मी बारावीत शिकत आहे. मला दहावीत ९२ टक्के गुण होते. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे माझे स्वप्न आहे. माझे वडील वनरक्षक आहेत, तर मी सुद्धा बारावीनंतर वनरक्षक भरती होऊन बाहेरून बीएससी अशी पदवी घेऊ शकतो का? पदवी होईपर्यंत, वनरक्षक नोकरी करतांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यशस्वी होता येईल का? – प्रतीक मुटके

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुझे वडील वनरक्षक आहेत. त्यांच्या मदतीने वनखात्यात काम करणाऱ्या विविध माणसांना भेटून शिक्षणाची, परीक्षांची, अभ्यासाच्या कष्टाची अधिक माहिती घे. बारावीनंतर वनरक्षक बनण्याचा रस्ता नक्की नको. तुझे आजवरचे मार्क टिकवून पदवी घे. त्यातून उत्तम रस्ता सुरू होतो. पदवीनंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतील अन्य पदांकरताही तू विचार करू शकतोस.

मी मागील ४ वर्षांपासून मुंबई पोलीस खात्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. मानसशास्त्र हा माझा विशेष विषय होता. त्यात मला ४४ मिळून मी सोलापूर विद्यापीठातून पदवीधर झालो. परंतु मला पोलीस नोकरीत रस वाटत नाही आहे. घरच्यांनी लग्नासाठी तगादा लावलेला आहे. मी शाळा, कॉलेजमध्ये असताना रंगमंचावर काम केले आहे. मला अभिनेता होण्याची इच्छा आहे. मी जर राजीनामा दिला तर शासनाकडून काहीही मिळणार नाही. माझे अभिनेत्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागेल. मी अभिनेता होईन किंवा होणार नाही. मी काय करावे? याबद्दल आपण मला सविस्तर मार्गदर्शन करावे. – मधुकर पत्रे

हेही वाचा >>> UPSC:जागतिक पातळीवर भारतीय संगीत पाश्चिमात्य संगीतापेक्षा कसे वेगळे ठरते? । देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती

एका वाक्यात सांगायचे झाले तर पोलीस खात्यातील हातातील नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात मिळण्याचा विचार हा ‘अत्यंत धोक्याचा’ आहे. ही नोकरी करत असताना त्या क्षेत्राची परिपूर्ण माहिती घ्यायला तुमच्या हातात भरपूर वर्षे आहेत. त्यातील कामे कशी चालतात, कोणाला मिळतात, किती उत्पन्न असते, याची साध्यंत माहिती विविध वृत्तपत्रात अनेकदा छापून येत असते. तीही जाणून घ्या. तसेच वयाच्या तिशीपर्यंत अभिनयात संधी शोधून काम करावे. बाकी आपण विचारलेल्या अन्य प्रश्नांसंदर्भात घरच्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्याल. तोवर नोकरी सोडण्याचा विचार करू नये.

मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला आहे. शाळेपासूनच वक्तृत्व, वादविवाद काव्यवाचन अश्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कॉलेजसोबतच एमपीएससीचा होईल तेवढा अभ्यास करत आहे. त्याचबरोबर मी एनसीसी केले आहे. पदवीनंतर राज्यसेवा आणि विधि शाखेत प्रवेश घ्यायचा विचार सुरू आहे. निर्णय योग्य आहे की बदल करावे ते कळवावे. ललिता

एल. एल. बी. का करायचे? करून पुढे काय करतात? केल्यास तू त्याचा पुढे कसा उपयोग करणार आहेस? याविषयी नीट माहिती घेणे सगळ्यात महत्त्वाचे. तरीसुद्धा करावे वाटले तर त्यासाठी सीईटीची परीक्षा असते त्यात चांगले मार्क मिळवून उत्तम कॉलेज मिळवणे ही तितकेच गरजेचे. साधारणपणे कायद्याचा अभ्यास करत असताना राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास न झेपणारा असतो. दोन्हीची सांगड घालणे फारसे उपयोगी नाही. एनसीसी पूर्ण केली आहे तर सर्व प्रकारच्या युनिफॉर्मड सर्विसेसच्या परीक्षांचा विचार तू का करत नाहीस? तो रस्ता कदाचित तुझ्या आवडीचा असू शकेल. केवळ बीएससी किंवा एलएलबी या दोन्हीतून प्लॅन बी मला फारसा दिसत नाही म्हणून हा उल्लेख. आजवरच्या कोणत्याच मार्कांचा उल्लेख नसल्यामुळे हे मोघम उत्तर मला द्यावे लागत आहे.

सर मी सध्या अकरावीत असून जेईईची तयारी करत आहे. त्याचबरोबर मला यूपीएससीची तयारी करायची आहे. मला दहावीत ८८ टक्के आहेत. सायन्स ऑलिम्पियाडमध्ये माझी चांगली रँक आलेली आहे व मी दुसऱ्या परीक्षेत पात्र आहे. माझे अक्षर वाईट आहे. वाईट अक्षरामुळे यूपीएससीत गुण घटतात का? मी सध्या आठ तास अभ्यास करतो आहे. सोबतच सातवी ते अकरावीची पुस्तके वाचतो आहे. ही तयारी चालू ठेवावी की पदवीच्या वर्षात तयारी करावी? – ओम डावखर ओम,

तुझे उद्दिष्ट चांगले आहे. ते फक्त मनात पक्के ठेव. त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने वाटचाल करण्याकरता सहा वर्षात उत्तम इंजिनीयर बनणे हाच पहिला टप्पा आहे. शाखा कोणतीही असो जेईई चे चांगले मार्क आणि चांगले कॉलेज मिळणे अत्यंत गरजेचे आहे. इंजिनीअरिंगचा अभ्यास सोपा नाही. सातत्याने ९ सीजीपीए ठेव. त्यानंतरच तुझी यूपीएससीची वाटचाल सुरू होते. अक्षर सहा वर्षांत सुधारू शकते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70