फारुक नाईकवाडे
मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक आणि पेपर चारमध्ये समाविष्ट कृषी घटकाच्या आर्थिक पैलूंची तयारी एकत्रितपणे पेपर चारमधील अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न करून केल्यास जास्त फायदेशीर ठरते. ही तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व
* कृषी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेण्यासाठी केंद्र व राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून GDP, GNP, रोजगार, आयात- निर्यात यातील कृषी क्षेत्राचा वाटा (टक्केवारी) पहायला हवा. याबाबत उद्योग व सेवा क्षेत्राशी कृषी क्षेत्राची तुलना लक्षात घ्यावी.
* वस्तू व सेवा करामध्ये कृषी निविष्ठा म्हणून वापरल्या जाणाऱ्या खते, यंत्र अशा उत्पादनांवरील करांचे दर लक्षात घ्यावेत. कृषी उत्पन्नावरील करांमध्ये कोणत्या उत्पादनांचा समावेश केला वा वगळला आहे ते पहायला हवे. करांच्या दरामध्ये बदल झाला असेल तर त्याबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.
* कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत GATT व WTO चे महत्त्वाचे करार व त्यातील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. या तरतुदी व घडामोडींचा भारतीय कृषी क्षेत्रावरील व निर्यातीवरील परिणाम समजून घ्यावा. शेतकरी व पैदासकारांचे हक्क व त्यांचे स्वरूप व अंमलबजावणी यांचा आढावा घ्यायला हवा.
* सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी हे मुद्दे समग्रलक्षी अर्थशास्त्रातील मुद्रा/पैसा या मुद्दय़ांबरोबर अभ्यासणे योग्य ठरेल.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
* महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची महत्त्वाची पिके, त्यांची उत्पादकता, खते व अन्य नवीन तंत्रज्ञानाचा वापर, जमीन धारणेचे प्रमाण, पतपुरवठय़ाचे स्वरूप, कर्जबाजारीपणा इत्यादी वैशिष्टय़े बारकाईने समजून घ्यावीत. याबाबत उर्वरित भारताच्या तुलनेत राज्याचे स्थान समजून घेण्यासाठी आर्थिक पाहणी अहवालातील ठळक टक्केवारी पाहणे उपयोगी ठरते.
* महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण, कृषी व ग्रामीण पायाभूत संरचना (सामाजिक आणि आर्थिक) आणि ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इ. बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल. याबाबत शासनाच्या नव्या योजनांची माहिती असायला हवी.
आर्थिक विकासात शेतीची भूमिका
* कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांमधील आंतरसंबंध पहाताना कृषी आधारित व संलग्न उद्योगांचे स्वरूप, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व या बाबींचा आढावा घ्यावा.
* भारतातील कृषी विकासातील प्रादेशिक असमानता कारणे, त्यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक/ सामाजिक/ राजकीय समस्या, त्यावर केले जाणारे शासकीय व अन्य उपाय, अन्य संभाव्य उपाय अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावी.
कृषी उत्पादकता
* कृषी क्षेत्राच्या कमी उत्पादनक्षमतेची कारणे, त्याचे परिणाम व संभाव्य उपाय यांचा टेबलमध्ये अभ्यास शक्य आहे. उपायांमध्ये शासकीय धोरणे, योजना (जुनी आणि अद्ययावत अशी सर्व), चर्चेतील नवीन तंत्रज्ञान, पिकांचे नवीन वाण असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
* शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठीचे प्रयत्न म्हणून हरित क्रांती, तंत्रज्ञान विषयक बदल व जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, शेतीचे यांत्रिकीकरण हे मुद्दे अभ्यासावेत. यासाठी त्यातील तंत्रज्ञान, त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम, समस्या, कारणे व उपाय असे मुद्दे पहावेत.
* मूलभूत शेतीविषयक निविष्ठा या शेतीची उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या मूलभूत बाबी आहेत. यामध्ये जमीन (शेतीचे आकार), बियाणे, खते, कीटकनाशके, यंत्रे, अवजारे, वित्तपुरवठा, कामगार/ श्रमिक यांचे योग्य प्रमाण, त्यातील कमी आधिक्यामुळे उत्पादकतेवर होणारा परिणाम, त्याबाबतचे अर्थशास्त्रीय सिद्धांत, पुरवठय़ाबाबतच्या समस्या, कारणे, उपाय हे मुद्दे पहावेत.
* महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली पहिली ३ राज्ये व क्रमवारीतील महाराष्ट्राचा क्रमांक तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असेलेले पहिले ३ जिल्हे माहीत करून घ्यावेत.
* महत्त्वाच्या पिकांसाठी राज्यातील उत्पादकता कमी जास्त का आहे याची कारणे तसेच त्याचे सामाजिक, आर्थिक परिणामही समजून घ्यावेत व त्यावरील विविध उपाययोजना माहीत करून घ्याव्यात. यामध्ये शासकीय योजनांवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ICAR, MCAER अशा संस्थांचे कार्य समजून घ्यावे. या संस्थांची रचना, स्थापना वर्ष, कार्य, उद्दीष्ट समजून घ्यावे.
* शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण, शेतकऱ्याचे व कृषी उत्पादन वाढ यासाठीची शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम पुढील मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावीत : कालावधी, ध्येय, संख्यात्मक उद्दीष्टे, महत्त्वाच्या तरतुदी, अनुदानाचे वा इतर लाभाचे स्वरूप, लाभार्थ्यांचे निकष, यश, अपयश, महत्त्वाचे संबंधित मुद्दे
कृषी मूल्य, किंमत निर्धारण, विपणन
* कृषी मूल्यांमध्ये विविध निविष्ठांच्या किमतींमुळे होणारा खर्च समाविष्ट होतो. यामध्ये समाविष्ट विविध घटकांमुळे कृषी उत्पादनाच्या मूल्यावर होणारा परिणाम समजून घ्यावा.
* कृषी किंमत निर्धारणातील मूल्य, मागणी, पुरवठा, शासकीय धोरणे, किमान आधारभूत किंमत, आयात/ निर्यातीबाबतचे धोरण अशा मुद्दय़ांचा होणारा परिणाम समजून घ्यावा. वेगवेगळय़ा कृषी मालाच्या विविध शासकीय आधारभूत किमती माहित असायला हव्यात.
* कृषी उत्पादनाच्या किंमत निर्धारणामध्ये कृषी अनुदानाचे महत्त्व समजून घ्यावे. GATT करारामधील तरतुदींचा कृषी अनुदान, मूल्यनिर्धारण आणि आयात/निर्यातीवर होणारा परिणाम व त्याबाबतची भारताची भूमिका हे मुद्दे बारकाईने अभ्यासावेत.
* कृषी कृषी विपणनामध्ये समाविष्ट यंत्रणा, साठवणूक, वाहतूक व इतर पायाभूत सुविधा, त्यांचे महत्त्व, समस्या, जोखमीचे प्रकार, कारणे, परिणाम व उपाय अशा मुद्दय़ांच्या आधारे विपणनाचा अभ्यास करावा.
* कृषी विपणनासाठीची बाजार रचना, त्यांचे नियंत्रण करणारे कायदे व त्यातील ठळक तरतुदी, कृषी बाजाराबाबतचे अद्ययावत शासकीय निर्णय या मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे.
* सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे स्वरूप, त्यामध्ये समाविष्ट यंत्रणा, वखारी, साठवणूक व इतर समस्या, तिचे अन्न सुरक्षा व सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा महत्त्व समजून घ्यावे.
* अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या सर्व शासकीय संस्थांचा अभ्यास स्थापना, बोधवाक्य, उद्दीष्ट, रचना, कार्यपद्धत, नियंत्रक विभाग, निधीचा स्त्रोत व मूल्यमापन अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.
ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पत पुरवठा
* ग्रामीण कर्जबाजारीपणाचा अभ्यास कारणे, स्वरूप, उपाय व परिणाम या मुद्दय़ांच्या अनुषंगाने करायला हवा. भारतीय कृषी क्षेत्रात कर्जाची गरज निर्माण होण्याची सामाजिक, आर्थिक व अन्य कारणे समजून घ्यावीत.
* कृषी पतपुरवठय़ाचे वर्गीकरण अभ्यासताना पतपुरवठा करणारे स्त्रोत, त्यांचे स्वरूप, त्यांतील समस्या, कर्जबाजारीपणाची कारणे, परिणाम, त्यावरील शासकीय उपाय योजना (योजनांचे उद्दीष्ट, लाभाचे स्वरूप, निकष, मूल्यमापन) समजून घ्यावे. * संस्थात्मक पत पुरवठय़ातील फायदे, परपुरवठा करणाऱ्या संस्थांची स्थापना, रचना, उद्दिष्टे, कार्यपद्धती व तिचा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होणारा परिणाम, कर्ज परतफेडीचे प्रकार, त्याबाबतच्या शासकीय योजनांमधील तरतुदी हे मुद्दे समजून घ्यावेत.