उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही अलीकडे पदवी अभ्यासक्रमासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. इतर देशांमधील बहुतेक विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया अमेरिकन विद्यापीठांच्या प्रवेश पद्धतीशी मिळतीजुळती आहे. या पार्श्वभूमीवर, या लेखमालेमध्ये, बारावीमध्ये असलेल्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमांसाठी कशी तयारी करावी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
सध्याच्या बदलत्या व धावत्या युगात तरुणाईला जेवढे परदेशी उपकरणांचे व ब्रँड्सचे आकर्षण आहे, तेवढेच आकर्षण परदेशी शिक्षणाबद्दल आहे. पाश्चात्य देशांच्या विकासामध्ये तेथील शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आताची ही पिढी निश्चितच ओळखून आहे. कदाचित म्हणूनच चांगल्या शाळेतून उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी किंवा काहीजणांच्या बाबतीत पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेश निवडणे हा आता प्रत्येकाचा मार्ग बनू पाहत आहे. अर्थात त्याला कारणेसुद्धा तशी आहेत- शिक्षण व संशोधनाच्या अद्यायावत व अभिनव वाटा, अद्यायावत उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा, जागतिक दर्जाचा तज्ज्ञ मार्गदर्शक वर्ग, अर्थार्जन करत शिक्षण पूर्ण करण्याची संधी व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उत्कृष्ट वेतनाची हमी. या व अशा अनेक कारणांमुळे सध्या बरेच विद्यार्थी परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेण्यास प्राधान्य देत आहेत.
परदेशात उच्चशिक्षण घेणाऱ्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा मराठी टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे मध्यमवर्गीय किंवा उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. नोकरी किंवा व्यवसाय करणारे या विद्यार्थ्यांचे पालक, आपल्या पाल्याच्या परदेशातील उच्चशिक्षणाचा खर्च सहन करू शकतात. तरीही पालकांची वा विद्यार्थ्यांची मनोमन इच्छा हीच असते की परदेशातील उच्चशिक्षण घेण्यासाठी एखादी शिष्यवृत्ती ( Scholarship) किंवा पाठ्यवृत्ती (Fellowship) मिळावी. परदेशात उच्चशिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना तेवढ्याच प्रमाणात शिष्यवृत्ती उपलब्ध आहेतदेखील, हे विशेष. बऱ्याचदा आपल्याकडील चांगल्या मुलांना क्षमता असूनही पुरेशा माहितीअभावी किंवा योग्य नियोजन नसल्याने परदेशी विद्यापीठात शिष्यवृत्तीअभावी किंवा शिक्षण शुल्कामध्ये जास्त कपात (फी वेव्हर) न होता प्रवेश मिळतो आणि विनाकारण पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. योग्य माहिती घेतली व व्यवस्थित नियोजन केलं तर योग्य विद्यापीठ आणि कमीत कमी खर्चामध्ये परदेशातलं शिक्षण हे दोन्ही फायदे विद्यार्थी-पालकांना मिळवता येतात.
खरंतर परदेशातील उच्चशिक्षण ही खूप अगोदरपासून नियोजनबद्ध करण्याची बाब आहे. आपल्याकडे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण हे पदव्युत्तर शिक्षणासाठी जातात. अर्थात आता पदवी अभ्यासक्रमासाठीदेखील बारावीनंतर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देशाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अधिकाधिक विद्यार्थी हे विज्ञान-अभियांत्रिकी शाखेचे असतात. त्याखालोखाल वैद्याकीय,फार्मसी, व्यवस्थापन आणि कला शाखेतील विद्यार्थी परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्ज करतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जाणारे असतात. हे विद्यार्थी भारतात असताना येथील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आता पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे असा विचार सुरू करतात.
इतर शाखांच्या तुलनेत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र परदेशातील उच्चशिक्षणाबाबतीत थोडी अधिक जागृती आहे. कदाचित म्हणून बरेचसे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असतानाच परदेशातील पुढच्या शिक्षणाची तयारी सुरू करतात. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग तिथेच पीएचडीला अर्ज करायचा असाही बऱ्याचजणांचा विचार असतो. तो योग्यही आहे. त्यातही परदेशातील उच्चशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेकडे असतो. मात्र, उच्चशिक्षणासाठी अमेरिकेबरोबरच युके आणि युरोपमधील इतर देश हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत. त्याबरोबर फक्त अभियांत्रिकीमधूनच नाही तर इतरही शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासक्रमांसाठी परदेशात उच्चशिक्षणासाठी जाता येते व ते ही फक्त ‘मास्टर्स’ला नाही तर पीएचडीसाठीसुद्धा. जशी ही बाब पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तशीच ती पदवी अभ्यासक्रमाचीदेखील. बारावीनंतर परदेशात शिकायला जाणं सोपं व फायदेशीर आहे. बऱ्याचदा पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक शिष्यवृत्ती मिळतात. त्यामुळे पदवी घेण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांनी परदेशातील चांगल्या विद्यापीठांच्या पर्यायांचा विचार करायला हवा.
पालकांसाठी आधी पासपोर्ट….
परदेशात जाण्यासाठी हवी असणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पासपोर्ट. परदेशी सहलीसाठी म्हणा किंवा भविष्यात कधीतरी परदेशी जायचे या विचारांमुळे आजकाल खेड्यात वा शहरात राहणाऱ्या बऱ्याच जणांकडे पासपोर्ट हा असतोच. पण पासपोर्ट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पासपोर्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तो लवकरात लवकर अगदी ‘तत्काल’ सेवेमध्येही मिळवू शकता. पालकांनो तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करत असताना तुमच्याबरोबर तुमच्या पाल्याच्या पासपोर्टसाठीदेखील अर्ज करा. कारण बऱ्याचदा ‘अजून त्याला ‘बाहेर’ जायला भरपूर वेळ आहे तर आत्ताच कशाला तेव्हा बघू’ किंवा ‘त्यावेळी काढता येईलच की’ अशी विचारसरणी होऊ देऊ नका. याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या मुलांच्या विद्यार्थीदशेदरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी आंतरराष्ट्रीय सहली, समर प्रोग्रॅम्स, वर्कशॉप्स, स्कूल ट्रिप्स किंवा एखादी शिष्यवृत्ती यांसारख्या माध्यमांतून कधीही उपलब्ध होऊ शकतात त्यावेळी पासपोर्टसाठी गडबड करण्याऐवजी तो अगोदरच हातामध्ये असलेला केव्हाही चांगला.
(लेखक करिअर समुपदेशक आहेत)
theusscholar@gmail.com