आशुतोष शिर्के
परदेशातील उच्च शिक्षणासाठी स्वत:ला पूर्णत: तयार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या विद्यापीठातील शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे नसते; तर एक संपूर्ण वेगळी जीवनशैली स्वीकारणे आणि त्याच वेळी आमूलाग्र वेगळ्या शैक्षणिक प्रणालीशीही जुळवून घेण्याची प्रक्रिया असते.
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार आज अनेक भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षक वाटतो. विद्यापीठे आणि अभ्यासक्रमांची माहिती मिळवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाते. मात्र प्रवेश प्रक्रियेला हात घालण्यापूर्वी आणखी काही मुद्द्यांकडे लक्ष देण्याची आणि स्वत:ला त्यासाठी तयार करण्याची आवश्यकता असते.
अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यापीठात प्रवेश मिळतो खरा पण परदेशात गेल्यावर हे सारं प्रकरण आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा संपूर्णत: वेगळं आहे हे उमगतं आणि मग भयानक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आर्थिक, तांत्रिक असे अनेक प्रश्न तयार होतात. म्हणूनच परदेशातील उच्च शिक्षणासाठी स्वत:ला पूर्णत: तयार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या विद्यापीठातील शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे नसते; तर एक संपूर्ण वेगळी जीवनशैली स्वीकारणे आणि त्याच वेळी आमूलाग्र वेगळ्या शैक्षणिक प्रणालीशीही जुळवून घेण्याची प्रक्रिया असते. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वत:ला विचारायला हवे—‘‘मी खरोखर यासाठी तयार आहे का?’’
मानसिक तयारी
स्वतंत्र जबाबदारी स्वीकारण्याची तयारी
परदेशात शिक्षण घेताना घरापासून लांब राहून स्वयंपूर्ण होण्याची तयारी असावी लागते. स्वत:चे आर्थिक व्यवस्थापन, स्वयंपाक, साफसफाई आणि इतर दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळण्याची सवय लावून घ्यायला हवी. मराठी मध्यमवर्गीय घरातील सुरक्षित वातावरणात आणि जवळजवळ सर्व गोष्टी हातात मिळणाऱ्या कुटुंबामधील मुली-मुलांनी या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवे.
सांस्कृतिक भिन्नता स्वीकारण्याची मानसिकता
नवी भाषा, वेगळी जीवनशैली, आणि जगातील विविध देशांमधून आलेल्या विविध धर्माच्या, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची, मैत्री करण्याची, सह निवासाची तयारी असायला हवी. नव्याने भारताबाहेर जणार्या मुलांना अनेक वेळा वेळा ‘कल्चरल शॉक’ जाणवतो. त्यामुळे आधीच त्या देशाची सामाजिक, सांस्कृतिक, आणि शैक्षणिक प्रणाली विविध उपलब्ध मार्गांनी समजून घेणे आवश्यक आहे.
शैक्षणिक तयारी
नवे शिक्षणतंत्र आत्मसात करणे
भारतातील शिक्षणप्रणाली मुख्यत: परीक्षांवर आधारित असते. भारतामध्ये विद्यार्थी असण्यापेक्षा परिक्षार्थी असण्यावर भर असतो. सतत इतरांशी तुलना आणि स्पर्धा करण्याला कळत नकळतपणे आपल्याकडील शिक्षण प्रणालीमध्ये प्रोत्साहन दिले जाते. परदेशी विद्यापीठांमध्ये मात्र Fcollaborative
अभ्यासपद्धतीमध्ये इतर सहाध्यायींच्या सहभागाने अभ्यास करायचा असतो. संशोधन, सादरीकरणे, केस स्टडीज, आणि थेट प्रात्यक्षिकांवर प्रचंड भर दिला जातो. तयार उत्तरे लिहिणे, पुस्तकातील उतारे किंवा इतरांचे लेखन वापरणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे, अशा शिकण्याच्या पद्धतींसाठी स्वत:ला तयार करणे आवश्यक आहे.
संशोधन क्षमता आणि प्रोजेक्ट वर्क
परदेशातील विद्यापीठे प्रवेश देताना तुमच्या परिक्षांमधील टक्केवारी पाहात नाहीत. किंबहुना त्या मार्कांना फारच कमी महत्त्व दिले जाते. त्याऐवजी भारतातील पदवी शिक्षणादरम्यान तुम्ही तुमच्या विषयाशी संबंधित किती प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, आणि संशोधन कार्य केले आहे याला अधिक महत्व दिले जाते. हे करताना तुम्ही कोणती कौशल्ये अवगत केली आहेत आणि संशोधनाची तुम्हाला किती आवड आहे याकडे बारकाईने पाहिले जाते.
अभ्यासक्रम पद्धती
कोणताही निर्णय घेण्याआधी अभ्यासक्रमाची पद्धत नीट समजून घ्यावी लागते. एकाच विषयाच्या अनेक शाखा असतात. काही अभ्यासक्रम हे केवळ स्व-अध्ययनाच्या पद्धतीने चालवले जातात. म्हणजे प्रवेश घेतल्यावर तुम्हाला केवळ पुस्तकांची आणि इतर वाचनाची यादी दिली जाते. लेक्चर्स वगैरे होत नाहीत. काही अभ्यासक्रम ऑनलाइन असू शकतात. त्यामुळे अभ्यासक्रमाची पद्धत कोणती असणार आहे हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
प्रवेश परीक्षा आणि भाषा कौशल्य
बहुतांश परदेशी विद्यापीठे TOEFL, IELTS, GRE, GMAT यांसारख्या परीक्षांचे गुण विचारात घेतात. या परीक्षांची तयारी वेळेवर सुरू करावी लागते. शिवाय, स्थानिक भाषा (जसे की जर्मनीत जर्मन, फ्रान्समध्ये फ्रेंच) शिकण्याची आवश्यकता असेल, तर ती वेळेत शिकणे महत्त्वाचे आहे. ही तयारी सुद्धा वेळेत सुरू करणे महत्त्वाचे ठरते.
आर्थिक तयारी आणि शिष्यवृत्ती शोधणे
एकूण खर्च आणि आर्थिक नियोजन
शिक्षण शुल्क, राहणीमान, आरोग्य विमा, आणि प्रवास खर्च किती असेल याचा अंदाज घ्यावा लागतो. तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज किंवा शिष्यवृत्तीच्या संधी यांचा विचार करा.
शिष्यवृत्ती आणि फंडिंग संधी
विविध विद्यापीठे आणि सरकारी संस्था परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देतात. DAAD (जर्मनी), Chevening (यूके), Fulbright (अमेरिका), आणि Erasmus Mundus (युरोप) यांसारख्या शिष्यवृत्तींसाठी अर्ज करा. विविध देशांमधील शिष्यवृत्तीबद्दल आपण पुढील काही लेखांमध्ये विस्तृत विचार करणारच आहोत.
परदेशी विद्यापीठांमधील उच्च शिक्षणाची तयारी केवळ प्रवेश प्रक्रियेशी संबंधित नाही; तर त्यासाठी शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण तयारी आवश्यक आहे. योग्य संशोधन, योग्य नियोजन आणि सजग निर्णय यामुळे हा संपूर्ण प्रवास अधिक सुकर आणि फलदायी ठरतो.
आपल्याकडे विद्यापीठमधील पदवी पूर्ण झाल्यावर लगेचच पद्वयोत्तर (PG) अभ्यासक्रम करण्याकडे कल असतो. अनेक नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये मात्र पदवीनंतर तुमच्या विषयाशी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्हाला दोन ते तीन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी काही वर्ष थांबून पूर्ण तयारी करून आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहणे कधीही उत्तम. आणि याचा अर्थ असाही आहे की काही वर्षांपूर्वी पदवी पूर्ण करून तुम्ही काही कारणांसाठी नोकरी स्वीकारली असेल तरीही आज तुम्ही परदेशी जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा नक्कीच विचार करू शकता.
mentorashutosh@gmail.com