परदेशातील उच्चशिक्षणासाठी वेगवेगळ्या देशांनुसार विद्यार्थ्यांना कराव्या लागणाऱ्या तयारीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशपरीक्षा. परदेशात उच्चशिक्षणासाठी जाताना त्या-त्या देशानुसार द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा वेगवेगळ्या आहेत.
परदेशातील उच्चशिक्षण घेण्याचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमासाठी आणि कोणत्या देशात जायचे आहे हे व्यवस्थित ठरवता आले पाहिजे. बऱ्याचदा अमेरिकेचा थोडा बोलबाला झालेला आहे म्हणून तिकडच्या विद्यापीठांना अर्ज केला जातो किंवा कोणीतरी मित्र किंवा नातेवाईक अमेरिकेत आहेत म्हणून अमेरिकन विद्यापीठांना अर्ज पाठवले जातात. मात्र तसे न करता उच्चशिक्षणासाठी आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाचा विषय कोणत्या ठिकाणी उत्तम शिकवला जातो हे व्यवस्थितपणे पाहून मग त्या विद्यापीठाचा संबंधित विषयाच्या संशोधनात जागतिक क्रमवारीत कितवा क्रमांक आहे हे पाहून विद्यापीठाची किंवा देशाची निवड करणे योग्य ठरेल. काही प्रचलित पद्धतीही इथे वापरता येतील. उदाहरणार्थ, पदार्थविज्ञान किंवा मुलभूत विज्ञानाच्या कोणत्याही विषयांतील संशोधनासाठी जर्मनी किंवा इतरही अनेक युरोपीयन देश हे उत्तम पर्याय आहेत. संगणक अभियांत्रिकीसाठी अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांना विद्यार्थ्यांची प्रथम पसंती असते. तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी युके हा उत्तम पर्याय समजला जातो.
परदेशातील उच्चशिक्षणासाठी वेगवेगळ्या देशांनुसार विद्यार्थ्यांना कराव्या लागणाऱ्या तयारीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशपरीक्षा. परदेशात उच्चशिक्षणासाठी जाताना त्या – त्या देशानुसार द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरीक्षा वेगवेगळ्या आहेत. अर्थात अनेक परदेशी विद्यापीठे अमेरिकेतील प्रवेशपरीक्षांचे गुण ग्राह्य धरतात. परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशपरीक्षा या आपल्याकडील प्रवेशपरीक्षांसारख्या तुम्हाला ज्या विषयामध्ये प्रवेश हवा त्याच्याशी संबधित ज्ञान तपासणाऱ्या नाहीत. तुम्हाला कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असो-विज्ञान, अभियांत्रिकी, लॉ किंवा कला शाखा, सर्वांसाठी परीक्षा समानच असेल.
एकदा का कोणता अभ्यासक्रम करायचा हे ठरले की मग प्रश्न येतो कोणत्या देशामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा? आणि एकदा ठराविक देशाची निवड ठरली की मग प्रश्न येतो की तिथे प्रवेश मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या परीक्षा द्यायच्या? प्रत्येक देशानुसार व अभ्यासक्रमानुसार हे उत्तर वेगळे असेल. भारत इंग्रजी राष्ट्रभाषा नसलेला देश आहे म्हणून इंग्रजीची टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपैकी एक परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागते.
जर्मनी
अमेरिकेखालोखाल अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची पसंती जर्मनीला असते. अमेरिकेपेक्षा जर्मनीतील शैक्षणिक व्यवस्था थोडीफार वेगळी आहे. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्रात इथे जास्त परीक्षा नसतात. मग वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याला सगळ्या परीक्षा एकदम द्याव्या लागतात. जर्मनीमध्ये उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक बाबींमध्ये जरी जर्मन भाषेची गरज नसली तरी थोडीफार तरी जर्मन येणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याला जर्मनीत उच्चशिक्षण घेण्यासाठी फक्त इंग्रजीची परीक्षा ( English Proficiency Test) द्यावी लागते.जर्मनीतील बहुतांश विद्यापीठे आयइएलटीएस ( IELTS- International English Language Testing System) स्वीकारतात. फक्त आयइएलटीएसच्या उत्तम गुणांवर व उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमीवर जर्मनीत सहजरीत्या प्रवेश मिळू शकतो. मॅक्स प्लॅंक संशोधन संस्थेसारख्या नामांकित संशोधन संस्था इथे असल्याने साहजिकच विद्यार्थ्यांचा ओढा मुलभूत विज्ञान, अभियांत्रिकीतील विविध शाखा यांसारख्या अभ्यासक्रमाकडे असतो.
युके
व्यवस्थापन,शास्त्र, भाषा आणि कलाशाखेचे बरेचसे विषय किंवा त्यातील संशोधन यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून युकेला प्राधान्य दिले जातात. जागतिक मानांकनात असलेली यूकेतील ऑक्सफर्ड, केम्ब्रिजसारखी अनेक विद्यापीठे, विविध शाखांमध्ये सुरु असलेले उत्कृष्ट दर्जाचे संशोधन व एकूण जागतिक संशोधनात सर्वात जास्त असलेला वाटा या सर्व जमेच्या बाजू असल्याने युकेकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा नसेल तरच नवल. युकेमधील अर्जप्रक्रिया बव्हंशी जर्मनीशी साम्य दाखवणारी आहे. फॉल किंवा स्प्रिंगमधील प्रवेश, त्यावर आधरित अर्जप्रक्रिया व अंतिम मुदत. कोणत्याही विद्यापीठातील प्रवेशासाठी आयइएलटीएस किंवा टोफेलमध्ये किमान गुण. युकेमध्ये या दोन्ही परीक्षा वैध आहेत. पदवी प्रवेशासाठी SAT आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलिया
अमेरिका आणि युरोपनंतर ऑस्ट्रेलिया हे विद्यार्थी व पालकांचे पुढील शिक्षण घेण्यासाठीचे आवडते ठिकाण आहे. याचे महत्वाचे कारण अर्थातच तेथील शिक्षण. जगातील सर्वोत्कृष्ट शंभर विद्यापीठांपैकी सात विद्यापीठे ही ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्याबरोबरच, अमेरिकी व युरोपीय विद्यापीठांसारखीच उच्च शैक्षणिक दर्जा, संशोधनाची गुणवत्ता, अभ्यासानंतरच्या कामाच्या संधी आणि मुख्य म्हणजे शिक्षण-नोकरीनंतर ऑस्ट्रेलियामध्ये मिळवता येत असलेला पीआर, जो युरोप-अमेरिकेत आजच्या घडीला मिळवणं हे अवघड आहे, इत्यादी बाबींमुळे विद्यार्थी व पालकवर्ग सध्या ऑस्ट्रेलियाला बरंचसं प्राधान्य देताना दिसताहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पदवी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला जर्मनी-युकेसारखीच प्रक्रिया आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन विद्यापीठे टोफेलऐवजी आयइएलटीएस परीक्षा सहजपणे स्वीकारताना दिसतात.
हेही वाचा : यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
पालकांसाठी
पालकांनो, काही निर्णय तुम्ही तुमच्या मुलाच्या शालेय वयादरम्यानच घेऊ शकता. उदाहरणार्थ, शक्य असेल तर आपल्या मुलाला सीबीएसईऐवजी आयबी किंवा ब्रिटिश करिक्युलममध्ये प्रवेश घेऊ द्या. इथं प्रश्न फक्त अभ्यासक्रमाचा नाही तर आंतरराष्ट्रीय मानांकनाचा आहे. आयबी किंवा ब्रिटिश करिक्युलमसारख्या अभ्यासक्रमांमुळे तुमचा पाल्य त्याच्याबरोबर असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांबरोबर नेमका कुठे आहे याचे योग्य आकलन विद्यापीठास होते. याशिवाय,आयबी किंवा ब्रिटिश करिक्युलममधून मुलाने जर डिप्लोमा प्रोग्रॅम (अकरावी-बारावी) केला असेल तर त्याला पदवी अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळू शकतो. त्याला SAT परीक्षा देण्याची गरज नाही.ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी ओम मुनोत सांगतो की त्याने आयबी बोर्डमधून बारावी पूर्ण केली असल्याने त्याला सॅट परीक्षा द्यावी लागली नाही.
(लेखक करिअर समुपदेशक आहेत)
theusscholar@gmail.com