सरकारी महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयातील वर्ग ३ आणि ४ मधील एकूण ५००० पदे भरली जाणार आहेत. परिचारिकांची नियमित भरती होईपर्यंत परिचारिकांच्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्याच्या हेतूने आरोग्य सेवेसारख्या महत्त्वाच्या सेवेतील गट क व गट ड संवर्गातील पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमियोपॅथिक महाविद्यालांसह त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांतील ५ हजार पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये आरोग्य सेवेशी संबंधित महत्त्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी सरकारने ९ कंपन्यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. तर विरोधी पक्षांनी शासकीय सेवेतील नोकऱ्यांच्या खासगीकरणास विरोध केला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून कंत्राटी नोकरभरतीचे समर्थन करण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला त्याच दिवशी ९ खासगी कंपन्यांना मनुष्यबळ पुरवठा करण्यास सरकारने मान्यता दिली होती.
शिवाय दीड महिन्यांपूर्वी राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद, हौमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णांलयातील गट क व गट ड संवर्गातील ५ हजार ५६ पदे बाह्यस्रोतांमार्फत भरण्यास संमती देण्यात आली होती. या भरतीसाठीच्या १०९ कोटी ५२ लाख रुपयांसही मंजूरी देण्यात आली आहे. या कंत्राटी भरतीमागे २० ते ३० टक्के वेतनावरील खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यातं आलं आहे. त्यानुसार १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न १५ रुग्णालयांतील कंत्राटी नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा- मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर बंपर भरती; BMC रुग्णालयात काम करण्याची संधी
या शहरांमध्ये नोकरभरती –
ही नोकरभरीत प्रामुख्याने राज्यभरातील पुढील शहरांमध्ये केली जाणार आहे. त्यामध्ये सातारा, बारामती, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, अलिबाग, सिंधुदुर्ग, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांचा समावेश आहे.
या पदासांठी भरती –
- शिपाई, सफाई कामगार
- सुरक्षारक्षक
- प्लंबर
- वीजतंत्री
- दूरध्वनीचालक, यांबरोबरच लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, दंततंत्रज्ञ, रक्तपेढी सहाय्यक, MRI, ECG, इंटोस्कोपी तंत्रज्ञ, निर्जुतीकरण, क्षकिरण तंत्रज्ञ, इत्यादी वैद्यकीय सेवेशीसंबंधित तांत्रिक पदांचा समावेश आहे
तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये परिचारिकांसह ४० हून अधिक पदांचा समावेश आहे. या पदांमध्ये परिचारिका, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एमआयआर तंत्रज्ञ, औषधनिर्माता, क्ष किरण तंत्रज्ञ व साहाय्यक, ग्रंथपाल, डायलेसिस तंत्रज्ञ आदी पदांचा समावेश आहे.
वरील भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या अधिकृत नोकर भरतीच्या बेवसाईला अवश्य भेट द्या.