डॉ. श्रीराम गीत
यंदा माझे सिंबायोसिस मधून बीकॉम पूर्ण झाले आहे. मी टेनिसची नॅशनल प्लेयर असून अनेक मेडल्स मिळालेली आहेत. मला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा आहे. त्यासाठी बारावी नंतरचे चार वर्षांचे शिक्षण म्हणून एम कॉम (पार्ट वन) करावे लागेल काय? एमबीएसाठी काही स्कॉलरशिप मिळतात का? – बेला ताम्हणकर
तुझ्या संदर्भात तुला दोन निर्णय घ्यावे लागतील. एक, जनरल एमबीए करताना टेनिसला कायमचा निरोप द्यायचा काय? का एमबीए स्पोर्ट्स मॅनेजमेंट करून टेनिसमध्ये आणि अन्य खेळात करिअर करायची? केवळ बारावी नंतरचे चार वर्षांचे शिक्षण अमेरिकेत एमबीए करण्यासाठी पुरेसे नसते तर दोन वर्षांचा कामाचा अनुभव पण गरजेचा असतो. त्या जोडीला जी मॅटची परीक्षा द्यावी लागते. ती बऱ्यापैकी कठीण असते. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करण्याकरिता तुला भारतात संधी उपलब्ध आहेत. अन्यथा ऑस्ट्रेलियामध्ये खेळातील असंख्य संधी आणि थेट एमबीएला प्रवेश हे कमी खर्चात शक्य होते. एमबीए हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे त्यासाठी स्कॉलरशिप देत नाहीत अशी माझी माहिती आहे. मात्र, दोन सेमिस्टरमध्ये संस्थेतर्फे दिलेल्या इंटर्नशिपची थोडीशी आर्थिक मदत होते. खेळासाठी असेच कोर्सेस करण्याकरिता जर्मनी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. या साऱ्याचा योग्य विचार करून निर्णय घ्यावा.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
सर, माझा मुलगा, क्षितिज स्टॅटिस्टिक्समध्ये डिस्टिंक्शन घेऊन पदवीधर झाला. तो आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीत बिझनेस डेव्हल्पमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. शिवाय एलएलबीचे पहिलेले वर्ष आता पूर्ण होत आहे. त्याचे आता वय २३ आहे. त्याला डाटा अनायलिसीस /डाटा सायन्स यामध्ये स्वारस्य आहे. परंतु नाशिक येथे तशी प्रगत शैक्षणिक संस्था नाही. परंतु शैक्षणिक अर्हता आणि कामासाठीची गरज म्हणून इंटरनॅशनल बिझिनेसमध्ये MBA/MMS करावे असे त्याला वाटते. तुमच्या अनुभवानुसार, माझ्या मुलानी काय करावे. – स्मिता चाळके
क्षितिजच्या प्रश्नाच्या संदर्भात विविध बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे तो करत असलेले काम. तो माझ्या माहितीप्रमाणे डाटा सायन्समध्ये काम करत आहे. त्याचा इंटरनॅशनल बिझनेसशी संबंध अजिबात येत नाही. एमबीएचा त्यात उपयोग बिझनेस अॅनॅलिस्टचे काम मिळाले तर होईल. सहसा यातील अनेक कौशल्य विकासाचे कोर्स ऑनलाइनसुद्धा उपलब्ध आहेत नाशिक हा अडचणीचा भाग नाही. दुसरी बाजू म्हणजे एमबीए करण्यासाठी परदेशी विसा अमेरिकेसाठी मिळतोच असे नाही. दोन-तीन वर्षे कामाचा अनुभव असल्याशिवाय तिकडे जाता येत नाही. त्यासाठी जी-मॅट नावाची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाले तर प्रवेश मिळतो मात्र खर्च सहसा दीड कोटीच्या घरात जातो. एमएस करताना काम करायला परवानगी असते. मात्र, अमेरिकेतील उत्तम संस्थेचे एमबीए करताना फुल टाइम रेसिडेन्शिअल अपेक्षित असते. तेथे नोकरीत असलेल्यांना सुद्धा ते परवडत नाही अशी माझी माहिती आहे. तिसरा मुद्दा पगाराबद्दलचा. वर्षांला डॉलरमध्ये मिळणाऱ्या पगाराला ८० ने गुणणे हा चुकीचा विचार असतो. अमेरिकेत मिळणाऱ्या पगारातील ३० टक्के टॅक्सेस कापून हातात रक्कम मिळते. कोणत्याही शहरात नोकरदार माणसाला राहण्याचा खर्च पंधराशे डॉलर महिना इतका येतो. मग दीड कोटी फेडण्याचा विचार त्यानंतरचा असतो. ग्रीन कार्ड मिळणे सध्या अशक्य बनले आहे त्यामुळे व्हिसा स्टॅिम्पग करता दरवेळी कंपनी बदलल्यावर भारतात येऊन परत जाण्याचा खर्चही करावा लागतो. त्याला दरवेळी परवानगी मिळतेच असा गेल्या तीन वर्षांतील अनुभव नाही. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड या तीन देशात मात्र त्याला सहजगत्या हे सारे करता येऊ शकेल व तिथे राहण्यासाठीची परवानगी सुद्धा मिळेल. मला भेटणारे लोक व परदेशस्थित असलेल्यांच्याकडून मिळणारी प्रत्यक्ष माहिती येथे लिहिली आहे. पैशाची व्यवस्था असेल व अस्थिरतेची जोखीम घेण्याची तयारी असली तर अमेरिकेची दारे त्याला कायम सताड उघडी आहेत.