मला दहावीला ९१ टक्के, तर बारावीला ७१ टक्के आहेत. सध्या मी आयटी इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे,तिथे मला ७.८ चा सीजीपीए आहे. प्लेसमेंटची तयारी सुरू आहे, पण त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? यासारख्या इतर कोणत्या परीक्षा आहेत? – ध्रुव वैद्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौथे वर्ष संपेपर्यंत स्पर्धा परीक्षांचा विचार अजिबात नको. तुझा सीजीपीए नऊ पर्यंत वाढवण्यावर भर दिल्यास नंतर नोकरी मिळण्याची शक्यता सुरू होते. सध्याचा सीजीपीए खूप कमी आहे. कॉम्प्युटर क्षेत्रात प्रथम नोकरी त्या दरम्यान स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि यशाची शक्यता निर्माण झाल्यानंतर नोकरी सोडून तयारी हा रस्ता बिनधोक्याचा असतो. प्लेसमेंट मधून जे मिळेल ते नक्की घे. कारण अनेक महाविद्यालयात प्लेसमेंटला जाणे चांगल्या कंपन्यांनी बंद केले आहे. सर्व वाचक विद्यार्थी व पालकांसाठी एक वाक्य मुद्दाम लिहीत आहे. पदवीनंतर ज्यांना नोकरी लगेच मिळते अशा भाग्यवानांची संख्या भारतात जेमतेम तीन टक्के आहे. त्यात जे बसतात त्यांचे मानसिक संतुलन राहून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासावर लक्ष छान केंद्रित होते व यशाची शक्यता वाढते. पदवीनंतर थेट स्पर्धा परीक्षांचा रस्ता धरला आणि तीन चार प्रयत्नात यश नाही मिळाले तर नोकरीचा रस्ता जवळपास बंद होत असतो. लवकर तयारी म्हणजे लवकर यश हे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत वेगळ्या स्वरूपात सुरू होते. दमदार तयारी, आर्थिक स्थैर्य व कौटुंबिक पाठिंबा या तीन पायावर यशाची शक्यता किमान २५ टक्क्यांनी वाढते. सध्या फक्त करियर वृत्तांतचे वाचन लोकसत्तातील बातम्या व अग्रलेख वाचणे या पलीकडे तयारी नको.

हेही वाचा >>> यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी

माझे वय २७ वर्ष असून मी शासकीय सल्लागार म्हणून नोकरी करत आहे. राज्यशास्त्र विषयात पदवी आणि पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यूपीएससीची तयारी करायची इच्छा आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे नोकरीही गरजेची आहे. अशा परिस्थितीत नोकरीसोबत यूपीएससीची तयारी करावी का, की याच क्षेत्रात करिअर करावे? तसेच नोकरीसोबत तयारी कशी प्रभावीपणे करता येईल?

एस. एम. दामले

आपल्या हाती बऱ्यापैकी नोकरी आहे आणि यूपीएससी देण्यासाठी चार वर्षे आहेत. नोकरी चालू ठेवून वर्षभरात सहाशे तासाचा अभ्यास तुम्हाला सहज शक्य होतो. रविवारी सहा तास व रोज एक तास असे गणित केल्यास पूर्व परीक्षेची तयारी होऊ शकते. त्या प्रयत्नात गुण किती मिळतात सी सॅट मध्ये यश मिळते का नाही, यावर तुमचे पुढचे निर्णय अवलंबून असतील. नोकरी पुरेशी वर्ष झाली असल्यास काही महिन्यांचा ह्यह्णलीनह्णह्ण,(बिनपगारी) ठेवून रजा घेता येते. ते तुमच्या नोकरीत शक्य आहे वा नाही याची चौकशी करावी. एक वेगळा रस्ताही सुचवत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा प्रसिद्धी अधिकारी अशी पदे तुमच्या पत्रकारितेतील पदवीनंतर उपलब्ध असतात. त्या परीक्षांची चौकशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. जिल्हा प्रसिद्धी अधिकारी वा केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये काम करणे ही सुद्धा मानाची नोकरी आहे.

मी यावर्षी इयत्ता अकरावी विज्ञान क्षेत्रात शिकत आहे. मला इयत्ता दहावीला ९४ टक्के गुण होते. कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. मला पदवी करून स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. त्याकरीता मी इयत्ता ८ वी पासून नियमित वर्तमानपत्र, विविध विश्लेषणात्मक निबंधांचे वाचन करीत आहे. मी स्पर्धा परीक्षाकरीता जर कला शाखेत पदवी घेतली तर मला त्याचा फायदा होईल का? कृषी अभियांत्रिकीसाठी महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा कोणत्या ? – रुद्रनाथ पाटील

एक काळ असा होता की कृषी मधील पदवी घेतलेले अनेक पदवीधर एमपीएससी, यूपीएससी मध्ये यश मिळवून पद काढत होते. हा प्रकार सध्या संपला आहे. स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागरूकता वाढल्यानंतर अनेक इंजिनियर्स या स्पर्धेमध्ये येतात. काही विद्यार्थी एमबीए करून नंतर या रस्त्याला लागतात. तुझी तयारी आठवीपासून सुरू आहे ती योग्य मार्गावर आहे. दोन गोष्टी लवकरात लवकर विसरून जाव्यात. तुझी इयत्ता दहावीचे सर्व गुण आणि कला शाखेतून पदवी घेणे. अकरावी बारावी कला शाखेतून केली असती तर मी हे सांगितले नसते. आधी विज्ञान शाखा घ्यायची व बारावीनंतर अभ्यासाला वेळ हवा म्हणून कला शाखेकडे वळायचे हा गोंधळ अनेक विद्यार्थी कायम करत आहेत यासाठी हा पुन्हा पुन्हा उल्लेख करावा लागतो. बारावी शास्त्र शाखेत किमान ७५ टक्के मार्क मिळवून पूर्ण करण्याचे पहिले ध्येय ठेव. इंजिनीअरिंग सीईटी देऊन कृषी तांत्रिकी हा पर्याय तुझ्यासाठी उपलब्ध असेल. अन्यथा बीएससी कृषीची वेगळी सीईटी असते. ती उत्तम मार्काने पूर्ण करून किमान दोन वर्षे नोकरी करताना पूर्व परीक्षेचा पहिला प्रयत्न देणे यावर विचार करावा. खरे तर या सगळ्यासाठी पाच वर्षे तुला हाती आहेत. बातमी, विश्लेषण, अग्रलेख या टप्प्यावर तुझे इंग्रजी वृत्तपत्राचे व लोकसत्ताचे वाचन जेव्हा स्थिरावेल तेव्हा या परीक्षेची तयारी सुरू झाली असे समजावे. बारावी शास्त्र शाखेचा अभ्यास प्रचंड असल्यामुळे आता रोज फार तर वीस मिनिटे वेळ काढावा. अॅग्री पदवी साठी महाराष्ट्र सरकार तर्फे सीईटी घेऊन प्रवेश दिला जातो त्यात पहिल्या पाचशेत येण्याचे ध्येय ठेव. सगळे केल्यास यशाची शक्यता खूप जवळ येईल.

careerloksatta@gmail.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70