IAS Success Story: स्वप्न साकारणाऱ्यांसाठी परिस्थिती, वय कधीही आड येत नाही. एवढेच नव्हे, तर भाषादेखील व्यक्तीच्या स्वप्नांच्या आड येत नाही. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून हीच गोष्ट दाखवण्यात आली होती. या चित्रपटाच्या कथेनुसार समाजात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांना आणि इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यांना हिंदी माध्यमापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते, जे चुकीचे आहे. त्यासाठी उदाहरणादाखला आज आम्ही एका यशस्वी अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्याने हिंदी माध्यमातून शिक्षण घेऊन IAS अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली.
राजस्थानचे विकास मीना हे हिंदी माध्यमातून शिक्षण घेऊन IAS अधिकारी झाले. विकास मीना यांच्या आयुष्यातील एक काळ असा होता की, ते राजस्थानातील एका छोट्या गावातून UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेले आणि हिंदी माध्यमाला आपली ताकद बनवून पहिल्याच प्रयत्नात IPS अधिकारी झाले. पण, त्यांना IAS बनायचे होते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि २०१७ मध्ये त्यांची IAS म्हणून निवड झाली. अर्थात, त्यांचा हा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता.
हिंदी माध्यमातून शिक्षण
विकास यांचा जन्म राजस्थानमधील एका गावात झाला असून, त्यांचे सुरुवातीचे शिक्षण राजस्थानमध्ये झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले. विकास त्यांच्या चुलतभावाबरोबर दिल्लीला आले आणि त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. विकास यांचे शिक्षण हिंदी माध्यमात झाले; पण भाषा हा यश मिळविण्यात अडसर ठरू शकत नाही हे त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन दाखवून दिले. रँकनुसार त्यांची आयपीएस सेवेसाठी निवड झाली; पण त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा या परीक्षेला बसायचे ठरवले आणि या दुसऱ्याच प्रयत्नात त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली.
हेही वाचा: Success Story: मिठाईविक्रेत्याचा मुलगा, आश्रमात राहून उदरनिर्वाह; आज २९,७८७ कोटींच्या कंपनीचा मालक
विकास हे जेव्हा UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांना शिक्षण हिंदी माध्यमातून झाल्यामुळे इंग्रजी भाषेची भीती वाटायची. त्यावेळी हिंदी माध्यमाचे फार कमी विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे. मात्र, आपल्या भीतीवर मात करीत त्यांनी ही परीक्षा हिंदी माध्यमातूनच देण्याचा निर्णय घेतला. सातत्याने अभ्यास करून मेहनतीच्या जोरावर विकास यांनी या परीक्षेत यश मिळवले. यश मिळाल्यानंतर विकास यांनी सांगितले की, हिंदी भाषेबद्दल अनेकांच्या मनात चुकीच्या गोष्टींनी घर केले आहे. कारण- लोकांना वाटते की, हिंदी भाषेत शिक्षण घेतल्याने यश मिळू शकत नाही.