प्रा. रवींद्र कुलकर्णी
आजच्या बैठकीत अनेक नवे तरुण सामील झाले होते. ते उत्साहाने रससरलेले होते. आपल्या अभ्यासक्रमात होणार असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचा आणि प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प यांच्याविषयी आज रमेश सर सांगणार होते. सुमित आज नव्याने आला होता. त्यानं रमेश सर आल्या आल्या त्यांना प्रश्न विचारला, ‘‘सर आज तुम्ही अभ्यासक्रमातील सामाजिक उपक्रमांच्या संदर्भात सांगणार होतात.’’ सरांनी त्याच्याकडे हसून पाहिलं व म्हणाले, ‘‘अरे थांब, थांब. सांगतो.’’
रमेश सर बोलू लागले, ‘‘मित्रांनो, नव्या शैक्षणिक धोरणामधे जो विचार आहे, तो विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा. आपला नवा युवक हा जसा अध्ययनात हुशार हवा तसाच, त्याला सामाजिक बांधिलकीचंही भान यायला हवं. NEP -2020 च्या उद्दिष्टांनुसार उच्च शिक्षणाने सामाजिक स्तरावर, एक ज्ञानी, सामाजिकदृष्टय़ा जागृत, विद्वान, आणि कुशल राष्ट्र निर्माण करू शकणारे युवक घडवावेत अशी अपेक्षा आहे. एक असे राष्ट्र की, जे स्वत:च्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सशक्त उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करू शकेल. तुम्ही सारे जाणतातच की, उच्च शिक्षणाच्या आधारावर ज्ञान निर्माण करून आणि नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध लावून, वाढत्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला हातभार लावता येतो. म्हणूनच, दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट फक्त वैयक्तिक रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी तयार करणे एवढय़ापुरतेच मर्यादित नाही. चैतन्यपूर्ण, सामाजिकदृष्टय़ा सहभागी सहयोगी समुदाय आणि अधिक आनंद सामंजस्यपूर्ण संस्कृत उत्पादनशील नावीन्यपूर्ण पुरोगामी आणि समृद्ध राष्ट्र तयार करण्याची उच्च शिक्षण ही गुरुकिल्ली आहे.’’
सुनील सरांनी त्यांना दुजोरा दिला, ‘‘होय सर. आपला विद्यार्थी हा सामाजिक उपक्रमांत कसा सहभागी होईल हे पाहाणे आता आवश्यक झाले आहे.’’ रमेश सर म्हणाले, ‘‘विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख हितसंबंधी घटक आहे. उच्च-गुणवत्तेच्या अध्यापन-अध्ययन प्रक्रियेसाठी उत्साही कॅम्पस असणे आवश्यक आहे. या दृष्टीने पाहाता प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना क्रीडा, सांस्कृतिक कला क्लब, पर्यावरण-क्लब, अॅक्टिव्हिटी क्लब, समाज सेवा प्रकल्प इ. मध्ये सहभागी होण्याच्या भरपूर संधी दिल्या जाव्यात. त्यांच्या मनावरील वेगवेगळय़ा प्रकारचे ताणतणाव आणि भावनिक मुद्दे हाताळण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेत समुपदेशन यंत्रणा असाव्यात आणि त्यांच्यामधील कृतीशीलतेला वाव मिळावा म्हणून सामाजिक उपक्रमांचं साहाय्य घेण्यात यावं अशी अपेक्षा NEP-2020 मधे आहे.’’
तन्मयने विचारलं, ‘‘सर, हे सामाजिक उपक्रम नेमके कसे असावेत?’’ रमेश सर म्हणाले, ‘‘तन्मय, हे सामाजिक उपक्रम प्रत्यक्ष कार्यात सहभाग असणारे द्यावेत. विशिष्ट क्षेत्रावर आधारित शैक्षणिक प्रकल्पाने विद्यार्थ्यांना विविध सामाजिक-आर्थिक संदर्भ समजून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यातील सामाजिक जाणिवा विकसित होत जातील. शहरी आणि ग्रामीण भागांतील विविध समस्यांची त्यांना योग्य वयात जाण निर्माण होईल व त्याबद्दलची जागरूकता त्यांच्या मनात निर्माण होईल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि शहरी संदर्भातील परिस्थितीचे निरीक्षण करण्याची आणि सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांबाबत प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीचे निरीक्षण आणि अभ्यास करण्याची संधी प्राप्त होईल. मित्रांनो, यामुळे घडत्या पिढीला संस्थात्मक जीवन कसं असतं, याचं प्रत्यक्ष ज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांना धोरणे, नियम, संस्थात्मक संरचना, प्रक्रिया आणि विकास प्रक्रियेला मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांना समजून घेण्याची प्रत्यक्ष संधी मिळेल. भारतातीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक मानव समुदायाच्या स्वत:च्या अशा काही खास बाबी असतात, समस्या असतात. त्या बाबी, समस्या कशा समजून घ्यायच्या याविषयी जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांना समाजातील गुंतागुंतीच्या सामाजिक-आर्थिक समस्या आणि ओळखल्या गेलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक नवनवीन पद्धती समजून घेण्याची संधी ह्या सामाजिक उपक्रमांच्या सहभागातून मिळेल.’’
सुशील सरांनी पुस्ती जोडली, ‘‘सामुदायिक सहभाग आणि सेवा’चा अभ्यासक्रम घटक विद्यार्थ्यांना समाजातील सामाजिक-आर्थिक समस्यांशी परिचित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून वास्तविक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सैद्धांतिक शिक्षणांना वास्तविक जीवनातील अनुभवांद्वारे पूरक केले जाऊ शकते.’’
रमेश सरांनी सुशील सरांचं प्रतिपादन पुढे नेलं. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS), नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), प्रौढ शिक्षण/साक्षरता उपक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याशी संबंधित उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा जो सहभाग असेल तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवे पैलू पाडेल. या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी किमान ४-६ आठवडे विद्यापीठ कॅम्पसमध्ये पर्यावरण/ जैवविविधतेचे संरक्षण किंवा गाव-परिसरातील समुदाय-आधारित (NSS युनिटद्वारे) उन्हाळी कामे किंवा मान्यताप्राप्त एनजीओ किंवा प्रादेशिक प्रकरणासह क्षेत्र-स्तरीय कार्य अशा स्वरूपाचे प्रत्यक्ष सहभाग असलेले उपक्रम असे अभ्यास कार्यक्रम हाती घेतला जाऊ शकतात.’’
रमेश सर पुढे म्हणाले, ‘‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन श्रेयांकांचा व एकूण तीस तासांचा प्रादेशिक केस स्टडी कोर्स किंवा सामाजिक उद्योजकता अभ्यासक्रम हा पर्यायी पद्धतीने किंवा अॅड-ऑन श्रेयांक म्हणून सुरू करता येऊ शकतो. यातील किमान ५० टक्के अभ्यासक्रम हा अनिवार्यपणे प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यात विद्यार्थ्यांनी व्यतीत करणे आवश्यक आहे.’’
महेश सरांनी प्रश्न विचारला, ‘‘सर, यात अभ्यास दौरे किंवा क्षेत्र भेटींचा (Study Tours) काही समावेश आहे की नाही?’’
रमेश सर म्हणाले, ‘‘आहे ना. NEP 2020 च्या कलम २२.१२ नुसार विद्यार्थ्यांनी भारताच्या सर्वप्रथम समृद्ध विविधतेचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. यासाठी त्यांच्या सहली, अभ्यास दौरे, क्षेत्र भेटी यांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. यामुळे त्यांना भारताच्या विविध भागांचं, वैविध्यपूर्ण जीवनाचं, संस्कृतीचं, परंपरांचं ज्ञान मिळेल, त्यांच्या आकलनात महत्त्वपूर्ण भर पडेल. उच्च शिक्षण संस्था या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेअंतर्गत अभ्यास दौरे आखू शकतात. आपल्या देशाविषयी त्यांचे ज्ञान वाढवण्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यासाठी पाठवू शकतात आणि त्यांचा इतिहास, वैज्ञानिक योगदान, परंपरा, देशी साहित्य आणि ज्ञान इत्यादींचा अभ्यास करू शकतात.’’
सुमित रमेश सरांना धन्यवाद देत म्हणाला, ‘‘सर, तुमच्यामुळे आम्हाला सर्वाना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल खूप माहिती मिळते आहे. रमेश सरांनी हसून सर्वाचा निरोप घेतला.’’
अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर