सर, मला बारावी झाल्यानंतर इंजिनीअरिंग करायचे आहे. तर मी सीईटी देऊ की जेईई? तसेच मला दुसऱ्या राज्यात इंजिनीअरिंग करायचे असल्यास काय करावे?
– आतिष निखाडे
तुझे कोणतेही मार्क तू कळवलेले नाहीस. त्यामुळे मी अंदाजे मार्क काय असतील हे गृहित धरून त्यानुसार तू काय निर्णय घ्यावा हे लिहीत आहे. बाहेरच्या कोणत्याही राज्यात जाऊन इंजिनिअरिंग करायचे असेल तर जेईई द्यावी लागेल. प्रत्येक कॉलेजमध्ये पंधरा टक्क्याचा जेईई द्वारे कोटा दिलेला असतो. जेईई मेन्सचे तुझे मार्क तीनशे पैकी शंभर असतील तर भारतातील बऱ्या कॉलेजमध्ये तुला प्रवेश मिळू शकतो. जेईई ही परीक्षा एमएच-सीआयटीपेक्षा दुपटीने कठीण आहे. त्याचा अभ्यासक्रम दीडपट जास्त आहे. इयत्ता नववी, दहावी, अकरावी तीनही वर्षात शास्त्र व गणितात ७५ पेक्षा जास्त मार्क असले तरच जेईई झेपते. ते नसतील तर सीईटी तुझ्यासाठी योग्य राहील. सीईटी मध्ये २०० पैकी १०० मार्क मिळवणारे संपूर्ण महाराष्ट्रात फार तर नऊ टक्के विद्यार्थी निघतात. तुझे ध्येय बारावी पीसीएम मध्ये प्रत्येकी ६० मार्क आणि सीईटी मध्ये शंभर ते ११० मार्क असे असतील तर चांगला इंजिनीअर बनायला अडचण नाही. मात्र शाखा व कॉलेजचा हट्ट बाजूला ठेवून.
हेही वाचा >>> रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली आणि वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये, वाचा जयंती चौहान यांच्या यशाचं सीक्रेट
माझे मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झाले आहे. लागलेली नोकरी सोडून सीएससी सेंटर चालवित आहे आणि सोबत राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहे. मला प्रशासकीय नोकरी करावी अशी इच्छा आहे, मी वाहत जाणारा असल्यामुळे माझ्या चुका माझ्या लक्षात आणून कृपया मार्गदर्शन करावे.
– शुभम राऊत
तुझा पदवीचा विषय, आजपर्यंतच्या वाटचालीतील गुणांचा उल्लेख, सोडलेल्या नोकरीतील कामाचे स्वरूप, त्याचे जोडीला तुझे सध्याचे वय यापैकी कशाचाही उल्लेख नाही. त्यामुळे अगदी मोघम तुला उत्तर देत आहे.वय ३७ पर्यंत तू राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देऊ शकतोस. जमेल तसा प्रयत्न करत रहा. त्यासाठी शुभेच्छा.
म्ाी सध्या बीए च्या दुसऱ्या वर्षाला आहे. सायकॉलॉजी हा माझा प्रमुख विषय आहे. मी अकरावी, बारावी विज्ञान शाखेतून केले आहे. दहावीत ९३ टक्के, बारावीत ७० टक्के तर सीईटीला ७० पर्सेंटाइल गुण होते. अलीकडेच मला पोस्टात नोकरी लागली आहे. पण माझा प्लान ए यूपीएससी आहे तर त्यासाठी आतापासूच काय तयारी करावी?
– मधुरा महामुलकर
पोस्टात लागलेली नोकरी कायम कशी होईल यासाठी नीट लक्ष देऊन प्रशिक्षण घेणे हे तुझे प्रधान ध्येय राहील. मानसशास्त्र हा विषय घेऊन बीए करत असताना सातत्याने ७० टक्के मार्क कसे मिळतील हे दुसरे ध्येय ठेव.सीईटीमधे तुला खूप कमी गुण होते. याचा एक अर्थ स्पर्धेत तू मागे पडतेस. पदवीवर लक्ष ठेवून त्यानंतर यूपीएससी हा शब्द व त्याचा अभ्यास सुरू होतो. त्याचा आत्ता विचार केल्यास वरील दोन्ही गोष्टी शक्य होणार नाहीत. केंद्र सरकारची कोणतीही नोकरी ही एक कायमस्वरूपी ठेव हाती असते, हे तू नीट समजून घे. तुझ्या हाती यूपीएससी देऊन पद मिळवण्यासाठी किमान आठ ते नऊ वर्षे आहेत. तोवर करियर वृत्तांत असे वाचन सर्व बातम्या व अग्रलेख वाचणे एवढेच चालू ठेव.