डॉ.भूषण केळकर , डॉ.मधुरा केळकर
मागच्या लेखात आपण पाहिलं की चांगला रेझ्युमे कसा लिहायचा. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे गटचर्चा. या गटचर्चेमधून यशाचा तत्त्वबोध कसा होईल याबद्दलचा आपला हा संवाद!
अनेक कंपन्या, गटचर्चा ही पद्धत वापरतात, कारण त्यातून कमी वेळामध्ये, व कमी मानव संसाधन अधिकारी वापरून, असलेल्या उमेदवारांमधून पटकन योग्य उमेदवारांना निवडता येते.
त्यामुळे मित्रांनो ह्या पद्धतीची माहिती घेणे, अभ्यास करणे, तयारी करणे हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. यातून कंपन्या उमेदवारांची संवाद कौशल्य, विचारांची स्पष्टता, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, नवीन विचार आणि सृजनशीलता तसेच टीम वर्क तपासत असतात.
गट चर्चेची प्रक्रिया अशी असते,
१) आधी पॅनल उमेदवारांना एक विषय देतात. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज किंवा एकत्र कुटुंब पद्धती की विभक्त कुटुंब असले विषय आता जुनाट झाले. कोणता विषय येऊ शकतो याबद्दल विचार करताना, उमेदवारांनी त्यांच्या स्वत:ची शिक्षणाची शाखा, कोणत्या कंपनीच्या निवड प्रक्रियेला तुम्ही बसता आहात, ती कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते, तसेच आजूबाजूच्या प्रचलित घडामोडी हे सर्व लक्षात घ्यायला हवे. सध्या येऊ शकणारे विषय म्हणजे तुम्ही जर का उदाहरणार्थ कॉम्प्युटर सायन्स शाखेचे असाल, तर ब्लॉकचेन तंत्रज्ञान- फायदे आणि जोखमी, डिजिटल पेमेंटचा वाढता वापर आणि त्याची सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी. याशिवाय पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, स्टार्ट अप्स आणि उद्याोगांचा वाढता प्रभाव, आत्ताच जाहीर झालेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, स्मार्ट हेल्थकेअर, स्वस्थ जीवनशैलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, युद्ध आणि शांततेची भूमिका- त्यातील आव्हाने, ट्रम्पची धोरणे इत्यादी विषयांची तयारी करायला हवी.
२) त्यानंतर गट चर्चेसाठी साधारणपणे १० ते १५ मिनिटे वेळात उमेदवाराला स्वत:चे विचार मांडायचे असतात. यासाठी काही महत्त्वाच्या सूचना,
अ) जेव्हा उमेदवार स्वत:ची ओळख करून देतात त्यावेळेला आपल्याकडच्या छोट्या कागदावर त्यांची नाव लिहून घेणे हे फायद्याचे ठरेल. त्यामुळे तुम्ही तुमचे मुद्दे मांडताना इतर उमेदवारांच्या मुद्द्यांचा त्यांच्या नावासकट उल्लेख करू शकाल. इतर उमेदवारांचे मुद्देही आपल्या कागदावरती अगदी थोडक्यात टिपून घेतल्यास तेही आपल्या बोलण्यातून सांगता येऊ शकतात आणि त्याचा एक वेगळाच प्रभाव परीक्षकांवर पडू शकतो. गटचर्चा सुरू होण्यापूर्वी काही वेळ दिला जातो, त्या वेळामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे बोलता येऊ शकतात, याबद्दलही थोडक्यात लिहून ठेवणे फायद्याचे ठरेल.
ब) गटचर्चा सुरू झाल्यानंतर जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी योग्य उदाहरणे आकडेवारी वापरणं चांगलं राहील. शांतपणे, स्पष्टपणे, ठामपणे आणि तर्कशुद्ध पणे बोलले पाहिजे जेणेकरून इतरांना तुमचा मुद्दा कमीत कमी शब्दात कळेल. इतरांना बोलू द्या, इतर बोलत असताना त्यांना अडवू नका. त्यांचं म्हणणंही लक्षपूर्वक ऐका. तुमच्या आधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करू नका. खूप विस्तृतता, वाचाळपणा, किंवा परतपरत तोच मुद्दा वेगळ्या शब्दात सांगणं हे टाळा. गटचर्चेत सक्रिय सहभाग घ्या. ज्याची चर्चा होत आहे त्याबद्दल खूप अलिप्त किंवा उदासीन राहू नका. विषयापासून भटकू नका. तुम्ही बोलत असताना सर्वांकडे पहा. बोलताना फक्त एकाच व्यक्तीकडे बघणं टाळा. तुमची देहबोली योग्य असल्याची खात्री करा. हलगर्जीपणा करू नका. हात किंवा पाय दुमडू नका, सीटवर मागे किंवा अति पुढे झुकून बसू नका. साधारण चर्चेचा वेळ किती झाला आहे, संपत आला आहे, याकडे लक्ष ठेवा. बहुतेक वेळा उमेदवारांचे ताणतणावामुळे किंवा आपल्याच विचारांमध्ये मग्न राहिल्यामुळे किंवा इतरांसोबत मतभेद झाल्यास त्याच्या रागामुळे, या गोष्टींकडे लक्ष राहत नाही. मन शांत ठेवा आणि वेळ संपत आल्याची जाणीव झाल्याबरोबर, पुढाकार घेऊन, झालेल्या चर्चेचा सारांश करणं अतिशय प्रभावशाली ठरेल.
आपण टीव्ही वर पाहतो तशी, राजकीय धुरळा उडवणारी गटचर्चा आपल्याला यश देणार नाही हे पक्के ध्यानात असू द्या!
bhooshankelkar@hotmail.com
mkelkar_2008 @yahoo.com