प्रा. रवींद्र कुलकर्णी

प्रा. गोविंद यांनी विचारले; ‘‘रमेश सर, स्कूल संकल्पना ही आता देशातील बहुसंख्य विद्यापीठांनी बहुविद्याशाखीय संशोधन आणि विविध विभागातील शैक्षणिक सहकार्यासाठी स्वीकारलेली संकल्पना आहे. आता ही संकल्पना विविध महाविद्यालयांमध्ये पाझरली पाहिजे.’’

रमेश सर म्हणाले, ‘‘बरोबर. NEP 2020  ही ज्ञान आणि संशोधनाच्या स्तरावरील विविध विषयांच्या बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय देवाणघेवाणीच्या संकल्पनेला चालना देते आहे आणि त्यामुळे आजवर झालेले शिक्षणाचे कप्पाबंदीकरण दूर होईल. मित्रांनो,  NEP अंतर्गत बहुविद्याशाखीय किंवा स्कूल विशिष्ट मुख्य शिक्षणक्रम, अध्ययन आणि संशोधन जर विकसित करायचा असेल तर त्यासाठी विविध महाविद्यालयात/ विद्यापीठांत, विविध विषयांच्या विभागांतर्गत असणाऱ्या समान सूत्रांना एकत्र आणून त्यांच्यात सहकार्य निर्माण करणे आणि स्कूल विशिष्ट दृष्टिकोन संकल्पना निर्माण करणे आवश्यक ठरेल. उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पाली, उर्दू, कन्नड, तमिळ, इत्यादी भाषा विभाग हे भारतीय भाषांच्या एका छत्राखाली एकत्र येऊन त्याद्वारे तौलनिक साहित्य, अनुभवात्मक भाषा अध्यापन, अनुवाद आणि अर्थनकौशल्य, वैज्ञानिक आणि तांत्रिक भाषा, सामग्री लेखन (content writing), डिजिटल मार्केटिंग, भाषांसाठी डिजिटल आणि तांत्रिक उपाय, ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन इत्यादी विविध विषय अभ्यासले जाऊ शकतात. हा स्कूल विषयक दृष्टिकोन मानवी भाषांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी भाषांचा अभ्यास हा भाषाविज्ञानाबरोबरही जोडला जाऊ शकतो. याप्रकारे स्कूल विशिष्ट दृष्टिकोन वापरून भाषा हा मुख्य विषय ठेवून, तीन किंवा चार वर्षांचा पदवी पातळीवरील, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम निर्माण करता येऊ शकतो. याचपद्धतीने स्कूल विशिष्ट दृष्टिकोन ठेवून जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, जपानी, मॅंडरिन इत्यादी परकीय भाषांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे. सामाजिक विज्ञान स्कूल या विशिष्ट दृष्टिकोनातून इतिहास, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांतील अध्ययन आणि संशोधन सोपे ठरू शकते. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी यांसारखे विषय स्कूल ऑफ बायोलॉजिकल किंवा लाइफ सायन्सेस या विशाल छत्राखाली एकत्र येऊन अध्ययन आणि संशोधन करू शकतात.

बहुविद्याशाखीय किंवा अंब्रेला स्कूल (Umbrella School) संकल्पने अंतर्गत अनेक फायदे मिळतात. उदा. विविध विषयांच्या शिक्षकांना/विद्यार्थ्यांना आंतर्विद्याशाखीय संशोधन प्रकल्प किंवा संशोधन साहाय्य यासाठी प्रोत्साहन, पायाभूत सुविधा आणि संसाधनांची देवाणघेवाण (ग्रंथालये, वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांच्या पायाभूत सुविधा, लॅंग्वेज लॅब, स्मार्ट क्लासरूम, इ सामग्री असलेल्या अत्याधुनिक वैशिष्टय़पूर्ण सुविधा) आणि सर्वोत्तम उपक्रमांची (best practices) देवाणघेवाण. अर्थात याबाबतीत विद्यापीठाच्या विद्यापरिषदेचा धोरणात्मक  निर्णय अंतिम असेल.’’

रमेश सर म्हणाले, ‘‘आता आंतरविद्याशाखीय मुख्य (Interdisciplinary Major) विषयांच्या निवडीबद्दल आपण बोलूया. आंतरविद्याशाखीय मुख्य विषय म्हणजे दोन किंवा अधिक शैक्षणिक विषयांचे एकत्रीकरण आणि त्यातून एक नवे विषयसूत्र!  उदाहरणार्थ, विज्ञान शाखेमधील नॅनो टेक्नॉलोजी (Nanotechnology) हा एक आंतरशाखीय विषय/अभ्यासक्रम आहे. हा विषय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विज्ञानशाखेतील विषयांमधील परस्पर संबंधांवर आधारित आहे किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि केमिकल इंजिनीअरिंग या अभियांत्रिकी विद्याशाखेतील अंतर्गत संबंधांवर आधारित आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अंतर्गत मेकॅट्रॉनिक्स हा आंतरविद्याशाखीय मुख्य विषय जो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि कम्प्युटर इंजिनीअरिंग यांच्या एकत्रीकरणामधून तयार होतो. तीन/चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) पदवी अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय श्रेयांक घटक विषयांमध्ये वितरीत केले जातील ज्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातून योग्य ती क्षमता प्राप्त होईल. उदाहरणार्थ, एकोनोमेट्रिक्स ((Econometrics) या  आंतरविद्याशाखिय  विषयातील बहुविद्याशाखीय पदवी मिळविण्यासाठी अर्थशास्त्र, सांख्यिकी (Statistics) आणि गणित या विषयांचे अभ्यासक्रमातील श्रेयांक विद्यार्थ्यांनी मिळविणे आवश्यक ठरेल. या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना एकोनोमेट्रिक्स या विषयाचे सखोल ज्ञान मिळेल कारण वरील विषयातील विविध श्रेयांक त्यांना मिळालेले असतील. अशा विद्यार्थ्यांना एकोनोमेट्रिक्समध्ये तीन वर्षांची  बीएसस्सी ही पदवी किंवा चार वर्षांची  बीएसस्सी(ऑनर्स) किंवा बीएसस्सी (संशोधनासह ऑनर्स) ही पदवी प्रदान केली जाईल.

आंतरविद्याशाखीय मुख्य विषयांच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी समज ही विविध अभ्यासशाखांमधील (academic discipline) आंतरिक संबंध उलगडून पाहायला उपकारक ठरते; ती ज्ञानात्मक परिमाणाकडे पाहण्याची सर्वागीण दृष्टी देते. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनामधून अध्यापन करणाऱ्या शिक्षकाने, विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या विषयासंबंधीच्या एका बाजूचे त्यांना आकलन होणारे ज्ञान आणि अन्य पूरक विषयासंबंधीचे अन्य प्रकारचे ज्ञान यांच्यातील संबंध  कसा निर्माण करायचा याचे ज्ञान देणे अपेक्षित आहे.’’

रमेश सर म्हणाले, ‘‘आता विद्याशाखीय विशिष्ट विषय किंवा दुहेरी मुख्य विषयांच्या निवडीबद्दल आपण बोलूया. विद्याशाखीय विशिष्ट विषय किंवा दुहेरी मुख्य विषय यांच्यासह येणारा पदवी अभ्यासक्रम हा पहिल्या तीन वर्षांसाठी मुख्य विषय म्हणून दोन वेगळय़ा विषयांची निवड करण्याची परवानगी देतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विषय स्कूल स्पेसिफिक कोअर (SSC)) सारखे एकमेकांशी संबंधित असायलाच हवे, असे नाही. पण ते एका विद्याशाखेशी संबंधित असायला हवे. उदाहरणार्थ, विज्ञान विद्याशाखेतील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र; मानव्यविद्या शाखेतील समाजशास्त्र आणि इतिहास इत्यादी. विद्यार्थ्यांला ऑनर्स/ संशोधन पदवीच्या चौथ्या वर्षांसाठी या दोनपैकी एकाच विषयाची निवड करावी लागेल. अशा प्रकारे चौथ्या आणि अंतिम वर्षांत निवडलेला एक विषय हा FSC अंतर्गत प्रमुख विषय बनतो आणि दुसरा- अंतिम वर्षांसाठी न निवडलेला विषय साहाय्यक/पूरक विषय बनतो. (अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर)