Success Story: यूपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. पण, या परीक्षा वाटतात तितक्या सोप्या नसतात. या परीक्षांना सिव्हिल सेवा परीक्षा असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. तर या परीक्षांचा टप्पा काही निवडक लोकच पार करू शकतात. तर काहींना हा प्रवास पूर्ण करताना अनेकदा अपयश येते, गरिबीमुळे अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. तर असाच काहीसा राम भजन कुम्हार यांचा उल्लेखनीय प्रवास आहे. राम यांनी सातत्याने प्रयत्न करूनही परीक्षेत त्यांना अनेकदा अपयश आले. मात्र, त्यांनी हार न मानता स्वतःचे स्वप्न पूर्ण केले. चला तर त्यांच्या प्रवासाबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

राजस्थानमधील बापी या गावातील रहिवासी राम आणि त्यांच्या आईने जीवनातील अनेक समस्यांना तोंड दिले. पण, आव्हानात्मक परिस्थिती असूनही राम भजनने अडचणींवर मात करून यूपीएससी परीक्षेत ६६७ वा क्रमांक मिळवला. काही वर्षांपूर्वी राम भजन यांना त्यांच्या आईबरोबर दगड फोडण्याचे काम करण्यास जावे लागायचे. त्यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नव्हतं. दररोज २५ टोपल्या दगड फोडण्यासाठी त्यांना १० रुपये मिळायचे. जे एका वेळेच्या जेवणासाठीदेखील अपुरे होते. शेळ्यांचे पालनपोषण करून त्यांचे वडील दूध विकून कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचे. पण, तेव्हाच राम भजनच्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्याला एक कठीण वळण आले, जेव्हा त्यांच्या वडिलांचा कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान दम्याने मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीन बिकट झाली होती. पण, त्यांनी हार न मानता त्यांचा प्रवास सुरू ठेवला.

हेही वाचा…Success Story: विविध नोकऱ्या करून आजमावलं नशीब; मेहनतीने उभारला ९७३ कोटींचा व्यवसाय; पाहा शेतकऱ्याच्या लेकराची ‘ही’ यशोगाथा

अनेक कठीण प्रसंगांचा सामना केल्यानंतर अखेर राम भजन यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे त्यांना दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास सुरू केला. त्यांचे जवळजवळ सात प्रयत्न असफल ठरले. मात्र, आठव्या प्रयत्नात त्यांनी म्हणजे २०२२ मध्ये स्वतःचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढले आणि एक विलक्षण कामगिरी नोंदवली; जी आज अनेक लोकांसाठी प्रेरणा ठरते आहे.