प्रा. रवींद्र कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधीची चर्चा आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली होती. परदेशी उच्च शिक्षण संस्थां किंवा विद्यापीठांसमवेत समवेत भारतीय उच्च शिक्षण संस्था किंवा विद्यापीठे ही त्यांचा संयुक्त किंवा दुहेरी पदवी कार्यक्रम कसा आखणार यावर आज प्रा. रमेश सर सांगणार होते. प्रा. सुनील, प्रा. सुशील, प्रा. महेश यांच्याबरोबर आज सुनीता, वेदिका, मेगन, हंसिका, मिलिंद, तन्मय, जावेद असे विविध महाविद्यालयांतून नुकतेच पदवीधर झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनीही आज चर्चेत सहभागी झाले होते. सर्वानाच आता यासंबधी उत्सुकता निर्माण झालेली होती. प्रा. महेश सरांनी रमेश सरांना विचारलं, ‘‘सर, दुहेरी किंवा संयुक्त पदवी अभ्यासक्रम कसा तयार केला जाईल?’’ तन्मय नुकताच परदेशी विद्यापीठांतून एक पदवी मिळवून परतला होता. त्यानं विचारलं, ‘‘सर, भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्था आपापला अभ्यासक्रम स्वतंत्रपणे आखतील किंवा कसं?’’

प्रा. रमेश सर म्हणाले, ‘‘सांगतो, सांगतो. घाई करू नका. भारतीय किंवा परदेशी उच्च शिक्षण संस्था या दुहेरी पदवी कार्यक्रमाच्या तयारीसाठी एकाच विषयात किंवा विषय क्षेत्रात आणि समान स्तरावर एकत्र येतील आणि अभ्यासक्रम संयुक्तपणे तयार करतील. अशा कार्यक्रमांसाठीच्या पदव्या भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्थांद्वारे स्वतंत्रपणे आणि एकाच वेळी दोन्ही संस्थांच्या पदवी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता पूर्ण केल्यावर प्रदान केल्या जातील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, हे कोणत्याही प्रकारे वेगळय़ा विषयातील किंवा विषय क्षेत्रांमध्ये आणि/ किंवा एकाच वेळी पाठपुरावा केल्या जाणाऱ्या स्तरांवरील स्वतंत्र असे दोन पदवी कार्यक्रम असे मानले जाऊ शकत नाही. या कार्यक्रमांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतीय उच्च शिक्षण संस्थेकडून एकूण श्रेयांकांपैकी किमान ३० टक्के श्रेयांक मिळवणे आवश्यक आहे. परदेशी संस्थांमधून भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांक आणि भारतीय संस्थांमधून परदेशी विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांक हे पारंपरिक पद्धतीने दिले जातील.

विद्यापीठे अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, संयुक्त पदवी कार्यक्रम अभ्यासक्रमाची रचना भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्थेद्वारे संयुक्तपणे केली जाईल. विद्यार्थ्यांनी संयुक्त पदवी कार्यक्रम पूर्ण केल्यावर त्यांना प्रदान केली जाणारी पदवी ही भारतीय उच्च शिक्षण संस्था आणि सहयोगी परदेशी उच्च शिक्षण संस्थेद्वारे एकाच प्रमाणपत्र देऊन प्रदान केली जाईल. यात सहभागी झालेली प्रत्येक उच्च शिक्षण संस्था ही त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमांसाठी एक  Transcript जाहीर करेल आणि त्याद्वारे संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमातील कोणकोणते घटक पूर्ण केले आहेत त्याविषयी माहिती देईल.’’

वेदिकाने रमेश सरांना मध्येच थांबवून विचारलं, ‘‘सर, एखाद्या विद्यार्थ्यांला किंवा विद्यार्थिनीला काही कारणास्तव संयुक्त किंवा दुहेरी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही तर त्यांनी पूर्ण केलेल्या अभ्यास घटकांशी संबंधित श्रेयांक त्यांना भविष्यात वापरता येतील का?’’ रमेश सर त्वरित म्हणाले, ‘‘होय, अशा प्रकारची तरतूद या संयुक्त वा दुहेरी पदवी अभ्यासक्रमांत सहभागी झालेल्या भारतीय वा परदेशी उच्च शिक्षण संस्थांनी तयार करून ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दुहेरी आणि संयुक्त पदवी कार्यक्रमांशी संबंधित इतर सर्व तरतुदींसदर्भात सहभागी संस्थांनी त्यांच्या संबंधित संस्था आणि देशाच्या संबंधित नियम, नियम आणि कायद्यांचे पालन करून परस्पर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे.’’

प्रा. महेश सरांना एक नवाच प्रश्न पडला. त्यांनी रमेश सरांना विचारलं, ‘‘सर,  Twinning पदवी अभ्यासक्रम व्यवस्थेशी संबंधित अभ्यासक्रम आणि श्रेयांकांची मान्यता यांच्याबद्दल काय?’’ प्रा. रमेश सर म्हणाले, ‘‘Twinning पदवी अभ्यासक्रम ही एक सहयोगी व्यवस्था असेल. या व्यवस्थेद्वारे भारतीय उच्च शिक्षण संस्थेमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी त्यांचा अभ्यासाचा कार्यक्रम अंशत: भारतात, संबंधित  UGC नियमांचे पालन करून आणि अंशत: परदेशी उच्च शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण करू शकतील. भारतीय आणि परदेशी विद्यापीठांनी अशा प्रकारे  Twinning अभ्यासक्रमांची रचना एकत्रितपणे करायला हवी. तथापि,  Twinning पदवी अभ्यासक्रम व्यवस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणारी पदवी ही केवळ महाराष्ट्रातील राज्य सार्वजनिक विद्यापीठांसह भारतीय उच्च शिक्षण संस्थेद्वारे दिली जाईल, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या संदर्भात  Twinning वा संयुक्त पदवी अभ्यासक्रमांत सहयोगी असलेली प्रत्येक उच्च शिक्षण संस्था ही आपापल्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या घटकांविषयी टिप्पणी देणारा  Transcript जारी करेल. दुहेरी,  Twinning वा संयुक्त पदवी अभ्यासक्रमांमागील एक महत्त्वाची कल्पना म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक समन्वयाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास!’’ रमेश सर सांगत होते, ‘‘दुहेरी,  Twinning वा संयुक्त अभ्यासक्रमांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना एक प्रकारची गतिशीलता लाभेल; या गतिशीलतेमुळे आपल्या विद्यार्थ्यांना परदेशी संस्था/विद्यापीठांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या सर्वोत्तम पद्धती, दृष्टिकोन आणि शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती समजून येतील आणि त्यांनी आपला विद्यार्थी काळाची नवनवी आव्हानं स्वीकारण्यासाठी सुसज्ज होईल; आपल्या भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या क्षमता यामुळे वाढवण्यात मदत होईल आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची करिअर निवडण्यामध्ये मदत होईल. संयुक्त अभ्यासक्रमाची आखणी करताना विद्यार्थ्यांच्या गरजेचा विचार करून मग, मूल्यांकनाच्या आधारे आणि संबंधित सत्राच्या अभ्यासक्रमाच्या संरचनेला पूरक अशी संयुक्त अभ्यासक्रमाची रचना तयार केली जाऊ शकते.’’

सुशील सरांनी प्रश्न केला, ‘‘सर, या दुहेरी,  Twinning किंवा संयुक्त पदवी अभ्यासक्रमांच्या श्रेयांकांचं हस्तांतरण कसं केलं जाणार आहे?’’ प्रा. रमेश सरांनी उत्तर दिलं, ‘‘विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, १९५६ च्या कलम २२(३) च्या तरतुदींच्या अनुषंगाने श्रेयांकांचं मानांकन आणि हस्तांतरण व्यवस्था तयार केली जाईल. या टप्प्यावर आपण एक गोष्ट समजून घेऊ या ती म्हणजे, श्रेयांक मान्यता आणि हस्तांतरण म्हणजे काय? याचं उत्तर आहे, परदेशी उच्च शिक्षण संस्थेद्वारे एखाद्या अभ्यासक्रमासाठी दिले जाणारे श्रेयांक व त्यांना मान्यता देणे, त्यांचे परिमाण ठरवणे आणि अभ्यासक्रमांत त्यांना समाविष्ट करणे! परदेशी उच्च शिक्षण संस्थेनं विद्यार्थ्यांना, त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, द्यावयाचे जे श्रेयांक आहेत त्यांना मान्यता देण्यासाठी, त्यांचे हस्तांतरण होण्यासाठी राज्य सार्वजनिक विद्यापीठांबरोबर किंवा उच्च शिक्षण संस्थांसमवेत एक अन्योन्य व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक ते करार त्यांनी परस्परांत करून घेणे आवश्यक ठरेल. असे असले तरी, इथं एक अट आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमांमधून मिळवलेले श्रेयांक हे एकूण श्रेयांक व्यवस्थेच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक असू नयेत. एखाद्या विद्यार्थ्यांला वा विद्यार्थिनीला जर दुहेरी वा संयुक्त पदवी अभ्यासक्रम पूर्ण न करता मध्येच सोडावा लागला तर, त्यांना तो अभ्यासक्रम सोडण्यासाठी म्हणजे त्यातून निर्गमन करण्यासाठी व तोवर मिळवलेले श्रेयांक भविष्यात पुन्हा वापरता येण्यासाठी, योग्य ती तरतूद संबंधित दोन्ही- भारतीय व परदेशी उच्च शिक्षण संस्थांनी करून ठेवणे आवश्यक असेल.’’ रमेश सर थांबले व म्हणाले, ‘‘पुढच्या वेळेस आपण या धोरणाचे आणखी काही वेगळे पैलू पाहू या.’’

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Introduction to new education policy courses with foreign universities zws
Show comments