स्वत:ची ओळख किंवा स्थान निर्माण करणे ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये माझ्या नियंत्रणात कुठल्या गोष्टी आहेत व माझ्या नियंत्रणात कुठल्या गोष्टी नाहीत याचे भान ठेवणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.
मागील लेखामध्ये पहिल्या नोकरीत स्वत:चा प्रवास ‘मीकडून आपण’कडे होणे कसे आवश्यक आहे याविषयी आपण जाणून घेतले. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्याच्या टप्प्यापर्यंत होणारा प्रवास अनेक आव्हानांचा असला तरी नोकरी मिळवल्यानंतर अनेक नवीन प्रश्न आव्हाने आपल्यासमोर उभे राहताना दिसतात. या प्रश्नांकडे किंवा आव्हानांकडे प्रश्न म्हणून न पाहता ती एक स्वत:ला बदलण्याची संधी आहे असे त्याकडे पाहिले तर आपल्याला अनेक गोष्टी स्वत:हून शिकाव्याशा वाटतात व स्वत:मध्ये स्वत:च्या व्यक्तिमत्त्वांमध्ये जाणीवपूर्वक बदल करावा असे मनोमन वाटते त्यामुळे येणारा प्रत्येक प्रश्न किंवा आव्हान आहे असे न वाटता माझ्या प्रगतीच्या वाटेवरचा हा एक टप्पा आहे असे वाटेल.
पहिली नोकरी मिळाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी आपल्या स्वत:चे एक स्थान किंवा अस्तित्व निर्माण व्हावे किंवा आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते. परंतु आपले स्थान निर्माण होण्यासाठी आपण नक्की काय केले पाहिजे याची नीट माहिती बऱ्याच जणांना नसते. सर्वप्रथम कोणत्याही नवीन ठिकाणी कामाची सुरुवात करताना लागणारा वेळ हा फार महत्त्वाचा घटक आहे असे मला वाटतं. त्यामुळे आपली ओळख आणि स्थान निर्माण होण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागणार आहे हे स्वत:ला सांगणे खूप महत्त्वाचे आहे. नोकरी मिळालेला प्रत्येक जण या परिस्थितीतून जात आहे हेही स्वत:ला सांगणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच जणांना आपण इतरांपेक्षा मागे आहोत असे वाटत असते. त्यामुळे आपले अस्तित्व निर्माण होण्यासाठी पुरेसा वेळ सर्वांनाच द्यावा लागतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर हा लागणारा वेळ आपली स्वत:ची उत्तरोत्तर प्रगती करणार आहे हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
स्वत:ची ओळख किंवा स्थान निर्माण करणे ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये माझ्या नियंत्रणात कुठल्या गोष्टी आहेत व माझ्या नियंत्रणात कुठल्या गोष्टी नाहीत याचे भान ठेवणेदेखील खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते. माझ्या प्रत्येक प्रयत्नाला समोरून सकारात्मक प्रतिसाद येईलच असे नाही अशा वेळी समोरच्या व्यक्तीचे आत्ता दुसऱ्या कुठल्यातरी कामाला प्राधान्य असू शकेल हे समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला अपेक्षित असा प्रतिसाद समोरून आला नाही तर बरेच जण निराश होतात किंवा त्यांचा आत्मविश्वास त्यामुळे कमी होऊ शकतो. आपल्या स्वत:ची ओळख कामाच्या ठिकाणी निर्माण करताना आपले व्यक्तिमत्त्व, आपली देहबोली, आपली संवाद साधण्याची कला, वेळेचे नियोजन, कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे, इतर सहकाऱ्यांशी जुळवून घेणे अशा अनेक बाबी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. आपल्यात असलेल्या वैयक्तिक गुणांपेक्षा आपण टीममध्ये कसे वागतो, वरिष्ठांनी सांगितलेल्या गोष्टी आपण वेळेत पूर्ण करतो का? स्वत:ची ध्येय व उद्दिष्ट काही काळ बाजूला ठेवून आपल्या कंपनीच्या ध्येय उद्दिष्टांची आपण एकरूप होऊ शकतो का? असे अनेक घटक स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहेत असे मला वाटते.
बऱ्याच जणांना नोकरीच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी एकटे पडल्यासारखे जाणवते. आपण इतरांपेक्षा ज्ञान व कौशल्यांमध्ये मागे आहोत असेही वाटते. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये असे वाटणे स्वाभाविक आहे असे मला जरूर सांगावेसे वाटते परंतु सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ घालवूनदेखील मला एकटे वाटत असेल किंवा वर्क प्लेस कल्चरबरोबर जुळवून घेता येत नसेल तर आपल्याला स्वत:वर अधिक काम करण्याची गरज आहे असे जरूर लक्षात घ्यावे. आपण स्वत: या कंपनीचा एक अविभाज्य घटक आहोत आणि माझ्या टीममधला मी एक महत्त्वाचा मेंबर आहे, अशी मनोधारना होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजणं म्हणजे मी इतरांपेक्षा शिक्षणाने किंवा ज्ञानाने श्रेष्ठ आहे असे वाटणे किंवा मी ज्ञानाने अनुभवाने इतरांपेक्षा खूपच कमी आहे असे वाटणे हे दोन्हीही आपल्या स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करू शकतात. यापेक्षा तिथे टीममध्ये असलेल्या प्रत्येक जण कधी ना कधीतरी आयुष्यात या प्रक्रियेतून गेलेला आहे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे असे वाटणे स्वत:चा आत्मविश्वास टिकून राहण्यास नक्कीच मदत होईल.
drmakarandthombare@gmail. com