डॉ श्रीराम गीत
नमस्कार, माझे वय वय ३० आहे. २०१६ साली मुक्त विद्यापीठातून बी.ए .५१ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. मित्राच्या सांण्यावरून ६ वर्षांपासून एमपीएससीची तयारी करीत वॉचमनची नोकरीही करतोय. पण आता त्या मित्राने एमपीएससी करणे सोडून दिले व त्याची घरची श्रीमंती असल्याने घरच्या व्यवसायात तो स्थिर झाला. माझ्या घरची परिस्थिती बेताची आहे. आईवडील मजुरी करतात. उमेदीचे ६ वर्षे वॉचमनची नोकरीत वाया गेली. आईवडील माझ्या लग्न व भविष्याबद्दल चिंतेत राहतात. मित्राच्या नादी लागून मी स्वत:च्या आयुष्याचे नुकसान केले असे वाटते. आयुष्य संपले आहे ही भावना सतत येते. काही सुचत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
– गणेश वाघ.
हेही वाचा >>> दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ISROमध्ये मिळू शकते नोकरी, ३१ डिसेंबरपूर्वी करा अर्ज
आयुष्याची सहा वर्षे वॉचमनच्या नोकरीत वाया गेली हे मनातून पहिल्यांदा काढून टाकावे. वॉचमनची नोकरी करताना तुम्ही अभ्यास करत होतात, पण पगारही कमवत होतात तीच तुमची खरी कमाई. आता मूळ प्रश्नाकडे येतो. मुक्त विद्यापीठातून चोवीसाव्या वर्षी बीए करून ५१ टक्के मिळाले तर अन्य कोणतीही नोकरी तुम्हाला मिळाली असती असे मला वाटत नाही. किमान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सामान्य ज्ञान भरपूर वाढले आहे. हीच नोकरी चालू ठेवून एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या संस्थेमध्ये किंवा छोट्या वृत्तपत्रांमध्ये त्याचे आधारावर मुलाखत देऊन एखादी नोकरी मिळते का? याचा प्रयत्न सुरू करा. पगार कमी असला तरी तो अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल. पुरेसा पगार मिळाल्यावर वॉचमनची नोकरी सोडायला हरकत नाही. लग्न लांबले याचे दु:ख नको. कारण तुमचे हाती असलेला पगार ऐकून कोणी मुलगी लग्नाला तयार होईल अशी सध्याची परिस्थिती नाही. स्वत:ची तुलना श्रीमंत मित्राशी करणे जेव्हा बंद कराल तेव्हा तुम्हाला तुमचा स्वत:चा छान रस्ता दिसू लागेल. याची खात्री बाळगा. स्पर्धा परीक्षेचा सुटलेला रस्ता मात्र आपला नव्हताच….! हे मनातून पुरेपूर मान्य करणे ही पहिली गरज आहे. मनातील साऱ्या गोष्टी मोकळेपणाने लिहिल्याबद्दल आपले कौतुक वाटते. त्या वाचून किमान अन्य स्पर्धा परीक्षा देणारे इच्छुक जागे होतील. बोध घेतील.
मी फार्मसीला प्रवेश घेतला आहे. पण मला यूपीएससीची तयारी करायची आहे. परंतु त्यामुळे माझा फार्माचा स्कोअर कमी होत आहे. त्यामुळे मी दोन्हीचा समतोल कसा ठेवला पाहिजे?
– गजानन देशमुख
फार्मसीचा अभ्यासक्रम हा व्यावसायिक कठीण अभ्यासक्रम आहे. तो करत असताना यूपीएससीची तयारी करणे चुकीचे आहे. यूपीएससी संदर्भात फक्त करिअर वृत्तांत वाचन व रोजचे दैनंदिन वृत्तपत्र वाचन या पलीकडे सध्या विचार नको. प्रथम बी फार्म उत्तम मार्काने, नोकरी त्यानंतर व नोकरी करताना यूपीएससीची तयारी घरच्यांशी व्यवस्थित चर्चा करून असा रस्ता योग्य राहील.
मी या वर्षी माझी पदवी बी.ए. मध्ये पूर्ण केली. मला राज्यसेवा करायची आहे. आता मी मुक्त विद्यापीठमध्ये जर प्रवेश केला तर त्यातून पुढे जाऊन काही संधी आहे का? आणि कोणत्या विषयात एम.ए. केले तर फायदा होईल. पदवी चे विषय-इंग्लिश, इतिहास, अर्थशास्त्र हे होते.
– अभि
एमएचा फायदा नोकरी वा अर्थार्जनासाठी होणार नाही. आधीचे गुण कळवले नाहीत. म्हणून मला अन्य काही सुचवणे शक्य नाही.
मी बीएस्सी झाले आहे, मला पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. पदवी ला ७५ टक्के आहेत. घरचे म्हणतात, एमएस्सी कर, कृपया गाईड करा.
– वैष्णवी औटी
घरचे काय सांगतात ते ऐकणे भाग आहे. कारण तुझा सारा खर्च तू करत नाहीस. एमएस्सी करून नोकरी मिळेल. ती करताना स्पर्धा परीक्षा देऊ शकतेस. तुझे हाती तरीही दहा वर्षे असतील.
मला सीईटीतमधे ८८ परसेंटाइल मिळालेली आहे. मी बीएस्सी अॅग्री करायलचा निर्णय घेतलेला आहे. पण मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे. मी अॅग्री.पदवी करून परत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकतो का?
– प्रतीक महापुरे
होय. पदवीपर्यंत सतत प्रथम वर्ग टिकव. नंतर सगळे शक्य आहे. इतर विचार नको.