रोहन एक अभ्यासू मुलगा दहावी-बारावीमध्ये पण अतिशय चांगले मार्क मिळवलेला आणि करिअरकडे अतिशय गांभीर्याने पाहणारा असा मुलगा होता. बारावीनंतर अतिशय विचारपूर्वक कॉम्प्युटर इंजिनीअरिंग शाखेत त्याने प्रवेश घेतला. महाविद्यालयाची सर्व वर्षे अतिशय मेहनतीने आणि चिकाटीने अभ्यास करून रोहनने खूप चांगले मार्क्स मिळवले आणि कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांमध्ये देखील तो लोकप्रिय होता. रोहनबद्दल सर्वांनाच खात्री होती की त्याचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे आणि त्याचे कॅम्पसमध्ये नक्कीच सिलेक्शन होणार. शालेय जीवनापासून कॉलेजच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये रोहनला अपयश काय असते याची अजिबातच सवय नव्हती. मित्र-मैत्रिणींबरोबर टाईमपास करणे, बाहेर जाणे, सहलीला जाणे अशा सर्व गोष्टी तो कायमच जाणीवपूर्वक टाळत होता. कॉलेजचे शेवटचे वर्ष संपता संपता कॅम्पस सिलेक्शनचे वातावरण सुरू झाले. काही चांगल्या कंपन्या कॉलेजच्या संपर्कात होत्या. इंटरव्ह्यूची वेळ आली तरी देखील रोहन अतिशय शांत होता. त्याच्या सर्व क्षमता पणाला लावून त्याने इंटरव्ह्यू दिला देखील, परंतु काही व्यावहारिक जीवनातील प्रश्नांची उत्तरे त्याला नीट देता आली नाहीत त्यामुळे तो थोडासा निराश होता परंतु तरीदेखील आपल्याला नक्की जॉब मिळेल आणि आपले इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होईल याची त्याला खात्री होती.
काही दिवसांनी सिलेक्शन झालेल्या मुलांची लिस्ट कॉलेजने जाहीर केली त्यामध्ये रोहनचे नाव नव्हते. आपले नाव नाही हे कळल्यावर रोहनला त्याचा अतिशय धक्का बसला. रोहन-बरोबरच त्याचे पालक नातेवाईक जवळचे मित्र मैत्रिणी सर्वांनाच याचे खूप आश्चर्य वाटत होते.
रोहनचा मूड खूपच वर खाली होऊ लागला. स्वत:च्या भवितव्याबद्दल तो खूपच काळजी करू लागला मनामध्ये अनेक नकारात्मक विचार व भावना निर्माण होऊ लागल्या. मग आपल्या दिसण्यापासून आपल्यामध्ये असलेल्या सर्व क्षमता व कौशल्यांबद्दल मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. त्याच्या अभ्यासात कमी हुशार असलेल्या एक दोन मित्र मैत्रिणींचे मात्र इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाले होते त्याचे त्याला खूप आश्चर्य वाटत होते. मनामध्ये राग,भीती, काळजी, निराशा अशा अनेक नकारात्मक भावना त्याच्या मनाची पकड घेऊ लागल्या होत्या. आपण डावलले गेलो आहोत, आपल्यावर अन्याय झाला आहे असे रोहनला मनोमनी वाटत होते.
रोहनला त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अपयशाची अजिबातच सवय नव्हती त्यामुळे कंपनीकडून आलेला नकार पचवणे त्याला अत्यंत जड जात होते.
रोहनला आलेला अनुभव आपल्यापैकी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना येत असतो. अशावेळी निराश न होता खचून न जाता पुन्हा एकदा पुढच्या इंटरव्ह्यूची तयारी करायला सज्ज होता आले पाहिजे. एकदा आलेले अपयश हे कायमचे अपयश नाही हे आपणच स्वत:ला पटवून दिले पाहिजे. कॅम्पस मध्ये सिलेक्शन न झालेल्या मुलामुलींनी नोकरी मिळवण्यासाठी इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत याची जाणीव ठेवायला हवी. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण नक्की कुठे कमी पडलो याविषयी आत्मपरीक्षण करायला हवे व स्वत:मधील कमतरता व उणिवा कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा असे मला वाटते. आपले संवाद कौशल्य, देहबोलीपासून कंपनीच्या त्या पदासाठी आपल्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत याचा अभ्यास करायला हवा. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक जगामध्ये जगताना नक्की कोणत्या प्रकारची कौशल्य लागतात याचा अभ्यास घ्यायला हवा.
मुद्देसूदपणा, विचारांमधील स्पष्टता, हजरजबाबीपणा, आपल्यातील निर्णय क्षमता, अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी अनुकूल मानसिकता, प्रयत्नवाद या सर्व गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व करताना आपली इतरांबरोबर तुलना करणे थांबवायला हवे इतर कोणी करत असतील तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपले लक्ष स्व-विकास व स्व-उन्नती कडे द्यायला हवे. नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांचा अभ्यास करून त्यासाठी आवश्यक माहिती मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचबरोबर या क्षेत्रातील इतर तज्ञ व्यक्तींबरोबर देखील सल्लामसलत करायला हरकत नाही.
सुखदु:ख, यश अपयश या आयुष्यातील अविभाज्य गोष्टी आहेत हे मनोमन स्वीकारायला हवे. स्वत:च्या क्षमता ओळखून त्या क्षमतांचा विकास कसा करता येईल आपल्यातील कौशल्यांवर प्रभुत्व कसे मिळवता येईल याकडे जरूर लक्ष द्यायला हवे. स्व-ओळख, स्व-जाणीव, स्व-परिवर्तन व स्व-विकास अशा टप्प्यांतून आपण आपल्या मध्ये नक्कीच बदल करू शकतो यावर पूर्ण विश्वास ठेवा मला खात्री आहे यश तुमचेच असेल.
drmakarandthombare@gmail. com