– आशुतोष शिर्के
शिक्षणाची समृद्ध परंपरा लाभलेला आणि संशोधनाच्या समृद्ध संधींनी विद्यार्थ्यांना खुणावणारा युरोपतील एक उत्तम पर्याय म्हणजे जर्मनी! अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञानासह जर्मनीतील विद्यापीठे समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषा आणि साहित्य यांसारख्या विषयांसाठीही जगप्रसिद्ध आहेत.
विद्यापीठे आणि शहरांचा परस्पर संबंध
जर्मनीत अनेक विद्यापीठे ही त्या-त्या शहरांची ओळख बनलेली आहेत. हिडलबर्ग, गॉटिंगेन, ट्युबिंगेन, आणि फ्रायबुर्ग यांसारखी शहरे विद्यापीठ-केंद्रित असल्यामुळे, इथलं संपूर्ण वातावरणच शैक्षणिक आहे.
कोणत्या क्षेत्रांसाठी जर्मनी उत्तम पर्याय आहे?
जर्मनी हे उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी सर्वोत्तम देशांपैकी एक आहे. अभियांत्रिकीपासून ते मानव्यशास्त्रांपर्यंत विविध शाखांमध्ये येथे उत्कृष्ट शिक्षण दिले जाते.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान : ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर्मनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि सिमेन्स यासारख्या कंपन्यांमुळे येथे उद्याोग आणि शिक्षणाचा उत्तम समन्वय आहे.
संगणक शास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) : डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि एआय यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये जर्मनीत उच्चस्तरीय अभ्यासक्रम आणि संशोधन संधी उपलब्ध आहेत.
व्यवसाय व्यवस्थापन : HHL Leipzig Graduate School of Management आणि Mannheim Business School या जगातील आघाडीच्या संस्थांमध्ये उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण दिले जाते.
वैद्याकीय आणि बायोसायन्सेस
औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन करणारी अनेक आघाडीची विद्यापीठे जर्मनीमध्ये आहेत.
समाजशास्त्र, मानव्यशास्त्र : जर्मनीत सामाजिक शास्त्र, मानवशास्त्र, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांमध्येही उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी उत्तम केंद्र आहे.
विद्यार्थ्यांसाठी अनुकूल धोरणे
ट्यूशन फी नाही : जर्मनीतील बहुतांश सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. केवळ नाममात्र शुल्क असते, जे सहामाहीसाठी सुमारे २००-४०० युरोच्या दरम्यान असते. DAAD ( German Academic Exchange Service) सारख्या संस्थांमार्फत भरघोस शिष्यवृत्ती उपलब्ध असल्याने शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. अर्थात जर्मन विद्यार्थी-व्हिसा मिळवण्यासाठी एका बँक-खात्यात ११,२०८ युरो (सुमारे दहा लाख रुपये) जमा करावे लागतात. याला ब्लॉक्ड अकाउंट म्हणतात, आणि याचा उपयोग दरमहा खर्चासाठी केला जातो.
विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी – परदेशी विद्यार्थी आठवड्याला २० तासांपर्यंत पार्ट-टाइम काम करू शकतात. मोठ्या शहरांतील स्टार्टअप्स आणि इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिपचीही संधी असते.
संशोधनाला मोठे प्रोत्साहन – मास्टर्स आणि पीएचडीसाठी संशोधन प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळेच जग भरातील संशोधकांसाठी जर्मनी हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
तयारी आणि प्रवेश प्रक्रिया
योग्य अभ्यासक्रम आणि विद्यापीठ निवड : DAAD च्या अधिकृत संकेतस्थळावरून अभ्यासक्रम आणि विद्यापीठांची माहिती घ्या.
भाषा आणि संवाद कौशल्य: अनेक मास्टर्स प्रोग्रॅम्स इंग्रजीमध्ये असले तरी जर्मन भाषा ( A1 किंवा A2 स्तर) शिकल्यास सोपे जाते. जर तुम्ही पदवी किंवा विशिष्ट कोर्स जर्मनमध्ये करणार असाल, तर जर्मन भाषेचा B2 किंवा C1 स्तर अनिवार्य असतो.
अभ्यासक्रम निवड आणि प्रवेश परीक्षा: काही विद्यापीठांसाठी GRE किंवा GMAT आवश्यक असते. TOEFL किंवा IELTS या इंग्रजी भाषेच्या परीक्षा द्याव्या लागतात.
APS Certificate: २०२३ पासून भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनीतील शिक्षणासाठी एपीएस प्रमाणपत्र अनिवार्य झाले आहे.
जागतिक दर्जाचे, स्वस्त आणि किफायतशीर शिक्षण आणि संशोधनाच्या उत्कृष्ट संधी, शिक्षण पूर्ण झाल्यावर युरोपियन युनियनमध्ये करिअर संधी – या सर्व कारणांमुळे अधिकाधिक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आज जर्मनीकडे वळत आहेत.
● mentorashutosh@gmail. com