परदेशी शिक्षणासाठी प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचे- अर्जप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी लागणारी कागदपत्रे आणि प्रवेश मिळाल्यांनतर पुढील सर्व प्रक्रियांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अशा दोन गटांमध्ये वर्गीकरण करता येईल. प्रवेश मिळाल्यानंतर विसा मिळवणे व प्रवेश नक्की करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आय-२० सारख्या कागदपत्रांबद्दल विस्ताराने माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तूर्तास अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊया.

पदवी अभ्यासक्रमासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना, प्रत्येक अभ्यासक्रमासाठी समान अर्ज प्रक्रिया आहे. या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये शैक्षणिक गुणपत्रिका, प्रवेश परीक्षांचे स्कोअरकार्ड ( SAT/ ACT, IELTS, TOEFL), SOP, शिफारसपत्रे ( LOR) आणि रेझ्युमे इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो. त्याबरोबरच, विद्यार्थ्याला पालकांच्या आर्थिक स्थैर्याचे पुरावे (बँक स्टेटमेंट आणि सॉल्व्हन्सी लेटर) सादर करावे लागतात. अर्जप्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी अशाप्रकारे करता येईल.

● एस.ओ.पी. किंवा पर्सनल स्टेटमेंट

स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच एस.ओ.पी. हा परकीय विद्यापीठ अर्जप्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. एस.ओ.पी. म्हणजे थोडक्यात अर्जदार विद्यार्थ्याला स्वत:ची ओळख विद्यापीठाला करून देण्यासाठी मिळालेली एक संधी. एस.ओ.पी. मध्ये विद्यार्थ्याने आपली ओळख, विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेले यश, तसेच तो ज्या विषयामध्ये पदवी घेऊ इच्छितो त्याबाबत, त्याला स्वारस्य असलेल्या करिअरबाबत इत्यादी गोष्टींबाबत माहिती नमूद करणे आवश्यक असते. साधारणपणे, विद्यार्थी त्यांच्या एसओपीमध्ये शाळेमधील त्यांचा सर्वांगीण प्रवास मांडतात.

● शिफारसपत्रे (लेटर ऑफ रेकमेंडेशन्स)

अर्जदारास प्रत्येक विद्यापीठास दोन किंवा तीन शिफारसपत्रे पाठवावी लागतात. बरेचसे विद्यार्थी शिफारसपत्र त्यांना आवडणाऱ्या विषयांच्या शिक्षक/ प्राध्यापकांकडून घेतात. विद्यार्थ्यांनी दहावी ते बारावीदरम्यान उत्तमोत्तम प्रकल्प (प्रोजेक्ट्स) केले असल्यास त्यांना प्रकल्प मार्गदर्शक किंवा संशोधन केले असल्यास संबंधित मार्गदर्शक शास्त्रज्ञांकडून शिफारसपत्र घेता येते. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा तटस्थ दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी शिफारसपत्रे असतात. शिफारसपत्रे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे प्रतिनिधित्व करतात.

● सॅट व टोफेल किंवा आयइएलटीएस परीक्षांचे गुणपत्रक अर्जासाहित अर्जदाराने त्याचे सॅट किंवा अॅक्ट या परीक्षांचे गुणपत्रक तसेच टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण वा बॅण्डस्चे गुणपत्रक यांची सॉफ्ट कॉपी पाठवणे आवश्यक आहे. मात्र, अर्जप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांना हे गुण शुल्क देऊन स्वतंत्रपणे कळवावे लागतात.

● ट्रान्सक्रिप्ट्स

ट्रान्सक्रिप्ट्स म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना हव्या असलेल्या स्वरुपातील गुणपत्रके. ट्रान्सक्रिप्ट हे विद्यार्थ्याचे शैक्षणिक कामगिरीचे अधिकृत रेकॉर्ड असते, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे गुण आणि ग्रेड यांचा तपशील असतो. हे प्रामुख्याने नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी आवश्यक असते. ट्रान्सक्रिप्टमध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आणि शाळेचे नाव, विद्यार्थ्याने शिकलेले विषय आणि त्यांचे कोड्स (जर लागू असेल तर), प्रत्येक विषयाचे गुण (मार्क्स किंवा ग्रेड्स), सरासरी गुण ( GPA किंवा Percentage), अभ्यासक्रमाचा कालावधी, शाळेचा शिक्का आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी इत्यादी गोष्टी समाविष्ट असणे अपेक्षित आहे.

● बायोडेटा

शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक किंवा कोणत्याही शिक्षणेतर उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असल्यास ते परदेशी विद्यापीठासमोर सीव्ही च्या माध्यमातून मांडता येते. विद्यार्थ्याने त्याचा सीव्ही अनुभवी मार्गदर्शकांच्या मदतीने तयार करून घ्यावा. सीव्ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक व शिक्षणेतर अशा दोन्ही वाटचालीबाबत माहिती देत असतो.

● आर्थिक मदतीसंबंधित कागदपत्रे

परदेशातील विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कासहित, निवास व भोजन इत्यादी सर्व गोष्टी मिळून होत असलेल्या एकूण शुल्काचे आर्थिक प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट आणि काही विद्यापीठांच्या मागणीनुसार त्यांनी प्रवेश दिल्यानंतर त्यांना सॉल्व्हन्सी लेटर द्यावे लागते.

विद्यार्थ्यांसाठी

आपल्याकडे शाळेत असताना इंटर्नशिप किंवा प्रोजेक्टसाठी कुठेही काम करून ‘वर्क एक्सपिरियन्स’ मिळवणे हा प्रकार नाही. अमेरिकेत किंवा पश्चिमेतील अनेक देशांमध्ये शालेय स्तरावर विद्यार्थी ‘वर्क एक्सपीरियन्स’ मिळवू शकतात आणि त्याचा फायदा त्यांना पुढे विद्यापीठांच्या अर्जप्रक्रियेमध्ये होतो. भारतीय विद्यार्थ्यांनीही जर शक्य असेल तर कोणत्याही राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये काही दिवस काम करून अनुभव घेण्यास प्राधान्य द्यावे. कंपनीतील या कार्यानुभवाला तुम्ही तुमच्या पदवी अभ्यासक्रमासाठी निवडणार असलेल्या विषयाशी जोडायला विसरू नका.

theusscholar@gmail.com