प्रवीण निकम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या प्रत्येकास शिक्षणाचा हक्क असला तरी याच शिक्षणाच्या हक्कासाठी बऱ्याच जणांना अजूनही लढावे लागत आहे. डोंगरदऱ्यात, वाड्या – वस्त्यांमध्ये राहून उदरनिर्वाह करणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक समस्या अजूनही तशाच आहेत. शाळेत जाण्यापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापर्यंत प्रत्येक पायऱ्यांवर या समस्या दिसून येतात. गावांत व वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अनेक विद्यार्थांना शाळेत जाणाऱ्यासाठी कित्येक किलोमीटर अंतर चालत कापावे लागते. तोच मुलगा जेव्हा नवी स्वप्ने उराशी बाळगून शहरात राहून शैक्षणिक प्रवास सुरू करतो… तेव्हा आर्थिक चणचण भासत घुसमटलेले आयुष्य जगत असतो. रोजचा खर्च कसा भागवायचा? महाविद्यालयाची फी कशी भरायची? असे एक ना अनेक प्रश्न… हे वास्तव नाकारता येत नाही.

एकीकडे विविध तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता परीघ तर दुसरीकडे शिक्षणाच्या हक्कासाठीची ही लढाई… वाड्या-वस्त्यांमधील होतकरू मुलाला देखील उच्च शिक्षित व्हावे, आकाशातून उंच गगरभरारी घ्यावी, परदेशी उच्च शिक्षणाची कास धरावी हे वाटतं असते. पण त्या समस्या सोडवताना तारुण्य निघून जातं. हे वास्तव असले तरी आगामी काळात यात बदल होणे हे गरज आहे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : लष्करात भरती होण्याची संधी

महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर, जिजाऊ- सावित्री-फातिमा अशा अनेक समाजसुधारकांचा आणि संत मंडळीचा वारसा लाभला आहे. त्यातून बरीच विचारांची आणि मूल्यांची रुजवणूक झाली आहे. तरीही अजूनही उच्च शिक्षणासाठी अनेकांना झगडावे लागत आहे. कारण, त्यांना शिष्यवृत्ती-फेलोशिप, विविध सरकारी योजनांविषयी माहिती नसते. त्याविषयी जनजागृती झालेली नसते. त्यात भाषा आणि राहणीमान याबद्दल न्यूनगंड निर्माण झालेला असतो. यावर उपाय म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कौशल्य व रोजगारनिर्मितीचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे. कारण, वाढत्या स्पर्धेमुळे बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक वाढत आहे. या वातावरणात वावरताना लवकर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे, त्या – त्या क्षेत्रातील कामाचा किमान अनुभव आणि आवश्यक कौशल्ये असणे गरजेचे आहे.

आता शिक्षण घ्यायचे की अनुभव? तर शिकताना देखील कामाचा अनुभव सहज घेता येतो. खरंतर आपण आपल्या भोवतालमधील लोकांच्या प्रत्यक्ष जगण्यातील अनुभवातून अधिक शिकत असतो. त्यामुळे आपण अशा अनुभव घेण्याच्या किती संधी देतो त्यावर उच्च शिक्षणातील भविष्यातील संधी अवलंबून असतात. माझ्या महाविद्यालयीन जीवनात या साऱ्या गोष्टी जवळून बघितल्या. त्यामुळे याच हेतूने समता सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, भाषा विकसन आणि विविध शैक्षणिक योजना जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच अनेकांना प्रतिष्ठित विद्यापीठात संधी, शिष्यवृत्ती – फेलोशिप याविषयी मदत मिळत आहे. त्यासाठी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबवत आहोत.

शैक्षणिक-सामाजिकदृष्ट्या जडणघडणीच्या वाटचालीत आलेले अनुभव, उच्च शिक्षण आणि त्याआधारित विविध संधी याविषयी लेखन पुढील सदरात बघणार आहोत.