डॉ.भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर
मुलाखतीच्या ताणामध्ये काही बारीक-सारीक तर काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडून दुर्लक्षित राहू शकतात आणि त्याचा आपल्या मुलाखतीच्या मार्कांवर परिणाम होऊ शकतो. अशा गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ…
गटचर्चा या टप्प्यावरून पुढे गेल्यावर आता आपण मुलाखतीसाठी तयारी करू! मुलाखतीसाठी तयारी करताना तुम्ही प्रथम त्या कंपनीचा प्रोफाइल, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि इच्छुक जॉब प्रोफाइल याबद्दल माहिती मिळवा. कंपनी बद्दल सध्या असलेल्या बातम्या वाचा. कंपनीचे शेअर्स स्टॉक्स याची देखील माहिती मिळवा. कंपनी कोणी निर्माण केली, का केली, कशी सुरुवात झाली याबद्दल माहिती असायला हवी. खूप मोठी व प्रसिद्ध कंपनी असल्यास त्यांच्या कार्यसंस्कृती बद्दल सोशल मीडियावर इंटरनेटवर माहिती उपलब्ध असते पण तसे नसल्यास त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांच्याशी जमल्यास ओळख काढून, तसेच ग्लासडोर, लिंक्ड-इन, कोरा अशा प्लॅटफॉर्म्स वरून ही कंपनीच्या कार्यसंस्कृती विषयी माहिती मिळवता येईल. कंपनी ऑफर करत असलेल्या जॉब प्रोफाइलच्याबरोबर तुमची कौशल्य आणि अनुभव याचे गणित कसे बसते आहे याचा विचार करा. हा झाला तुमचा गृहपाठ.
मुलाखत सुरू झाल्यानंतर बऱ्याचदा सर्वप्रथम करायला लागते ती स्वत:ची ओळख यासाठी तुम्ही एफ-ओ -आर -एम ( FORM) हा फॉर्म्युला वापरू शकता- एफ म्हणजे फॅमिली; ओ म्हणजे ऑक्युपेशन; आर म्हणजे रीक्रिएशन आणि एम म्हणजे मोटिवेशन. या पद्धतीने स्वत:ची ओळख करून दिली तर ती योग्य होईल.
मुलाखतीला जाताना कपडे कोणते घाला, तांत्रिक कौशल्यांची उजळणी करा, संवादाचा सराव करा वगैरे नेहमीचे घिसेपिटे मुद्दे आम्ही या लेखात मांडणार नाही याबद्दल तुम्हाला इंटरनेटवर आणि युट्यूबवरही भरपूर माहिती सोबत व्हिडिओजही मिळू शकतात. पण मुलाखतीच्या ताणामध्ये काही बारीक-सारीक तर काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडून दुर्लक्षित राहू शकतात आणि त्याचा आपल्या मुलाखतीच्या मार्कांवर परिणाम होऊ शकतो. अशा गोष्टी मात्र आम्ही नक्की सांगणार आहोत.
● पॅनलला शक्यतो प्रतिप्रश्न करू नका, किंवा विचारलेला प्रश्न पुन्हा सांगायला लावू नका. अगदीच नाईलाज झाल्यास विधानात्मक वाक्यातून स्पष्टीकरण देण्याची विनंती करा.
● पॅनलचा प्रश्न पूर्ण होईपर्यंत थांबा उत्तर देण्याची घाई करू नका कधीकधी पॅनलला आणखीन एक उप प्रश्नही विचारायचा असू शकतो.
● आपल्या बायोडेटा मध्ये आपणच काय काय लिहिले आहे त्या प्रत्येक मुद्द्याची आपल्याला पूर्णपणे जाणीव असायला हवी, त्यावर एखादा प्रश्न विचारल्यास आपणच त्यांच्याकडे भुवया उंचावून आश्चर्याने बघतोय ही वेळ येऊ नये!
● मुलाखतीमध्ये अनावश्यक विचित्र हालचाली जसे केस मागे करणे बाजूला करणे अंगठीशी खेळ पेनाशी खेळ हे टाळावे यातून असे वाटू शकते की तुम्ही घाबरलेले आहात किंवा पॅनलचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहात.
● पॅनलवरील प्रत्येकाकडे सम प्रमाणात बघून उत्तरे द्या. उत्तर देताना खाली किंवा वर किंवा एखाद्या कोपऱ्यात बघून उत्तर देणं टाळावं.
लक्षात घ्या, जशी तुम्हाला ही नोकरी हवी आहे तसेच टेबलाच्या पलीकडच्या बाजूलाही चांगले एम्प्लॉईज हवे आहेतच ना. मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य असणं चांगलं. यामुळे आपला आणि आपल्या बरोबरच एकूणच वातावरणातला ताणही कमी होईल, आणि ‘निक्काल’ न लागता चांगला निकाल लागेल !!
bhooshankelkar@hotmail.com, mkelkar_2008 @yahoo. com