माझ्या मुलीने एमबीए फायनान्स केले आहे. त्यात तिने प्रथम दर्जा प्राप्त केलेला आहे. आता तिचे वय ३४ वर्षे आहे. पाच ते सहा बँका बदलत ती आता कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला असून प्रबंधक आहे. पण तिच्या नोकरीचे स्वरूप पाहता तिच्या एमबीएचा उपयोग होताना दिसत नाही. आता तिला पुढच्या पायऱ्या गाठण्यासाठी काय करावे लागेल? कोणता कोर्स केल्यास पुढील आयुष्यात तिची सतत प्रगती होत राहील किंवा तिने कोणता कोर्स केल्यास तिला बँकेऐवजी दुसरीकडे संधी उपलब्ध होऊ शकेल? – विजयकुमार इंदिरा वासुदेव माने
आपल्या मुलीची करिअरची काळजी आपण करणे सोडून द्यावे ही विनंती करावीशी वाटते. सीएसचा विचारही नको. दहा वर्षे विविध बँकिंग सेक्टर मध्ये काम केल्यानंतर त्यात प्रगती कशी होऊ शकते हे आपल्या कन्येला चांगले माहिती आहे. एखाद्या व्यक्तीच्या एमबीएचा आणि कामाचा संबंध कसा जोडावयाचा हे नोकरी देणाऱ्या कंपनीला चांगले माहिती असते. तो केला जात आहे. कोणत्याही बँकेमध्ये ट्रेझरी आणि मार्केटिंग ही दोन महत्त्वाची खाती असतात. या दोन खात्यामध्ये शिरकाव करून घेतला तर कोणाचीही वैयक्तिक प्रगती होत जाते. पण तो कधीही सोपा नसतो. सध्याची नोकरी सोडून बदल कसा करायचा,कोणत्या बँकेमध्ये जायचे वा नाही हे आपल्या कन्येला ठरवू देत. नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये काम करणे हे जोखमीचे असते. ती जोखीम घ्यायची व नाही हे तिने ठरवावे.
माझा इलेक्ट्रिकल डिप्लोमा झाला आहे, पण मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मला शासकीय नोकरी करण्याची इच्छा आहे, पण घरचे समजून घेत नाहीत. सद्यास्थितीत माझी अवस्था ह्यना घर का ना घाट काह्ण अशी झाली आहे. कृपया मार्गदर्शन करावे – सचिन फुंदे
हेही वाचा >>> नोकरीची संधी : एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
डिप्लोमानंतर स्पर्धा परीक्षा देता येत नाहीत. मात्र डिप्लोमा इंजिनियर म्हणून सरकारी नोकरी मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली नसताना प्रथम नोकरी शोधणे, पायावर उभे राहणे, पुरेसे मिळवणे हे वयाच्या पंचशीपर्यंतचे ध्येय असले पाहिजे. घरचे म्हणतात ते बरोबरच आहे, ते ऐकायचे का स्वत:चा हट्ट करत, स्वप्न बघत राहायची याचा निर्णय तुला घ्यायचा आहे.
नमस्कार, मी सध्या बीए राज्यशास्त्र दुसरे वर्षाला शिकत आहे. मला दहावीला ९५ टक्के गुण होते आणि बारावीला शास्त्रात ७२ टक्के गुण होते. मी सध्या राज्यसेवा २०२६ साठी तयारी करत आहे. त्यासाठी मी वर्षभर क्लासेसही केले आहेत. तरी माझी सध्याची तयारी कशी असावी? मी किती वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे. माझ्याकडे २४ तास आहेत. मी बीए बाहेरून करत आहे. माझ्याकडे प्लान बीसाठी कोणकोणते मार्ग असतील? – धनश्री खराडे
बीए दुसऱ्या वर्षाला राज्यशास्त्र विषय घेऊन शिकत असताना स्पर्धा परीक्षेसाठी माझ्याकडे २४ तास उपलब्ध आहेत हे वाक्य तुलाच तपासून पाहायचं आहे. बीएचे दीड वर्ष अभ्यास नीट करून बारावीत कमी झालेले मार्क पुन्हा ७५ टक्क्यांवर नेऊन पोहोचवणे हे तुझे पहिले ध्येय राहिले पाहिजे. त्या दरम्यान रोज दोन तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलास तरी पुरे. प्लॅन बी म्हणून बीए राज्यशास्त्रा नंतर पत्रकारितेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलास तर कामाच्या संधी मिळू शकतील.मी बहिस्थ पदवी घेत आहे याचा दुसरा वेगळा अर्थ अभ्यासाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे.एक उल्लेख करतो, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीचे सर्व विश्लेषण तुला कळले का? ती वाचायचे कष्ट तू घेतलेस का? या विषयावरील अग्रलेख तू वाचून अभ्यास केलास का? नसेल तर पुस्तकी राज्यशास्त्र तुझ्या मदतीला कधीच येणार नाही. तुझ्या निमित्ताने लोकसत्तेच्या अनेक स्पर्धा परीक्षा इच्छुकांना एक विनंती करत आहे. बारावी सायन्स करुन नंतर बीएला प्रवेश घेणे किंवा बहिस्थ पदवीच्या मागे जाणे यातून स्वत:चे नुकसान करून घेतले जाते. स्पर्धा परीक्षात यश मिळवणाऱ्यांच्या या दशकातील पदव्या पाहिल्या तर इंजिनियर जास्तीत जास्त यश मिळवताना दिसतात. बारावी शास्त्र शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर शाखा बदल करणे फारसे योग्य नसते. जमेल ती शास्त्र शाखेतीलच पदवी घेतली तर ती जास्त उपयोगी पडू शकते. सायन्स मध्ये जास्त स्कोप असतो या भ्रमातून शास्त्र शाखेला प्रवेश घ्यायचा व नंतर बारावी झाल्यावर ती सोडून द्यायची हा अनेकांचा चुकीचा रस्ता ठरतो, हेही इथेच नमूद करतो.