● माझा मुलगा यंदा १०वी सीबीएसईची परीक्षा देणार आहे. त्याला पुढील शिक्षणा करिता उपलब्ध असलेल्या संधी, ऑफ बिट करियरबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल. सध्याची त्याची मार्कांची धाव ७०-८० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच त्याला आर्किटेक्ट व्हायचे आहे. तरी त्या बद्दल देखील मार्ग दर्शन मिळाल्यास उत्तम! – निखिल पंडित

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या मुलाने इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा दिली आहे काय? ती दिली नसल्यास यंदाच्या वर्षी द्यावी असे आवर्जून सांगतो. प्रथम आर्किटेक्चर बद्दल. त्यासाठी बारावी सायन्स व नाटाची परीक्षा या दोनांमधून त्याला जावे लागेल. यासाठीच्या जागा कमी असतात स्पर्धा भरपूर आहे. थेट नोकरीच्या संधी जवळपास नाहीत. या संदर्भात येत्या अडीच वर्षात एखाद्या आर्किटेक्टला भेटू न तुम्हाला सविस्तर माहिती नक्की मिळू शकते. इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा मुलगा कोणत्याही शाखेतून बारावी होईपर्यंत जर पास झाला तर त्याला बी.एफ.ए. या कमर्शियल आर्टिस्टच्या कोर्सला यश मिळेल. तिकडे जायचे नसेल तर बीकॉम करत असताना ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन, युजर एक्सपिरीयन्स, यूजर इंटरफेस, कम्युनिकेशन डिझाईन अशा स्वरूपाचे छोटे छोटे कोर्सेस करून त्या क्षेत्रात प्रवेश करता येणे शक्य असते. हे सारे थेट नोकरीचे रस्ते आहेत. सायन्स अवघड जात असेल व गणितात मार्क मिळत नसतील तर आर्किटेक्चर विसरलेले बरे. मारून मुटकून सायन्स घेतलेल्या अनेकांची अवस्था यंदाचे वर्षीचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आपण सहज आसपास बघू शकता. शेवटचा एक उल्लेख करतो आणि थांबतो. ऑफबीट हा शब्द खूप चांगला वाटला, करावासा वाटला तरी तो कायमच खडतर असतो.

● मी २०१२ पासून साठ टक्के दिव्यांग आहे. १२वी नंतर मला हा प्रॉब्लेम झाला त्यामुळे शिक्षण पण अर्धवट सोडलं. माझ्या दोन्ही पायांवर १० वर्षात ९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरी मी खूप गॅप नंतर मुक्त विद्यापीठातून बी.कॉम. केलं आहे. अन्य संगणकावरील कोर्स ही केले. मला काही झालं तरी एमपीएससी परीक्षा द्यायची आहे. आईवडील शेतकरी आहेत. आजपर्यंतच्या वैद्याकीय खर्चामुळे शिक्षण घेण्यात खूप अडचणी येत आहेत. दिव्यांग असूनही मदत योजना मिळत नाही आणि माझ्याकडे पर्याय नाही. मार्गदर्शन करावे.

तुझ्या वयाचा कोणताही उल्लेख नाही. अंदाजे तीस असावे. कोणत्या गावी राहतो याचाही उल्लेख नाही. त्यामुळे प्लॅन बी बद्दलही मला काही सुचवणे कठीण आहे. त्यामुळे तुला किती वेळेला प्रयत्न करता येईल याचा मला अंदाज लागत नाही. एमपीएससी हा शब्द बाजूला ठेवून जेवढ्या म्हणून केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या क्लास टू, क्लास थ्री साठीच्या परीक्षा असतात त्यावर विचार सुरू करावास. केंद्र सरकारच्या नोकरीसाठी विशेष माहिती सध्या करिअर वृत्तांतमध्ये दिली जात आहे. तुला तुझ्या जिद्दीच्या जोरावर, दिव्यांग गटात मोडतो म्हणून नोकरीची शक्यता आहे. एक गोष्ट मात्र नक्की, मी फक्त अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत आहे हे वेड डोक्यातून काढून टाक. सलग सकाळी दोन व रात्री दोन तास अभ्यास करून मधल्या वेळात अर्थार्जनाची काहीतरी सोय तुला सापडू शकेल. ती फार मोठी रक्कम नसली तरी तुझा कॉन्फिडन्स त्यातूनच वाढणार आहे. सगळ्या वैद्याकीय अडचणींवर मात करून तुझी जिद्द वाखाणण्याजोगी आहे याचे मला नक्कीच कौतुक वाटते.

● मी २०१५ पत्रकारिता पदवीधर व २०१८ साली पत्रकारिता पदव्युत्तर झालो आता मी नोकरी करत आहे. माझे वय सध्या ३४ वर्षे आहे. मला एमपीएससी करायची इच्छा आहे, तर मला या परीक्षेला बसता येईल का? माझे गुण पुढीलप्रमाणे आहेत, दहावी – ४६.१६ बारावी – ५८.५०, पदवीधर – पदव्युत्तर – बी.ग्रेड. तरी आपण मला या संदर्भात काही मार्गदर्शन कराल का? नोकरी सांभाळून मला एमपीएससीची परीक्षा देता येईल का? – सच्चित गोडबोले

आपला प्रश्न मी नीट वाचला. त्यावर मी काय विचार केला ते इथे लिहीत नाही. तुमच्या प्रश्नाची दोन वेगवेगळी उत्तरे आहेत. एमपीएससी करू शकतो का? होय, दोन प्रयत्न तुमच्या हाती आहेत. पण एमपीएससी करणे योग्य ठरेल काय? माझ्याकडून त्याचे उत्तर नक्की नाही. यावर विचार करून आपणच निर्णय घ्यायचा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70