डॉ. मिलिंद आपटे
मी सध्या बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. केमिस्ट्री हा माझा प्रमुख विषय आहे. मी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून केले आहे. दहावीत ८९ टक्के तर बारावीत ६७ टक्के होते. मला प्रशासन सेवेची आवड आहे. बीएससीच्या तिसऱ्या वर्षा सोबत एमपीएससीचा अभ्यास करत आहे. हा माझा प्लॅन ए आहे. तर प्लॅन बी म्हणून केमिस्ट्री विषयातून कोणत्या करिअरच्या संधी आहेत जेणेकरून मी आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर स्थिर होईन? – तुळसा शिंदे
– मुळात केमिस्ट्री आवडणारी व्यक्ती थोडी संशोधनाकडे वळणारी असते. केमिकल इंडस्ट्री ही आयटीप्रमाणे बक्कळ पगार देणारी नाही. वेतन माफक असते. रसायन शास्त्र हा पदवीचा प्रमुख विषय असेल तर उत्पादन, पणन (मार्केटिंग), विक्री, पर्यावरण व्यवस्थापन, संशोधन आणि विकास, क्वालिटी कंट्रोल, नियमन, क्लिनिकल ट्रायल्स, चाचणी प्रयोगशाळा, न्यायवैद्याक प्रयोगशाळा, अध्यापन या क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी असते. अर्थातच ही इंडस्ट्री एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत वसते, त्यामुळे त्या क्लस्टरमधेच नोकरीच्या संधी असतात , त्यामुळे घरापासून दूर जाण्याची तयारी, मानसिकता असावी.
माझे एम.कॉम (६६) झाले आहे. माझे वय सध्या ३० पूर्ण आहे. मी सध्या एका खासगी कंपनीत काम करत आहे. पण मला शासकीय कार्यालयात काम करायाचे आहे. पण मी अभ्यास करायला गेलो तर मनात भीती वाटते. मन विचलित होते. मी गोंधळलेलो आहे. करिअरसाठी काय करावे, कृपया मला मार्गदर्शन करा. – कल्पेश गावंड
– एमकॉम पूर्ण झाले आहे. खासगी कंपनीत नोकरी आहे, पण जॉब प्रोफाइल लिहिलेले नाही. अकाऊंट्समध्ये कामाला असाल तर जॉब मुळीच सोडू नका, जीएसटी आणि इतर टॅक्सचे सर्टिफिकेट पूर्ण करून चांगले स्थिर व्हाल. जॉब नक्की काय करता हे माहिती नसल्याने माझ्या उत्तरला खूप नेमकेपणा येणार नाही. आपले वय ३० पूर्ण आहे त्यामुळे आत्मविश्वास कमी असणे स्वाभाविक आहे, त्यामुळे भीती वाटते. पण आज नोकरी सुरू असताना जमेल तसा अभ्यास करणे व स्पर्धा परीक्षांना बसणे व नशीब अजमावणे एवढेच सांगता येईल. खूप शुभेच्छा.
careerloksatta@gmail.com