डॉ. महेश शिरापूरकर
आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर २ ची तयारी कशी करावी, याबाबत जाणून घेणार आहोत. या पेपरमध्ये भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया, भारतीय राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या प्रमुख पाच घटकांचा समावेश होतो.
भारतीय राज्यघटनेचा गाभा हा मूलभूत हक्कांमध्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये असल्याचे मानले जाते. यासाठी हक्काच्या संकल्पनेसह त्याचे प्रकार आणि उप-तरतुदी, यासंदर्भातील घटना दुरुस्त्या आणि न्यायालयीन निवाडे यांचा व्यवस्थित अभ्यास करावा. यातून स्वातंत्र्य प्राप्ती नंतर संसद आणि न्यायालय यांच्यात झालेला संघर्षही पुरेसा स्पष्ट होतो. मार्गदर्शक तत्वांच्या केंद्र आणि राज्य पातळीवरील अंमलबजावणीसाठी झालेल्या प्रयत्नांचा अभ्यास हा या तत्वांमागील तर्क, त्याचे स्वरूप आणि त्याच्या मर्यादा हे पैलू समजून घेत करावा. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची गती, कारणे, उपाययोजना याचा अभ्यास केल्यास या अंमलबजावणी यंत्रणेवर भाष्य करता येते. मुख्य परीक्षेच्या दृष्टीने घटना दुरुस्ती हा उपघटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे महत्त्वाच्या दुरुस्त्या काळजीपूर्वक अभ्यासाव्यात.
‘कारभारप्रक्रिया’ म्हणजे शासनयंत्रणेचे स्वरूप आणि वैशिष्टय़ होय. समग्र दृष्टिकोन अवलंबत संसदीय पद्धतीचा आणि न्यायमंडळाचा अभ्यास करावा. घटनात्मक तरतुदींबरोबरच त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहाराचाही सखोल अभ्यास करावा. मुख्य म्हणजे उदारीकरण, आघाडी शासन आणि संघराज्य, अंतर्गत सुरक्षा, संसदेचे पतन, राष्ट्रपतींची सक्रियता, न्यायालयीन अवमान इत्यादी सारख्या घटनात्मक व्यवहारातून समोर येणाऱ्या मुद्दय़ांचे अद्ययावत टिपण तयार करावे. राज्यघटनेत उल्लेख असलेल्या तीन शासनसंस्थांदरम्यानचे सत्ताविभाजन आणि प्रत्यक्ष व्यवहारातून आकार घेणारे सत्ताविभाजन यासारख्या कळीच्या मुद्दय़ांचा नेमका अभ्यास करावा. केंद्र सरकार, घटकराज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे तिन्ही स्तर विचारात घेऊन शासनाची चौकट समजून घ्यावी. तसेच विविध घटनात्मक आयोग आणि संस्था याबरोबरच बिगर-घटनात्मक संरचनांचाही अभ्यास, तसेच त्यांच्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यातून पुढे येणारे कळीचे मुद्दे यांचाही चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास करावा.
भारतीय राज्यघटना आणि कारभारप्रक्रिया हा मूलत: स्थिर स्वरूपाचा घटक असला तरी २०१४ पासूनच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकातील पारंपरिक बाबींवर थेटपणे प्रश्न न येता चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारल्याचे दिसून येते.
भारतीय राज्यव्यवस्था : संसदीय शासनपद्धतीमधील संसद आणि राज्य विधिमंडळाची रचना, कार्ये, सभागृह कामकाज, अधिकार, विशेष हक्क, संसद आणि विधिमंडळातील चर्चेचा दर्जा, विधेयक, विरोधी पक्षांची भूमिका, संसदीय समित्या, सभापती-अध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी, विशेष हक्कांचा दुरुपयोग आणि संसदेची समर्पकता या विषयांच्या अनुषंगाने अभ्यास करावा लागतो. माहितीचा अधिकार, जनहित याचिका, न्यायाधिकरणे, स्पर्धा अपिलीय न्यायाधिकरणे यांसारख्या राज्यव्यवस्थेतील विवादांचे निराकरण करण्यासाठीच्या संस्थात्मक रचनांचाही तपशीलवार अभ्यास करणे आवश्यक आहे.
राज्यव्यवस्थेतील विविध घटकांची तयारी करताना अभ्यासविषयाची व्याप्ती निश्चित करणे आवश्यक ठरते. उदा. दबावगट या घटकाचा अभ्यास करताना त्याचे अर्थ, प्रकार, वैशिष्टय़े, कार्ये, तंत्रे, दबावगटांच्या कार्यातील उणीवा आणि त्यावर केलेले भाष्य, चर्चेत असलेल्या दबावगटाकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे, त्याचे परिणाम, इत्यादी बाबी सूक्ष्म पद्धतीने अभ्यासाव्या लागतील. अभ्यासक्रमातील मूलभूत घटक आणि त्याविषयीच्या चालू घडामोडी यांची सांगड घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर आणि चौकस वाचनाबरोबरच सतत विचार-चिंतन-मनन करण्याची सवय लावून घ्यावी.
सामाजिक न्याय या घटकाच्या तयारीसाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास यांसारख्या सामाजिक क्षेत्रविकास आणि व्यवस्थापन याच्याशी संबंधित मुद्दय़ांबाबत सरकार जे उपक्रम राबवते, त्याविषयी माहिती मिळवावी. यामध्ये सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना, राष्ट्रीय (ग्रामीण आणि शहरी) आरोग्य अभियान, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, बेटी बचाओ-बेटी पढाओ इत्यादी कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात. शासनाकडून सामाजिक क्षेत्रावर केल्या जाणाऱ्या खर्चाची परिणामकारकता आणि असा खर्च करण्यामागील भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, आरोग्याचा सार्वत्रिक विस्तार, उच्च शिक्षण क्षेत्राची सद्य:स्थिती याविषयी माहिती करून घेणे उपयुक्त ठरेल. दारिद्र्याशी संबंधित घटकाच्या तयारीसाठी दरवर्षी प्रसिद्ध होणारे आर्थिक सर्वेक्षण अहवाल जरूर पाहावेत.
‘आंतरराष्ट्रीय संबंध’ आणि परराष्ट्र धोरण या घटकाचा अभ्यास करताना गेल्या काही दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले बदल व त्याचा भारतावरील प्रभाव व या बदलांना प्रतिसाद म्हणून आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केलेला बदल व रणनीती याचे सूक्ष्म आकलन करून घ्यावे.
आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचे अध्ययन करताना संघटनांची संरचना, अधिदेश याबाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा चालू घडामोडींच्या आनुषंगाने अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल. बऱ्याचदा परीक्षेमध्ये संघटनेशी संबंधित एखादी बाब चर्चेत असल्यास त्यावर प्रश्न विचारला जातो.
या घटकाची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके, इंडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत, युनिक प्रकाशनाची ‘भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया’ (खंड १) आणि ‘राजकीय सिद्धांत-संकल्पना व भारतीय राज्यघटना’ (NCERT पॅटर्नवर आधारित) इ. संदर्भ ग्रंथांद्वारे याविषयाशी निगडित मूलभूत बाबींचे आकलन करून घ्यावे. याशिवाय पुढील काही बाबी विचारात घेतल्यास या विषयाची अधिक चांगली तयारी करता येईल. आयोगाने या पेपरसाठी दिलेला अभ्यासक्रम अगदी तोंडपाठ असावा. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकरणांचा आणि त्यातील घटक-उपघटकांचा अभ्यास करावा लागणार आहे, हे स्पष्ट होईल. या प्रकरणांशी संबंधित अधिकृत आणि अद्ययावत संदर्भसाहित्य निश्चित करून ते प्राप्त करावे. त्यानंतर आयोगाच्या परीक्षेचा आकृतिबंध समजून घ्यावा. याद्वारे अभ्यासक्रमातील विविध प्रकरणांचे वेटेज लक्षात आल्यास त्यानुसार तुमच्या अभ्यास साहित्याची, वेळेची विभागणी करता येईल. अभ्यासक्रमातील सर्व प्रकरणांच्या तयारीसाठी किती वेळ (कालावधी) लागेल याचे वेळापत्रक तयार करावे आणि त्याचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. या मोठय़ा वेळापत्रकाचे परत आपल्या सोयीनुसार अभ्यासक्रमातील सेक्शनप्रमाणे किंवा आठवडय़ाप्रमाणे उप-नियोजन करावे. स्पर्धा परीक्षांची तयारी कधीही आणि कोणत्याही परीक्षेसाठी करत असाल तर ती प्रमाणित, दर्जेदार अभ्यास वा संदर्भसाहित्यातूनच करावी. अन्यथा वेळ वाया जाण्याबरोबरच चुकीची किंवा संदिग्ध माहिती आपण अभ्यासतो, ज्यातून अपेक्षित निकाल साध्य होत नाही. प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला चालू घडामोडींचा आधार द्यावा. परीक्षेचे स्वरूप दीघरेत्तरी असल्यामुळे सातत्याने लिहिण्याचा सराव करावा. विविध टेस्ट सिरीज सोडवाव्यात. मागील प्रश्नपत्रिकांचे वारंवार विश्लेषण करावे. यासंदर्भातील रेडीमेड पुस्तके घेतलेली असली तरी स्वत: मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलेले अधिक फायद्याचे ठरते. स्वत:च्या तयारीबाबत जाणकार सहकारी, विषयतज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन घेत राहावे.