व्यक्तिमत्त्व चाचणीला जाताना कशा प्रकारचे कपडे घालावेत, व्यक्तिमत्त्व चाचणीपूर्वी काय गोष्टी कराव्या आणि काय करू नये याबद्दलच्या सूचना गेल्या आठवड्यातल्या लेखात पाहिल्या. आज आपण प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दरम्यान कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये याची माहिती घेणार आहोत. व्यक्तिमत्त्व चाचणी साधारणत: अर्धा तास चालते या अर्ध्या तासात बरेच चढ-उतार होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यक्तिमत्त्व चाचणी दिल्लीत, शाहजहान रोडवरच्या धोलपूर हाऊस या संघ लोकसेवा आयोगाच्या परिसरात होते. धोलपूर हाऊस मध्ये जाण्यासाठी व्यक्तिमत्त्व चाचणीचे जे लेटर आलेले असेल ते दाखवावे लागेल. त्या व्यतिरिक्त कोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत न्यायची आहेत त्यांची स्वतंत्र माहिती दिलेली असते. काही कागदपत्रे सादर करण्यात आली नाही तरी त्यासाठी स्वतंत्र वेळही संघ लोकसेवा आयोग उमेदवारांना निश्चितच देत असते. त्यामुळे मुलाखती दरम्यान नसलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही म्हणून टेन्शनमध्ये राहू नये.

ज्या दिवशी मुलाखतीला जात आहात त्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील पाच मुख्य बातम्या आणि संपादकीय आणि त्या शेजारी असलेल्या सदरांचे नक्की वाचन करावे. देश-विदेशातील चालू घडामोडी संबंधित माहिती उमेदवारांनी अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. आत गेल्यानंतर उमेदवारांना एका मोठ्या हॉलमध्ये बसावे लागते. तिथेच उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातात आणि क्रमाक्रमाने उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीला जाण्यापूर्वी जिथे उमेदवारांना थांबावे लागते तिथे उगाचच इतर उमेदवारांशी अति चर्चा करत बसू नये. कारण अशा चर्चांमुळे विनाकारण न्यूनगंड विकसित होत आपल्या मनावरचा ताण वाढू शकतो. मुलाखतीच्या रूममध्ये शिरताना आत येण्याची परवानगी मागावी.

मुलाखतीची भाषा

व्यक्तिमत्त्व चाचणी ही इंग्रजी, हिंदी आणि इतर कोणत्याही भारतीय भाषेतून देता येते. इंग्रजीमध्ये व्यक्तिमत्त्व चाचणी देणाऱ्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. महाराष्ट्रातला एखादा उमेदवार मराठीतून मुलाखत देऊ शकत असेल तर त्याला ती परवानगी असते. मुलाखतीचे माध्यम हे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या वेळेलाच लिहावे लागते. उमेदवार इंग्रजी किंवा हिंदी व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून मुलाखत देणार असेल तर संघ लोकसेवा आयोगातर्फे दुभाष्याची व्यवस्था केलेली असते. आपले मुलाखतीचे माध्यम मराठी आहे आणि तिथे गेल्यावर सदस्यांनी म्हटले, ‘तुम्ही इंग्रजीत बोलू शकता कि नाही, किंवा हिंदीत बोलू शकता कि नाही’ तर अजिबात गडबडून जायचे नाही. हो मी इंग्रजीत/हिंदीत बोलायचा प्रयत्न करतो/ करते असे नम्रपणे म्हणायचे. मुलाखत मराठीत सुरू झाली तरी त्यात तांत्रिक शब्द हे इंग्रजीत उच्चारले तरी काही वावगे ठरत नाही. उदाहरणार्थ, AI किंवा artificial intelligence हा शब्द व्यवस्थित प्रचलित आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणण्याची गरज नाही.

आसन व्यवस्था

व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बोर्डचे अध्यक्ष पुरुष किंवा स्त्री असतील त्यानुसार आत जाताना सर किंवा मॅडम म्हणून परवानगी घेतली पाहिजे. आता गेल्यावर सर्व सदस्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून असे वेळेनुसार म्हटले पाहिजे. बोर्ड मध्ये स्त्री सदस्य असतील तर त्यांना स्वतंत्रपणे गुड मॉर्निंग मॅडम असं म्हटलं पाहिजे. आणि बाकीच्या सदस्यांना गुड मॉर्निंग सर्स असे एकाचवेळी म्हटले तरी चालू शकते. सर्वसाधारणत: बोर्डचे चेअरमन आपल्याला समोर असलेल्या खुर्चीवर बसायला सांगतात. वर्तुळाकार टेबलवर उमेदवाराची खुर्ची ही पॅनल चेअरमनच्या खुर्चीसमोर असते तर डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन सदस्य बसलेले असतात.

देहबोली

खुर्चीवर आपण व्यवस्थित पाठ टेकून बसावे, खुर्चीच्या बाजूच्या हातांवर आपले हात ठेवावेत. बसल्यावर एक दीर्घ श्वास घ्यावा. बोर्डमधले सदस्य हे पूर्वी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात. ते आपल्या क्षेत्रात किमान ३०/३५ वर्षांचा अनुभव असणारे असतात त्यामुळे त्यांच्या अनुभवाला योग्य तो मान दिला पाहिजे, त्यामुळे ताठ बसणे , नम्रपणे बोलणे , चेहरा हसतमुख ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हा काही प्रश्नोत्तरांचा तास नाही. सदस्यांनी प्रश्न विचारला की भराभर उत्तर द्यायला सुरुवात करू नये. प्रश्न व्यवस्थित ऐकावा. काही क्षण विचार करून मगच उत्तर द्यायला सुरुवात करावी. शांतचित्ताने उत्तर देऊन आपण सदस्यांबद्दलचा आपला आदर व्यक्त करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रश्न नीट ऐका

प्रश्न व्यवस्थित ऐकणे का आवश्यक आहे ह्याचं एक उदाहरण सांगत आहोत. बोर्डाच्या सदस्यांनी एका उमेदवाराला विचारलं, ‘मी तुला ५ कोटी दिले तर ते तू कसे खर्च करशील?’ उमेदवाराने सुरुवात केली, ‘मी एखाद्या महत्त्वाच्या अॅसेटमध्ये ते पैसे गुंतवेन’. इथे काय चूक झाली उमेदवाराची? सर्वात प्रथम त्याने हे स्पष्ट करून घ्यायला हवे की हे पैसे किती दिवसात खर्च करणे अपेक्षित आहे? त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की प्रश्न हा पैसे खर्च करण्याबाबतचा होता पैसे गुंतवण्याबद्दलचा नव्हता. प्रश्न व्यवस्थित समजला नसेल किंवा ऐकू आला नसेल तर नम्रपणे सदस्यांना तसं सांगावं. स्पष्टीकरण न घेता उगाच काहीही उत्तर द्यायला सुरुवात करू नये.

उत्तर न आल्यास…

एखाद्या प्रश्नाचे नेमके उत्तर येत नसेल तर उगाच थापा मारू नयेत. बोर्डाचे सदस्य खूप अनुभवी असतात, तुम्ही उत्तर ठोकत आहात याचा त्यांना अंदाज येऊ शकतो. तुम्ही थाप मारली आहे याची खात्री करून घेण्यासाठी उलट सुलट प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि उमेदवार फसू शकतो. उत्तर येत नसेल तर स्पष्टपणे सॉरी म्हणून मला हे उत्तर येत नाही किंवा मला आठवत नाही हे सांगावे. व्यक्तिमत्व चाचणीचे कोचिंग घेऊन आलेले काही विद्यार्थी उत्तर येत नसेल तर म्हणतात, ‘सॉरी सर मला याचे उत्तर येत नाही पण मी याबद्दल अधिक वाचन करेन/अधिक माहिती घेईन’ हे अधिक वाचन करेन म्हणणं कधीकधी कृत्रिम वाटू शकते त्यामुळे माफ करा मला या प्रश्नाचे उत्तर आठवत नाही एवढेच म्हणावे. एखाद्या उत्तराची खात्री नसेल पण काही अंदाज करायचा असेल तर सदस्यांची परवानगी घेऊनच करावा. ‘सर मला नक्की उत्तर येत नाहीये पण आपल्या परवानगीने मी गेस करू इच्छितो/इच्छिते’ असे नम्रपणे म्हणावे. असे म्हटल्यामुळे उमेदवार प्रामाणिक आहे याचा सदस्यांना अंदाज येऊ शकतो.

व्यक्तिमत्त्व चाचणी साधारणत: अर्धा तास चालते या अर्ध्या तासात बरेच चढ उतार होऊ शकतात. प्रश्नांची उत्तरे देताना आपण भारतीय संविधान, कायदा, नैतिकता, सामाजिक जाणिवांच्या चौकटी बाहेर तर जात नाहीना याचे भान उमेदवारांनी नक्कीच राखावे. या सगळ्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या लेखात.

mmbips@gmail.com supsdk@gmail.com