डॉ श्रीराम गीत
नमस्कार सर. मी सध्या बी ए इंग्लिशच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. मला दुसऱ्या वर्षी ८९.८७ टक्के आणि पहिल्या वर्षी ९३.४६ टक्के होते. अकरावी आणी बारावी विज्ञान शाखेतून करून मला बारावीला ६७.७० टक्के होते. मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. त्याचबरोबर प्लॅन बी म्हणून एमए करण्याचा विचार आहे. त्यासाठी मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ्याच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. त्याबद्दल माझे काही प्रश्न आहेत.
१) एम. ए. करावे का? एम. ए. केल्यानंतर करियरसाठी कोणत्या संधी उपलब्ध असतील?
२) एम. ए.चा अभ्यासक्रम आणि यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी कशी करावी? त्याचे नियोजन कसे करावे?
३) क्लास लावणे गरजेचेच आहे का? आर्थिक बाजू कमकुवत असल्याने मी क्लास लावू शकत नाही. क्लास न लावता योग्य तयारी कशी करावी? – ऋतुजा
मी इथे जे यापुढे लिहिणार आहे ते ‘लोकसत्ता’च्या अनेक वाचकांच्या भुवया उंचावणारे असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र सध्याचे आणि गेल्या वीस वर्षातील वास्तव लक्षात घेऊन योग्य त्या जबाबदारीने मी ते लिहीत आहे. ज्यांचे बीएचे मार्क उत्तम असतात त्यांनी एमए करण्याची अजिबात गरज नसते. तीच गोष्ट बीकॉमसाठी पण लागू होते. त्या अर्थाने तुझ्या गेल्या दोन वर्षातील मार्कांची वाटचाल उत्तम आहे. तरीही तुला एमए करायचेच असल्यास करू शकतेस मात्र एमए इंग्रजी करत असताना यूपीएससीच्या अभ्यासाचा विचार सुद्धा नको. माझा तुला एक वेगळाच प्रश्न आहे. दर पंधरा-वीस दिवसाला अभ्यासात न नेमलेले एखादे इंग्रजी पुस्तक वाचून तू हातावेगळे करतेस काय? एवढेच नव्हे तर विविध विषयांवर आधारित इंग्रजीतील विविध लेखकांची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतेस काय? त्या साऱ्याला सुरुवात करणे म्हणजेच यूपीएससी शब्दाचा अर्थ तुला कळला आहे असे मी समजेन. त्यापुढे जाऊन त्या पुस्तकाच्या संदर्भात किमान दोन पानांची किंवा सहाशे शब्दांची रसग्रहणात्मक इंग्रजीतून नोंदवजा टिप्पणी तू करू शकतेस काय? याचे उत्तर होकारार्थी नसेल तर त्या दिशेने पावले टाकायला प्रथम ‘आजपासून’ सुरुवात करावीस. मुंबईचा एक, दिल्लीचा दुसरा व बंगळूरु किंवा चेन्नईचा तिसरा अशा तीन इंग्रजी वृत्तपत्रांचे अग्रलेखाचे वाचन व त्यातील महत्त्वाच्या लेखांचा अभ्यास व टिप्पणी काढणे यालाही सुरुवात कर. ही यूपीएससीची एक प्राथमिक तयारी आहे. यातून तुझा इंग्रजी लिखाणा वरचा पकड घेणारा हातखंडा यशदायी होईल. आर्थिक बाजू कमकुवत असताना ती प्रथम स्वयंपूर्ण करणे यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी बीएनंतर एमए ऐवजी वृत्तपत्रविद्या किंवा डिजिटल मार्केटिंगचा एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला तर अर्थार्जन सुरू होऊ शकते. त्यावेळी तुझे वय जेमतेम २३ पूर्ण असेल. त्यानंतरची किमान सहा वर्षे तुला यूपीएससी करता प्रयत्न करता येऊ शकतात. गरज पडेल तेव्हा स्वत:चे पैसे कमावून क्लास लावणे ही त्यात रस्त्याने शक्य होईल. निव्वळ एमए पूर्ण केले तरी तुझ्यासमोर मी नंतर काय करू? हा प्रश्न आ वाचून उभा राहणार आहे. बीएड केले तरी शाळेत नोकरी नाही. सेट/ नेट पास झाले तरी महाविद्यालयात कायम कोणी ठेवून घेत नाही हे गेल्या वीस वर्षाचे वास्तव लक्षात घेऊन मी हे लिहीत आहे. तुझ्या आवडीनुसार व सवडीने एमए तू (एक्स्टर्नल) कधीही पूर्ण करू शकतेस. एवढेच काय इंग्रजी विषयातून डॉक्टरेट सुद्धा मिळवू शकतेस. याचीही मी शेवटास नोंद करून ठेवत आहे.