फेब्रुवारी मार्चमहिना सुरू होताच हळूहळू बऱ्याच कॉलेजमध्ये प्लेसमेंटचा हंगाम सुरू होतो खूप कंपन्या स्वत:चा एक अजेंडा घेऊन कॉलेजमध्ये यायला सुरुवात होते. प्रत्येक कॉलेज आपल्याकडील मुले कशी जास्तीत जास्त निवडली जातील यासाठी पुष्कळ प्रयत्न करताना दिसतात. याच काळामध्ये मुलांच्या मनात अनेक शंकाकुशंका येत असतात. इंटरव्ह्यू देण्यापासून नोकरी मिळण्यापर्यंतच्या प्रक्रियेबद्दल बरीच मुले अनभिज्ञ असतात. नात्यातल्या ओळखीच्या अनेक जणांकडून वेगवेगळे अनुभव ऐकलेले असतात. या सर्व गोष्टींमुळे स्वत:च्या काही मनोधारणा तयार होऊ लागतात. वर्षभर केलेला अभ्यास घेतलेली मेहनत याचबरोबर पालकांच्या असलेल्या अपेक्षांचे ओझे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्वत: यशस्वी होण्याचे दडपण देखील मुला-मुलींच्या मनामध्ये असते. इंटरव्ह्यूपासून प्लेसमेंट मिळेपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपण नक्की कुठे आहोत हे माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या पदासाठी तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात त्या पदाबद्दल कंपनीच्या तुमच्याकडून कोणकोणत्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता आणि कौशल्य माझ्यामध्ये आहेत का? या सर्व गोष्टींची पुरेपूर जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे. स्वत:च्या शारीरिक म्हणजेच बाह्य व्यक्तिमत्वाकडे बरेच जण जास्त लक्ष देत असतात परंतु आपल्या दिसण्याबरोबरच आपल्यामध्ये काही गुण असणे अत्यंत आवश्यक असते याची जाणीव विद्यार्थ्यांना इंटरव्यू देण्याअगोदर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमची देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव, वेळोवेळी दिलेला भावनिक प्रतिसाद, विचारांमधील आणि बोलण्यामध्ये असलेला मुद्देसूतपणा ठाम पणा अशा अनेक गोष्टींकडे कंपन्यांचे आलेले प्रतिनिधी लक्ष ठेवून असतात. मुलांना असलेल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले व्यवहारिक ज्ञान मुलांमध्ये असलेली निर्णय क्षमता, टीममध्ये असलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांबरोबर जुळवून घेण्याची क्षमता, त्या पदासाठी आवश्यक असलेले तांत्रिक कौशल्य, उत्तम संवाद कौशल्य या सर्व गोष्टींकडे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींचे लक्ष असते किंबहुना या सर्व गोष्टी तपासून घेऊनच तुमची त्या पदासाठी निवड होत असते.

अनेकदा आपल्याला हवे तेवढे पॅकेज मिळत नाही किंवा नोकरी हव्या त्या कंपनीत मिळत नाही किंवा काही वेळा आपल्यापेक्षा कमी मार्क असलेल्या मित्र-मैत्रिणींची निवड कंपनी करते अशावेळी आत्मविश्वास कमी होतो. एकंदरीतच इंटरव्ह्यू ते प्लेसमेंट ही पूर्ण प्रक्रिया आपल्या आयुष्यामध्ये निर्णयक वळण घेणारी असते पण अशावेळी सजगता, आत्मविश्वास, श्रद्धा आणि सबुरी अंगिकारणे आपल्या हिताचे आहे.

इंटरव्ह्यू ते नोकरी या प्रक्रियेतील ताण-तणावाला सामोरे जाण्यासाठी काही उपयुक्त व महत्त्वाच्या टिप्स

● स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

● तुमचे अंतरबाह्य व्यक्तिमत्व नीट समजून घ्या.

● स्वत:ची इतरांशी तुलना टाळा. असे केल्याने आपणच आपला अनादर करत आहोत याची जाणीव ठेवा.

● इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटची तयारी वर्षभर करत रहा.

● या प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे आधीच तयार ठेवा.

● स्वत:मधील गुणदोषांवर मोकळेपणाने बोलण्याची सवय ठेवा.

● स्वत:च्या मानसिक व भावनिक आरोग्याला महत्त्व द्या. वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरे जाण्याची सवय ठेवा.

● आवश्यकतेनुसार कमीपणा न बाळगता समुपदेशक व मानसोपचार तज्ञांची मदत घ्या.

● प्रकृती तंदुरुस्त राहण्यासाठी हलका आहार, नियमित व्यायाम,प्राणायाम, योगासने तसेच पुरेशी झोप घ्या.

● स्क्रीन टाईम कमी करा मोबाइल व इतर उपकरणांचा आवश्यकतेनुसार व गरजेपुरताच वापर करा.

● drmakarandthombare @gmail. com