श्रीराम गीत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नमस्कार सर, लोकसत्ता या वृत्तपत्राचे मी नियमित वाचन करतो. मला दहावीला (८६ टक्के) तर बारावीला (७८ टक्के) गुण मिळाले होते. सध्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवाया परीक्षेची तयारी करत आहे. स्थापत्य अभियांत्रिकी मधून बी.ई.२०२० मध्ये ७६ गुणांनी पूर्ण केले आहे. प्लॅन बी म्हणून मी नुकतेच २०२३ मध्ये एमटेक ९० गुणांनी पूर्ण केले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवापरीक्षेसाठी दोन प्रयत्न झाले आहेत. हा तिसरा प्रयत्न आहे. दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेस कमी मार्क पडले. आता २०२३ ची मुख्य परीक्षा येत्या २८ जानेवारीला आहे. यावेळी मागच्या वेळी झालेल्या चुकांवर प्रभावीपणे काम केले आहे. मनामध्ये वाटत आहे की यावेळी नक्की निवड होईल परंतु जर नाही झाले तर पुढे काय करावे. १) २०२४ च्या परीक्षेची तयारी करावी?

२) एमटेकच्या आधारावरती खासगी क्षेत्राकडे वळावे?

३) किंवा अन्य कोणते पर्याय?

कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे.

प्रसाद

सरकारी नोकरी का करायची आहे याच्याबद्दलच्या तुझ्या मनातील कल्पना सुस्पष्टपणे कागदावर लिहून काढ. त्याचे आकर्षण असणे वेगळे व प्रत्यक्ष काम करून स्वत:ची प्रगती करून घेणे या दोन्हीची नीट तुलना कर. स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगमध्ये मागणी भरपूर आहे. कामे खूप असतात, मोठाल्या फर्ममध्ये पगार सुद्धा उत्तम मिळतो. त्यातील कामात नावीन्य पण असते. या उलट सरकारी नोकरीमध्ये दर तीन वर्षांनी बदली हे कायमचे नशिबी लिहिलेले असते. पगाराबद्दल म्हणायचे झाले तर पाच वर्षांनंतर खासगीतील पगार सरकारी नोकरीच्या कितीतरी पटीने वाढू शकतो. मात्र, इथे वरकमाईचा हिशोब मी धरलेला नाही. खासगी क्षेत्रात वरकमाई नसते हाही एक चुकीचा समज आहे. हे सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे तुझे दोन प्रयत्न अ-यशस्वी झालेले आहेत. काही मार्काने माझी पोस्ट गेली हे वाक्य पूर्णत: चुकीचे आहे. कारण एकेका मार्काला अनेकदा दहा ते पंधरा उमेदवार असू शकतात. येत्या जानेवारीतील परीक्षेत यश न मिळाल्यास प्रथम नोकरी शोधणे हे तुला करावेच लागेल.

हेही वाचा >>> जानेवारीपर्यंत तलाठी भरतीचा निकाल लागणार! आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; १६ हजार जणांचे आक्षेप

अन्यथा खासगी नोकरीचा रस्ता कायमचा बंद होण्याची शक्यता निर्माण होईल. वयाच्या २८ व्या वर्षांपर्यंत खासगी नोकरीचा अनुभव लक्षात घेऊन तुला पुन्हा परीक्षा देणे नक्की शक्य आहे. माझे आजवरचे मार्क चांगले होते पण तरीसुद्धा माझी निवड का होत नाही? याचे उत्तर तुझ्या पेक्षा जास्त अभ्यास केलेले अनेक विद्यार्थी स्पर्धेमध्ये आहेत हे तू विसरत आहेस. तुझ्या निमित्ताने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी मिळालेले मार्क, आजवरची त्यांची वाटचाल आणि हुलकावणी देणारे यश यावर सविस्तर लिहिले आहे.

डिजिटल मार्केटिंग संबंधित कोर्सची माहिती द्याल का? नेटवरून नक्की माहिती मिळत नसल्याने विचारत आहे. मुंबईत कुठे केल्याने नोकरी मिळू शकेल? कृपया मार्गदर्शन करावे.

लता नाबर

डिजिटल मार्केटिंगचा एखादा कोर्स केल्याने खूप छान, मोठी नोकरी मिळते अशा स्वरूपाचा एक गैरसमज गेली चार-पाच वर्षे पसरला आहे. ज्यांना डेटा सायन्स कळत आहे व मार्केटिंगमध्ये काय चालते? कसे करावे? याचा अंदाज आहे अशांनी हा कोर्स केला तरच फायदा होतो. जोडीला भाषेवर प्रभुत्व व कन्टेन्ट रायटिंग अॅडव्हर्टायझिंग, आणि कम्युनिकेशन स्किल्स असली तर मोठा फरक पडत जातो. नेहमीप्रमाणे सामान्य ज्ञान गरजेची राहते. असं एखादा कोर्स करून मुंबईत फॅन्सी नोकरी मिळेल या भ्रमातून बाहेर आला तर उत्तम.

नमस्कार सर, मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.एच्या प्रथम वर्षात आहे, मी बारावी कॉमर्स ६२ टक्केनी उत्तीर्ण झालो आहे (कॉमर्समध्ये रस नसल्याने मी बी.ए निवडलं), मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे, माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे तर तयारी संदर्भात मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

प्रथमेश हाके या आधी अनेकदा लिहिल्याप्रमाणे आजही तुला सांगत आहे. आर्थिक स्थिती बळकट असल्याशिवाय, पालकांच्या संमतीशिवाय व किती वर्षे आपण स्पर्धा परीक्षांकरता देणार याची त्यांचे बरोबर चर्चा केल्याशिवाय, यूपीएससीची स्वप्ने पाहणे योग्य नव्हे. नीट अभ्यास चालू ठेव, सामान्य ज्ञान वाढव. लोकसत्तेचे अग्रलेख वाचणे सुरू कर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पंच्याहत्तर टक्के मार्काचे ध्येय हवे. ते जमले तर अन्य साऱ्या गोष्टी शक्य होतील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70