Murli Dhar Gyanchandani’s Inspiring Journey : अनेकदा लोकांना व्यवसाय करायला आवडतो, पण योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. काही वेळा घरचा व्यवसायाचा विस्तार करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. अशावेळी व्यवसायात नेमकं नवीन काय करावं हे कळत नाही. आज आपण अशा एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय मोठा करताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
‘पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो’ ही टॅगलाइन तुम्ही ऐकली असेल. हो, ‘घडी डिटर्जंट’ या लोकप्रिय नावाशी संबंधित ही टॅगलाइन आहे. या घडी डिटर्जंटच्या निर्मितीमागे एक अशी व्यक्ती आहे, जिने फक्त हा ब्रॅण्ड निर्माण केला नाही तर हा ब्रॅण्ड शेवटपर्यंत बाजारात टिकवला. मुरलीधर ज्ञानचंदानी हे उद्योगजगतातील एक असं नाव आहे, जे लाखो लोकांना प्रेरणा देते.
उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
कानपूर येथील मुरलीधर ज्ञानचंदानी हे भारतातील सर्वात मोठ्या विश्वासार्ह आणि लोकप्रिय घडी डिटर्जंटचे मालक आहेत. हुरुन ग्लोबल रिच २०२४ च्या यादीत त्यांचे नाव झळकले होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींविषयी विचारले तर एलॉन मस्क, मुकेश अंबानी सारखी अनेक नावे तुमच्या डोळ्यासमोर येतील. पण, जेव्हा उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? असे विचारले तर सर्वांच्या डोळ्यासमोर एक नाव येते, ते म्हणजे मुरलीधर ज्ञानचंदानी यांचे.
शून्यातून विश्व निर्माण करणारे मुरलीधर ज्ञानचंदानी हे आज १२, ००० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. प्रसिद्धीच्या झोतात न राहता साधेपणाने आणि शो-ऑफ न करता जीवन जगणे त्यांना नेहमी आवडते.
मेहनतीच्या जोरावर निर्माण केला ‘घडी डिटर्जंट’ हा आयकॉनिक ब्रॅण्ड
मुरलीधर यांचे वडील दयालदास ज्ञानचंदानी हे साबणाचा व्यवसाय करायचे. ग्लिसरीन वापरून ते घरी साबण बनवायचे. पुढे त्यांचे भाऊ बिमल कुमार ज्ञानचंदानी आणि मुरलीधर यांनी हा व्यवसाय वाढवला. २२ जून १९८८ रोजी त्यांनी RSPL ( Rohit Surfactants Private Limited.) ग्रुपची स्थापना केली, ज्याने घडी डिटर्जंट पावडर आणि साबणाचे उत्पादने या ब्रॅण्ड अंतर्गत लाँच केले.
एकेकाळी ते सायकलवर साबण आणि डिटर्जंट विकायचे. पण, मेहनतीच्या जोरावर त्यांनी एक आयकॉनिक ब्रॅण्ड निर्माण केला, जो घराघरात पोहचला.
त्यांनी RSPL कंपनीला FMCG (Fast-moving consumer goods) बाजारातील एक विकसित कंपनी बनवली. सध्या ते RSPL ग्रुपचे चेअरमन आहेत. सध्या घडी डिटर्जंटचे ब्रॅण्ड अँबेसेडर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आहेत.