आशुतोष शिर्के
स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणजे स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क. हे देश, उच्च शिक्षणाच्या दर्जासाठी आणि संशोधनाला मिळणाऱ्या प्राधान्य व प्रोत्साहनासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रमाणेच मानव्यशास्त्र, समाजशास्त्र, कला, व्हिज्युअल आर्ट्स आणि डिझाईन या क्षेत्रांमध्येही हे देश भारतीय विद्यार्थ्यांसाठी आकर्षक संधी उपलब्ध करतात.
● उत्कृष्ट विद्यापीठे आणि अभ्यासक्रम
स्वीडनमधील उप्साला विद्यापीठ आणि लुंड विद्यापीठ मानव्यशास्त्र आणि समाजशास्त्रातील अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. उप्साला येथील ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन ग्लोबल स्टडीज’ हा अभ्यासक्रम जागतिक सामाजिक समस्यांवर संशोधनाला प्रोत्साहन देतो. लुंड येथे ‘सोशल स्टडीज ऑफ जेंडर’ हा अनोखा अभ्यासक्रम लिंग आणि समाज यांचा परस्परसंबंध शिकण्याची संधी देतो. कला आणि डिझाईनसाठी स्टॉकहोम मधील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स’ येथे व्हिज्युअल आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स इत्यादि विषयांमधील असंख्य प्रगत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
नॉर्वेमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओस्लो समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्रातील संशोधनासाठी उत्तम मानले जाते. येथील ‘मास्टर इन पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज’ हा अभ्यासक्रम शांती आणि सामाजिक सुसंवाद यावर केंद्रित आहे. सामाजिक बदल घडवण्याची प्रेरणा देणारा हा अभ्यासक्रम जागतिक स्तरावर एक महत्वाचा अभ्यासक्रम मानला जातो. नॉर्वेजियन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन ( AHO) मध्ये डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनचे अभ्यासक्रम शाश्वत पर्यावरणपूरक रचना म्हणजेच सस्टेनेबल डिझाईनवर भर देतात.
डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठ हे मानव्यशास्त्र आणि सांस्कृतिक अभ्यासांसाठी ओळखले जाते. येथील ‘मास्टर ऑफ सोशल सायन्सेस इन एन्थ्रोपॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सांस्कृतिक विविधतेचा अभ्यास करतो. ‘रॉयल डॅनिश अॅकेडेमी ऑफ फाइन आर्ट्स’ येथील व्हिज्युअल आर्ट्स आणि डिझाईनचे अभ्यासक्रम सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आहेत.
● तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि इतिहासाचे अभ्यासक्रम
स्वीडनमधील उप्साला विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचा ‘मास्टर ऑफ फिलॉसॉफी’ हा अभ्यासक्रम महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये नीतिशास्त्र आणि मेटाफिजिक्स यांसारख्या विशेष शाखांचा समावेश आहे. लुंड विद्यापीठ येथे प्रॅक्टिकल फिलॉसॉफी मध्ये मास्टर्स करता येऊ शकते. ह्या कोर्समध्ये राजकीय तत्त्वज्ञान शिकवले जाते. समाजशास्त्रामध्ये स्टॉकहोम विद्यापीठामधील मास्टर ऑफ सोशियॉलॉजी, सामाजिक असमानता आणि स्थलांतर यावर केंद्रित अभ्यासक्रम आहे, तर गोथेनबर्ग विद्यापीठामध्ये ‘सोशियॉलॉजी ऑफ लॉ’ असा एक अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय नॉर्वेमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ओस्लो’ विद्यापीठातील ‘मास्टर ऑफ फिलॉसॉफी’, सोशियोलॉजी मध्ये याच विद्यापीठातील सामाजिक चळवळींवर अधारित अभ्यासक्रम, तसेच बर्गेन विद्यापीठातील ‘मास्टर ऑफ हिस्ट्री’ हा समुद्री इतिहासावर केंद्रित असलेला विशेष अभ्यासक्रम. डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठातील तत्त्वज्ञानामधील ‘फिनॉमिनॉलॉजी’ ह्या विषयावर आधारित ‘मास्टर ऑफ फिलॉसॉफी’, आरहूस विद्यापीठातील गुन्हेगारीशास्त्रावर केंद्रित असणारा ‘मास्टर ऑफ सोशियॉलॉजी’, तर बौद्धिक चळवळींच्या इतिहासावर आधारित ‘मास्टर ऑफ हिस्ट्री ऑफ आयडियाज’, कोपनहेगन विद्यापिठातील शहरी इतिहासाचा अभ्यासक्रम अशी ही यादी लांबच लांब करता येऊ शकते.
● संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्स
संगीतासाठी, स्वीडनमधील स्टॉकहोम शहरातील ‘रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक’ येथे बॅचलर ऑफ म्युझिक परफॉर्मन्स आणि कम्पोझिशन शिकवले जाते. गोथेनबर्ग विद्यापीठामध्ये मास्टर ऑफ म्युझिकॉलॉजी हा महत्त्वाचा कोर्स उपलब्ध आहे. नॉर्वेमधील नॉर्वेजियन अॅकेडेमी ऑफ म्युझिक येथे मास्टर ऑफ कंडक्टिंग आणि बॅचलर ऑफ म्युझिक परफॉर्मन्स उपलब्ध आहे. डेन्मार्कमधील रॉयल डॅनिश अकादमी ऑफ म्युझिक, कोपनहेगन येथे मास्टर ऑफ म्युझिक परफॉर्मन्स आणि साउंड इंजिनीअरिंग शिकवले जाते.
नृत्य आणि परफॉर्मिंग आर्ट्ससाठी, स्वीडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ डान्स अँड सर्कस, स्टॉकहोम येथे बॅचलर ऑफ डान्स परफॉर्मन्स आणि मास्टर ऑफ कोरिऑग्राफी हे महत्त्वाचे अभ्यासक्रम आहेत. नॉर्वेजियन अकादमी ऑफ डान्स, आधुनिक आणि जॅझ नृत्य शिकवते, तर युनिव्हर्सिटी ऑफ स्टॅव्हेंजर नॉर्डिक लोकनृत्यावर अभ्यासक्रम ऑफर करते. डेन्मार्कमधील ‘डॅनिश नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’, समकालीन नृत्य आणि थिएटरचा समावेश असलेले ‘बॅचलर ऑफ डान्स अँड कोरिऑग्राफी’ आणि ‘मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ हे महत्त्वाचे अभ्यासक्रम चालवतात.
● खर्च आणि शिष्यवृत्ती
स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये शिक्षणाचा खर्च इतर युरोपीय देशांपेक्षा कमी आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये बिगर-युरोपीय विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन फी दरवर्षी १०,००० ते १६,००० युरो (अंदाजे १०-१६ लाख रुपये) आहे. नॉर्वेतील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये ट्यूशन फी नाही, परंतु सेमिस्टर फी (५०-१०० युरो) आणि राहण्याचा खर्च (१०,०००-१२,००० युरो प्रति वर्ष) लागतो. राहण्याचा खर्च ह्या सर्व देशांमध्ये साधारणपणे १२-१५ लाख रुपये वार्षिक इतका आहे. शिष्यवृत्तींसाठी अनेक पर्याय आहेत. स्वीडनमधील ‘स्वीडिश इन्स्टिट्यूट स्कॉलरशिप’ अंतर्गत मास्टर्ससाठी पूर्ण ट्यूशन फी आणि राहण्याचा खर्च मिळू शकतो. नॉर्वेमधील क्वोटा स्कीम स्कॉलरशिप भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. ही शिष्यवृत्ती काही निवडक अभ्यासक्रमांसाठी आहे. डेन्मार्कमधील डॅनिश गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मेरिटवर आधारित असून याद्वारा ट्यूशन फी माफी मिळू शकते.
● करिअरच्या संधी
मानव्यशास्त्र आणि समाजशास्त्रातील पदवीधरांना आंतरराष्ट्रीय संस्था, एनजीओ, संशोधन केंद्रे आणि धोरण नियोजन संस्था अशा क्षेत्रांमध्ये संधी मिळतात. कला आणि डिझाईनमधील विद्यार्थी स्कॅन्डिनेव्हियन डिझाईन स्टुडिओज, चित्रपट निर्मिती ह्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करताना दिसतात. स्वीडनमधील स्टार्टअप संस्कृती आणि डेन्मार्कमधील सस्टेनेबल डिजाईन उद्याोग क्षेत्र भारतीय विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. स्कॅन्डिनेव्हियन देशांमधील वर्क परमिट धोरणामुळे पदवीधरांना नोकरी शोधण्यासाठी ६-१२ महिन्यांचा कालावधी मिळतो. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा ठरतो.
जे समाज मानव्यशास्त्र, समाजशास्त्र ह्या विषयांमध्ये लक्ष घालण्याचे सोडून देतात ते पारतंत्र्याच्या खाईत पडण्याची शक्यता तयार होते हे आपण विसरता कामा नये. आज जगभर अनेक बुद्धिमान विद्यार्थी- विद्यार्थिनी ह्या साऱ्या ज्ञानशाखांचा अभ्यास करताना दिसत आहेत ही आशादायी बाब आहे.
विद्यार्थ्यांसाठी टिप्स
१. इंग्रजी प्राविण्य: IELTS/ TOEFL (६.५ ) आवश्यक आहे. स्थानिक भाषा काही प्रमाणात शिकणे उपयुक्त ठरते.
२. संशोधन: विद्यापीठांमधील प्राध्यापक आणि अभ्यासक्रम याबद्दल माहिती आण् िअभ्यास करणे महत्त्वाचे असते.
३. सांस्कृतिक तयारी: या देशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन गटांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे.
४. अर्ज प्रक्रिया: universityadmissions. se, studyinnorway. no, आणि optagelse. dk वर अर्ज करता येईल.
mentorashutosh@gmail. com