परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणं निश्चित करत असताना कोणता विषय आणि अभ्यासक्रम निवडावा या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असू शकतं. मात्र, इथे अभ्यासक्रम म्हणजे आपल्याला आवडणारा विषय एवढंच नसून त्या विषयाची व्याप्ती, संशोधनासाठी त्या विषयाची अनुरूपता, इतर विद्याशाखांशी असलेला त्याचा संबंध आणि त्याचा पुढील स्कोप इत्यादी साऱ्या गोष्टी अभिप्रेत आहेत हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांचे संशोधनाप्रती असलेले प्रेम आणि आंतरविद्याशाखीय पैलूंवर असलेला भर समजून घेतला तर या विद्यापीठांमधील अभ्यासक्रम हे एक काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे लक्षात येतं आणि म्हणूनच परदेशात उच्चशिक्षणासाठी जाताना अभ्यासक्रम कसा निवडायचा याबाबत खालीलप्रमाणे काही निकष निश्चितच लावता येऊ शकतात.
परदेशात उच्चशिक्षणासाठी जाताना अभ्यासक्रम कसा निवडायचा याचा निर्णय घेणे ही एक आव्हानात्मक प्रक्रिया आहे. तुमच्या परदेशातील अभ्यासक्रमाद्वारे तुम्हाला काय साध्य करायचे आहे ते ठरवा. तुमच्या शैक्षणिक आवडी, करिअरच्या आकांक्षा, वैयक्तिक वाढीची उद्दिष्टे आणि तुम्हाला मिळवायचे असलेले कोणतेही विशिष्ट कौशल्य किंवा ज्ञान यांचा विचार करा.
तुमच्या आवडत्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची यादी बनवा. ही यादी फक्त तुम्ही शाळेत किंवा महाविद्यालयात शिकलेल्या विषयांचीच असण्याची कोणतीही आवश्यकता नाही. ती त्या व्यतिरिक्तसुद्धा असू शकते. त्याबरोबरच, तुम्ही ज्या देशांमध्ये जायचा विचार करत आहेत त्यांचीही एक यादी तयार करा. या दोन्ही गोष्टींना मध्यवर्ती ठेऊन प्रत्येक देशांतील शिक्षण व संशोधनाचा दर्जा, शिष्यवृत्ती किंवा इतर कोणतीही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता, भोजन व राहण्याचा खर्च, आणि तुमच्या कौशल्यांचा विकास या घटकांची तुलना करा.
उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये वैद्याकीय शिक्षण घेण्यासाठी तिथला ‘प्री-मेडिकल’ हा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. मात्र, ‘प्री-मेडिकल’ला प्रवेश मिळवण्यासाठीची किमान पात्रता विद्यार्थ्याने चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा ही आहे. नीट पाहिलं तर लक्षात येतं की अमेरिकेतील संपूर्ण वैद्याकीय शिक्षणाचा कालावधी बराच दीर्घ आहे. साधारणपणे, अमेरिकेतून वैद्याकीय शिक्षण पूर्ण करण्यास दहा ते अकरा वर्षांचा कालावधी लागतो. आता या सगळ्या गोष्टींची तुलना दुसऱ्या एका पर्यायाशी करता येईल. समजा, एखाद्या विद्यार्थ्याने अमेरिकेमध्ये वैद्याकीय शिक्षण न निवडता जीवशास्त्राशी संबंधित किंवा त्याच्या आवडीच्या इतर कोणत्याही विषयात पदवी, त्यानंतर पदव्युत्तर आणि पीएचडी पूर्ण केली तरी हा कालावधी वैद्याकीय शिक्षणाएवढाच होऊन विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अधिक उत्तम, सुरक्षित आणि किमान खर्चाचा असू शकतो.
विद्यापीठाचे शिक्षण शुल्क, राहण्याचा आणि भोजन खर्च इत्यादी आर्थिक बाबींची कठोरपणे चिकित्सा करा. फी वेव्हर, शिष्यवृत्ती किंवा इतर कोणतीही आर्थिक मदत या गोष्टींचे परदेशातील चलनाच्या तुलनेत मूल्यांकन करा. विद्यापीठाचे ठिकाण आणि अभ्यासक्रम तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याची खात्री करा.
विद्यापीठाच्या वेबसाइटचा संपूर्ण अभ्यास करा. भारतीय विद्यापीठांच्या वेबसाईटच्या तुलनेत परदेशी विद्यापीठांच्या वेबसाईट्स खूप माहितीपूर्ण असतात. तुमचे स्कूल, अभ्यासक्रम, प्राध्यापक, संशोधन संधी, विद्यापीठातील विविध क्लब्ज, कॅम्पसमधील सोयीसुविधा आणि विद्यार्थी सहाय्य सेवांबद्दल तपशीलवार माहिती पहा. परदेशातील बहुतांश विद्यापीठांचे ऑनलाइन माहिती सत्र नेहमी होत असतात. त्यातून विद्यापीठ, अभ्यासक्रम, आर्थिक मदत, प्लेसमेंट्स यांसारखी अधिक माहिती गोळा करण्यासाठी व्हर्च्युअल किंवा वैयक्तिक माहिती सत्र किंवा मेळ्यांना उपस्थित रहा. अॅडमिशन ऑफिस व तुम्ही अर्ज करणार असलेल्या विभागांतील प्राध्यापक यांच्याकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळवा. ते आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतात. याव्यतिरिक्त, विद्यापीठाचे वर्तमान किंवा माजी विद्यार्थ्यांपर्यंत लिंक्डइन, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा विद्यापीठाचे अॅलुम्नी पोर्टल या माध्यमांतून पोहोचता येईल. त्यांच्याकडून विद्यापीठाबद्दल असलेल्या शंकांचे निरसन करता येईल. जे विद्यापीठ तुमच्या मनात घोळतंय त्या विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचे लिंक्डइन प्रोफाईल्स चाळायला सुरुवात करा. त्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स कोणत्या कंपनीत झाले आहेत ते तपासून बघा.
लक्षात ठेवा, परदेशातील विद्यापीठामध्ये योग्य अभ्यासक्रम निवडणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे तुमचा वेळ घ्या, माहिती गोळा करा आणि तुमचा शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रवास समृद्ध करेल अशा अभ्यासक्रमाची निवड करा.
विद्यार्थ्यांसाठी…
अभ्यासक्रमांची माहिती मिळवा: https:// bigfuture. collegeboard. org या वेबसाईटवर परदेशातील विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पदवी आणि संबंधित करियर्सची माहिती मिळू शकते.
theusscholar@gmail. com