आशुतोष शिर्के
जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क हे तीन देश आघाडीवर आहेत हे आपण जाणतोच. जगभरचे पर्यटक अलीकडे या देशांमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात हेही आपल्याला माहीत असते. पण युरोपमधील स्कॅन्डिनेव्हिया प्रांतातील हे तीन देश आधुनिक शिक्षणासाठीची महत्त्वाची केंद्र बनली आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या युरोपीय देशांनंतर आता स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क हे देश सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आकर्षक पर्याय म्हणून पुढे येत आहेत. हे देश जागतिक दर्जाचे शिक्षण, नाविन्यपूर्ण संधी आणि सुरक्षित वातावरण यासाठी ओळखले जाऊ लागले आहेत. पण येथे शिक्षण घेणे म्हणजे नेमके काय? चला जाणून घेऊया!
स्कॅन्डिनेव्हियन शिक्षणाची खासियत
स्कॅन्डिनेव्हियन शिक्षण पद्धती ही पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव, चर्चा आणि गटचर्चां अशा पद्धतींवर आधारित आहे. स्पर्धेऐवजी सहकार्यातून आणि संशोधनातून शिकण्याच्या अनेक पद्धती या देशांमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये विकसित केल्या गेल्या आणि जगातील अनेक देशांमध्ये त्याचे अनुकरण केले गेले. स्वीडनमधील लुंड विद्यापीठाचे उदाहरण घेता येईल. या विद्यापीठामध्ये प्रोजेक्ट-आधारित शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले जाते, भारतीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात जे एक औपचारिक अंतर असते किंवा प्राध्यापक-विद्यार्थी या नात्याचा जवळ जवळ अभावच असतो असेही म्हणता येईल. त्याऐवजी या विद्यापीठामध्ये मात्र प्राध्यापक विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने एक घट्ट नाते तयार करून त्यावर आधारित ज्ञानार्जनाची सारी प्रक्रिया निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये सातत्याचे मार्गदर्शन, आणि प्रेरणा देण्याकडे विशेष भर असतो. प्राध्यापक खऱ्या अर्थाने मेंटर असतात. स्पर्धात्मक परीक्षा नव्हे, तर सतत मूल्यमापन केले जाते. हा बदल भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा सुखद अनुभव असू शकतो.
अभ्यासक्रम आणि संधी
या देशांत अनेक विशेष महत्त्वाचे असे अभ्यासक्रम आहेत. स्वीडनमधील KTH रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आणि डेटा सायन्ससाठी प्रसिद्ध आहे, या संस्थेमध्ये विद्यार्थ्याना स्टार्टअप्ससोबत काम करण्याची संधी मिळते. नॉर्वेचे बर्गेन विद्यापीठ मरीन सायन्स आणि क्लायमेट चेंज संशोधनात आघाडीवर आहे. डेन्मार्कमधील आरहूस विद्यापीठ न्यूरोसायन्स आणि रिन्यूएबल एनर्जीमध्ये संशोधनाच्या अनेक दुर्मीळ संधी उपलब्ध करून देते, विशेष म्हणजे या देशांमधील बहुतेक अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने येथे भाषेची अडचण येत नाही.
खर्च आणि शिष्यवृत्ती
नॉर्वेमध्ये सार्वजनिक विद्यापीठांत शिक्षण मोफत आहे, फक्त सेमिस्टर फी (५००-१००० नॉर्वेजियन क्रोनर – साधारण चार ते आठ हजार रुपये) भरावी लागते. पण ओस्लो शहरामध्ये राहण्याचा महिन्याचा खर्च मात्र १-१.२ लाख रुपये इतका असू शकतो. स्वस्त पर्याय म्हणून बर्गेनसारखी छोटी शहरे निवडता येतात. स्वीडनमध्ये शुल्क वर्षाला १०-१८ लाख रुपये आहे, पण स्वीडिश इन्स्टिट्यूट स्कॉलरशिपमुळे १०० शुल्क माफी आणि मासिक ९,००० क्रोनर भत्ता (साधारणपणे ७३ हजार रुपये) मिळण्याची शक्यता असते. यासाठी डिसेंबर-जानेवारीत अर्ज करावा लागतो. डेन्मार्कमध्ये डॅनिश गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आहे, पण या शिष्यवृत्तीसाठी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामधील विद्यार्थी म्हणून तुमची कामगिरी पाहिली जाते. प्रोफाइल मजबूत असावी लागते.
आव्हाने कोणती?
ह्या देशांमधील कमालीचे थंड हवामान हे मोठे आव्हान आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सूर्य फक्त ४-५ तास दिसतो. यामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्याना उदासीनता जाणवते. व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घेणे आणि मन ताजे-तवाने करण्यासाठी विविध उपलब्ध इनडोअर अॅक्टिव्हिटीज मध्ये गुंतवून घेणे असे उपाय या समस्येवर केले जातात. भारतीय विद्यार्थ्याना जाणवणारी दुसरी अडचण म्हणजे भारतीय पद्धतीचे जेवण न मिळणे. भारतीय जेवण बनवणे शक्य असते, पण मसाले प्रचंड महाग आहेत—हळद १५०-२०० रुपये/१०० ग्रॅम! स्टॉकहोममध्ये काही भारतीय दुकानेही आहेत, पण छोट्या शहरांत मात्र त्रास होतो. इंग्रजी भाषा सर्वत्र चालते, पण स्थानिक भाषा शिकल्याने कॅफे किंवा रिटेलमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या अंशकालीन नोकऱ्या मिळणे सहज शक्य होते.
वास्तव्य आणि करिअर
उच्च शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी येथे पार्ट टाइम जॉब्स करताना आढळतात. अंशकालीन नोकऱ्यांत स्टॉकहोममध्ये डिलिव्हरी जॉब्स (ताशी १८-२२ युरो) लोकप्रिय आहेत, तर नॉर्वेमध्ये फिश प्रोसेसिंग इंडस्ट्रीत सहज काम मिळते. स्वीडनमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर १२ महिन्यांचा जॉब सर्च व्हिसा मिळतो, पण नोकरीसाठी स्वीडिश भाषा आणि नेटवर्किंग ( LinkedIn, career fairs) गरजेचे आहे. डेन्मार्कमधील लेगो किंवा नोवो नॉर्डिस्कसारख्या कंपन्या भारतीय इंजिनीअर्सना संधी देत आहेत. स्वीडनमध्ये सध्या अडीच हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी आहेत, यापैकी ६० विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आहेत.
पहिल्या सेमिस्टरमध्येच Volvo सारख्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मिळाल्याचे काही भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांच्या मते हवामान आणि एकटेपणा खूपच त्रासदायक आहे, पण शिक्षणाचा दर्जा आणि स्वातंत्र्य यामुळे हे विद्यार्थी सारे सहन करतात.
काही टिप्स
● स्वीडनमधील चाल्मर्स युनिव्हर्सिटी किंवा नॉर्वेची NTNU अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहेत.
● या विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी GPA ७.५ आणि IELTS ६.५ असायला हवे.
● प्रवेश मिळाल्यावर Indian Students Association जॉईन करायला हवी. यातून अनेक अनुभव ऐकायला मिळतात, अनेक अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य मिळते.
● खर्च कमी करण्यासाठी शेअर्ड हाऊसिंग (१८,०००-२५,००० रुपये/महिना) चा पर्याय निवडा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक शिकून घ्या!
mentorashutosh@gmail. com
© IE Online Media Services (P) Ltd