारे आई वडील खरंच धन्य होत. मात्र या मुलांना सर्व प्रकारची माहिती देण्याचे काम करण्यात हे धन्य असणारे पालक कायमच कमी पडतात. मग सहसा आई-वडिलांच्या मनात येते मी डॉक्टर आहे मुलांनी डॉक्टर व्हावे. मला आयटीत जायचे होते, मी इंजिनीअर असून पण ते जमले नाही म्हणून मुलाने कॉम्प्युटर घ्यावे. खूप मोठी प्रॅक्टिस असलेल्या वकील वडिलांना मुलांनी जज व्हावे नाहीतर हायकोर्टात जावे असे वाटते. लष्करातील वडिलांना किंवा आईला मुलांसाठी तीच सेवा उत्तम आहे याची खात्री असते. त्याचप्रमाणे सिव्हिल सर्विसेसमध्ये काम करणाऱ्यांची मुले त्यात का येऊ नयेत, असे त्यांचे मत असते. याशिवाय एखाद्या गोष्टीचे आकर्षण प्रत्येक पालकाच्या मनात असते. तसे आकर्षण डॉक्टरांच्या मनात आहे ते त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. नुसतेच कळवून त्या थांबल्या नाहीत तर यूपीएससी करता मी मुलीची काय तयारी करून घेऊ, असा प्रश्न त्या विचारतात.
हा प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांनी माहिती करून घेतली असती की वय २३ ते ३२ या दरम्यान ही परीक्षा देता येते. वय २३ पर्यंत ह्यकोणत्याहीह्ण क्षेत्रात उत्तमता मिळवून पदवी हाती घेतली तरी चालते. मग ती डॉक्टर, वकील, सीए, एमबीए, इंजिनियर किंवा एखाद्या विषयात एमए पूर्ण करून सिविल सर्विसेसची परीक्षा देऊ शकतो. याचाच वेगळा साधा अर्थ असा की वर लिहिलेल्या प्रत्येक विषयातील व्यक्तींची मुलीला ओळख करून देऊन त्यांचा प्रवास कसा झाला याची माहिती इयत्ता दहावी पर्यंत देणे गरजेचे आहे. यातील एखादा रस्ता मुलीला निवडू द्यावा. आता सुरू होतो तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. या प्रत्येक क्षेत्रातील टॉपर व्यक्ती सिविल सर्व्हिसेस करता प्रयत्न करते. अशा सुमारे दोन लाख व्यक्तींमधून फक्त एक हजार जण निवडले जातात. मग या तीव्र स्पर्धेला तोंड देण्याची मानसिकता मुलांमध्ये निर्माण करणे हे पालकांचे पहिले कर्तव्य ठरते. एका मार्काने नंबर गेला, या शालेय किंवा व्यावसायिक प्रवेश परीक्षेतील शब्दरचनेला तेथे किंमत नसते. पूर्व परीक्षेत उत्तम यश मिळवले मुख्य परीक्षेत उत्तम यश मिळवले पण मुलाखतीत नाकारले गेले अशीही कित्येक उदाहरणे गेल्या २५ वर्षांत पाहायला मिळाली आहेत. याला तोंड देण्याची मानसिकता पदवी मिळेपर्यंत वयानुसार कोणाचीही. क्वचितच असते आणि अपयश पचवून त्यातून मार्ग काढण्याची सवय त्यानंतरच तयार होते.
आता डॉक्टरांच्या प्रश्नाचे थेट उत्तर द्यायचे झाले तर सर्व करिअर्सची माहिती मुलीला करून देणे हे त्यांचे पहिले काम. ते करायला तीन वर्षे हाती आहेत आणि आज पासून रोज पंधरा मिनिटे वृत्तपत्र वाचन करून सामान्य ज्ञान वाढवणे याची ह्यचटकह्ण मुलीला लावता आली तर त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी साध्य होण्याची सुरुवात नक्की होईल.