भारतातील एक १७ वर्षांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो आणि तेथे संगणकीय संशोधन करून पुन्हा भारतात येतो आणि मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग इथल्या शेतकऱ्यांसाठी करतो… ही कुठल्या सिनेमाची कथा नाही. सारंग नेरकर या तरुणाची ही खरीखुरी कथा आहे. इनोसेपियन नावाचं स्टार्टअप त्याने अवघ्या २१ व्या वर्षी सुरू केलं आहे. पिकाला लागणारा रोग प्रत्यक्ष डोळ्यांना दिसण्याआधी १५ दिवस अगोदर हुडकणारा ‘ओपन सोर्स ऑगमेंटेड रिअॅलिटी हेडसेट’ सारंगने तयार केला आहे. राज्यातील हजारो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. जाणून घेऊ सारंगच्या या स्टार्टअप विषयी त्यांच्याच शब्दांत…
बालपणापासून पाहिलं होतं की तंत्रज्ञान पाश्चात्य देशांमध्ये जुनं झाल्यावर भारतात येत होते. तुमच्या वयाच्या विशीत तुम्ही कठीण गोष्टी केल्या पाहिजेत असं मी कुठेतरी वाचलं होतं. जेव्हा भारतात शेतीसाठी एआय तर दूरच राहू दे, पण सामान्यपणेही एआय म्हणजे काय हे माहीत नव्हतं त्या काळात एआय स्टार्ट अप सुरू करण्याचं स्वप्न पाहणं याहून कठीण गोष्ट काय असू शकते? पण मी ते करण्याचं धाडस दाखवलं. पालघरमधील एखादा आदिवासी शेतकरी माझ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जेव्हा परदेशात आपलं मिरचीचं पिक पाठवतो, तेव्हा त्या यशानं त्याचा चेहरा खुललेला पाहिला की आपल्या ज्ञानाचं चीज झाल्यासारखं वाटतं.
टोरंटो विद्यापीठात इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनीअरिंग शाखेतून पदवी घेतली. तिथे असताना विद्यार्थीदशेत अनेक क्षेत्रांत संशोधनाची संधी मिळाली. सुरुवातीला मी स्पेस मिशन प्लानिंगमध्ये संशोधन केलं. आम्ही एक ‘व्हॉएजर’ नावाचं टूल बनवलं होतं. नील डग्रास टायसन हे अमेरिकेतील सायन्स एज्युकेटर आहेत. त्यांनी त्यांच्या स्टार टॉक नावाच्या रेडिओ शो वर आमच्या प्रकल्पाची माहिती दिली होती. हे प्रोजेक्ट आम्ही नासासमोरही सादर केले होते. २०१५ सालापासून माझं रिसर्च ‘सेल्युलर मेकॅनो बायोलॉजी’मध्ये सुरू झालं. याअंतर्गत मी असे डिव्हाईस डिझाइन केले होते, जे मानवी शरीरातील पेशींना त्रिमितीय खेचतात. हे कमी खर्चातील डिव्हाइस होते. अॅडव्हान्स मायक्रो अँड नॅनो सिस्टीम लॅबमध्ये रिसर्च केले. तेथे वस्तू लहान कशा करता येतात हे शिकलो. ती इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) ची सुरुवात होती. एक असे डिव्हाइस बनवले होते जे गाडीच्या टायरच्या प्रेशरनेच ऊर्जा घेऊन टायरच्या स्थितीविषयीची माहिती एका कनेक्टेड अॅपला पाठवत होते. त्यानंतर माझे मुख्य संशोधन सुरू झाले.
‘वेअरेबल कॉम्प्युटिंग, एआय अँड कॉम्प्युटेशनल फोटोग्राफी’ या विषयावरील संशोधन केले. प्रा. स्टीव्ह मॅनसोबत संशोधन करण्याची मला संधी मिळाली. त्यांना ‘फादर ऑफ वेअरेबल कॉम्प्युटिंग’ असे म्हणतात. एचडीआरमध्ये संशोधन केले. मोबाइलमध्ये एचडीआर सध्या केवळ स्थिर इमेजमध्ये आहे, ते मी अधिक वेगात, व्हिडिओ इमेजमध्ये बनवले. त्याचे पेटंटही मला गेल्या आठवड्यातच अमेरिकेत मिळाले आहेत. डिव्हाइस स्वस्त, आकाराने लहान बनविण्याचे तंत्र आधी मी शिकलो होतो, ती जोड या एचडीआरच्या संशोधनाला दिली. हे तंत्रज्ञान विकसनशील देशांमध्ये वापरात कसे आणायचे यावर प्रामुख्याने मी काम केले. तीन वर्षे माझे हे संशोधन सुरू होते. त्यातून आम्ही जगातला पहिला ‘ओपन सोर्स ऑगमेंटेड रिअॅलिटी हेडसेट’ बनवला. यावरचा थिसिसची खूप गौरवला गेला. या प्रोजेक्टमध्ये माझी भूमिका मध्यवर्ती होती. हे संशोधन तेव्हा २०१६-१७ मध्ये सुमारे अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचले.
यादरम्यान मी आणखी एका डिव्हाइसवर काम केले. एक मनगटी घड्याळासारखे ते डिव्हाइस होते. त्याच्या मदतीने आपण आपल्या आजुबाजुचे एरव्ही डोळ्यांनी न दिसणारे ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ज’ या डिव्हाइसच्या मदतीने पाहू शकत होतो. टोरंटो विद्यापीठात माझे एकूण १२ रिसर्च पेपर पब्लिश झाले. माझ्या नावावर १३ वेगवेगळे पेटंट्स आहेत. मला अनेकांकडून स्टार्ट अपचे सल्ले मिळाले. पण मला विकसित नव्हे तर विकसनशील देशासाठी काम करायचे होते. त्यामुळे मी पुन्हा भारतात आलो.
माझी एक प्रमुख स्टार्ट अप कंपनी आहे- ‘इनोसेपियन अॅग्रो टेक्नॉलॉजीज् प्रा. लि.’ तसेच ‘नेरकर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट’ ही ना नफा ना तोटा तत्त्वावरील संस्थाही सुरू केली. मी मला ज्ञात असलेल्या आणि संशोधित केलेल्या तंत्रज्ञानातून असे डिव्हाइस तयार केले ज्यात असे सेन्सिंग मॅकेनिझम होते, ज्यामुळे डोळ्यांना दिसू शकेल त्याच्या १० ते १५ दिवस आधी पिकातली कीड, रोग किंवा कोणतीही कमतरता दिसू शकेल. २०१७-१८ मध्ये शेतीत संशोधन करायला सुरू केलं आणि २०१९ मध्ये हे वापरासाठी तयार डिव्हाइस बनले. २०२० मध्ये आम्ही ते व्यावसायिक तत्त्वावर आणण्याचा प्रयत्न केला. २०० एकरांपासून सुरुवात केली. आता दरवर्षी यात दुपटीहून अधिक वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी इंग्लंडपर्यंत मिरची पिक पोहोचवले आहे. वेगवेगळ्या पिकांत वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ, द्राक्षांमध्ये किती गोडवा असावा याचे निर्यातीसाठी काही निकष असतात. त्यासाठीही आमच्या प्रोडक्टच्या सर्व्हिसची मदत होते. एआय फॉर शुगरकेन हाही एक माझा प्रकल्प आहे. आंबा, द्राक्ष पिकांसाठीही मी काम केलं आहे. २०२० मध्ये मला माझ्या कामासाठी जागतिक बँकेचा पुरस्कारही मिळाला.
हवामान दूत
दरम्यान माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी अंध व्यक्तींसाठी एक डिव्हाइस तयार केलं होतं. अंधांना त्यांच्या समोर कोण आहे किंवा काय आहे हे त्या डिव्हाइसमधून कळतं आणि त्यांना तिथपर्यंत जाण्याच्या सूचना मिळतात. या कामावर मी कॅनडात एक रिसर्च पेपर सादर केला होता. त्याला खूप यश मिळालं. त्यासाठी आम्हाला २०१८ मध्ये भारतात राष्ट्रपतींकडून ‘’गांधीयन यंग टेक्नॉलॉजीकल इनोव्हेशन’ पुरस्कार मिळाला. २०२० मध्ये जागतिक बँकेकडून पुरस्कार मिळाल्यानंतर जागतिक बँकेनेच मला पुढल्या वर्षी भारताचा हवामान दूत म्हणून नियुक्त केले. क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही जबाबदारी होती.
कोणताही भाजीपाला निर्यात करायचा असेल तर तो रासायनिक अवशेष मुक्त (केमिकल रेसिड्यूज फ्री) असावा लागतो, अन्यथा तो नाकारला जातो. तुम्हाला किड, रोगाची आधीच माहिती मिळाली तर तुम्ही त्या पिकावर रासायनिक ऐवजी सेंद्रीय पद्धत वापरू शकता. यामुळे ते पीक क्लायमेट स्मार्टही होते. त्याला पाणी कमी लागते. त्यामुळे पर्यावरणालाही हातभार लागतो. राज्यातल्या ८,५०० शेतकऱ्यांसोबत या प्रकारच्या शेती तंत्रज्ञानासंबंधीचे काम सुरू आहे.
घरच्यांचा विरोध
माझा जन्म नाशिकचा, कुटुंब मूळचं धुळ्यातील. मी नाशिक आणि ठाण्यात शिकलो. वडील शासकीय सेवेत आहेत, आईचे ब्युटी सलोन आहेत. नोकरी करायची नाही हे माझं ठरलंच होतं. स्टार्ट अप सुरू केलं तेव्हा मी अवघा २१ वर्षांचा होतो. कुटुंबात कोणीही व्यवसाय करणारा नाही. पण हळूहळू शिकत गेलो. वडील मी कॅनडात शिक्षणासाठी गेलो तेव्हाही विरोधात होते आणि तिथून भारतात परत आलो त्यालाही विरोध होता. त्यांना मी पुरस्कारासाठी राष्ट्रपती भवनात घेऊन गेलो तेव्हा काही प्रमाणात त्यांचा विरोध मावळला. मी सुरुवातीपासून बंडखोर वृत्तीचाच होतो. स्वातंत्र्याची सवय होती. त्यामुळे त्यांचे ऐकले नाही. पण पुरस्कार मिळाले, यश मिळू लागलं तसतसा विरोध मावळला.
शिक्षण, शिकवणं सुरूच
डॉ. जेफ्री हिंटन यांच्याशी संवाद साधण्याचीही मला संधी मिळाली. त्यांना यावर्षीचं फिजिक्सचं नोबेल मिळालं आहे. त्यांना ‘एआयचे गॉडफादर’ म्हटलं जातं. मी विद्यापीठांच्याही संपर्कात असतो. शिकवत असतो. मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात एआय इन अग्रीकल्चर शिकवत होतो. जेथे शिकलो त्या टोरंटो विद्यापीठाचा मी दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेचा दूत आहे.
कार्बन क्रेडिट्स
आता आमचा कार्बनचा प्रकल्प सुरू आहे. शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट्स मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याचं ट्रेनिंग मला जागतिक बँकेकडून मिळालं होतं. किती कार्बन शोषला जातोय हे मोजण्याच्या तंत्रज्ञानावरही काम करतोय. इतर देशांमधूनही आम्हाला आमच्या तंत्रज्ञानासाठी मागणी आहे. हातातोंडाशी आलेला घास रोगकिटकांमुळे वाया जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना मनापासून मदत करण्यास मी तत्पर असतो. म्हणूनच आमच्या कंपनीच्या सल्लागार पॅनलमध्ये शेतकरी आहेत. भारतात संधीला वाव आहे. पण तुम्हाला तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेविषयी खात्री हवी. चिकाटी हवी. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, पण वेळ येते हे मात्र निश्चित.
शब्दांकन : मनीषा देवणे
(नवउद्यामींच्या मुलाखतींचे हे सदर दर पंधरवड्याने प्रसिद्ध होईल.)