प्रा. रवींद्र कुलकर्णी

आपल्याला यावेळी भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल अधिक माहिती मिळणार या उत्सुकतेपोटी आज पुन्हा सारे जण एकत्र जमले होते. अक्षयला राहवेना. प्रा. रमेश सर आल्या आल्या त्याने सरांना विचारलं, ‘‘सर, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) हा आता परवलीचा शब्द बनणार, असं तुमच्या बोलण्यातून आम्हाला कळलं. पण  IKS चे अभ्यासक्रम कसे असतील? त्यांचं स्वरूप कसं असावं? याबद्दल सांगा ना.’’

प्रा. रमेश सरांनी त्याला थोपवलं व म्हणाले, ‘‘तरुण मित्रा, थांब. पण तुमच्या सर्वाच्या मनात जी उत्सुकता आहे, ती रास्तच आहे.  IKS या संकल्पनेने भारताविषयीच्या बहुतेक सर्व घटकांना व विविध विषयांना आपल्यात सामावून घेतले आहे. प्रत्येक अभ्यासक्रमात  IKS चा समावेश करता येणं शक्य आहे. आता बघ, जेव्हा एखादा विद्यार्थी रसायनशास्त्र/ मटेरियल सायन्स/ मेटलर्जिकल इंजिनीअरिंगची मुख्य विषय म्हणून निवड करतो, तेव्हा या विषयांच्या पहिल्या/दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये ‘रस रत्न समुचायात’ जटिल धातूशास्त्र, पोलाद-निर्मिती आणि जस्त-निर्मिती दिलेल्या तपशिलावर आधारित २ श्रेयांकाच्या मॉडय़ूलचा/ युनिटचा समावेश करता येऊ शकतो. तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या  IKS अभ्यासक्रमात शंकराचार्याचे ब्रह्मसूत्र भाष्य, रामानुजाचार्याचे श्री भाष्य, मध्वाचार्याचे गीता भाष्य, नागार्जुनाचे मूलमाध्यमकारिका आणि दिग्नागाचे प्रमाण समुच्चय यांचा समावेश करता येणे शक्य आहे. याचप्रमाणे IKS च्या विविध घटकांचा ज्या वेगवेगळय़ा विषयांमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो, ते पुढीलप्रमाणे असू शकतात: आर्यभट यांची आणि वराहमिहिराची बृहत् संहिता आणि ग्रहांच्या हालचाली, सौर-केंद्रित जग, खगोलशास्त्रासाठी पृथ्वीचा आकार आणि व्यास; योगासाठी पतंजलीची योगसूत्रे; सुश्रुतची सुश्रुत संहिता, शस्त्रक्रिया प्रक्रिया, आरोग्य आणि कल्याण, आयुर्वेदातील वनस्पती आणि औषधी वनस्पती, क्षेमाशर्माचे औषधिकी (Pharmacy), औषध (Medicine) आणि शस्त्रक्रिया (Surgery) शी संबंधीत चरक आणि सुश्रुत संहिता, आहारशास्त्र आणि आरोग्यावर क्षेमकुटुलम इ.’’

हेही वाचा >>> यूपीएससीसाठी महत्त्वाचे : नीतिशास्त्र; लोभ आणि गरज या संकल्पना काय आहेत?

रमेश सर सांगू लागले, ‘‘याचबरोबर आपण  IKS मधे स्थापत्य अभियांत्रिकीसाठी नारदांचे शिल्पसार आणि मायामुनींचे मायामत; जहाज बांधणीसाठी भोजाचे युक्तकल्पतरू; शून्याचा शोध, अंकांची दशांश प्रणाली, आणि ‘पाय’ (?) च्या अंदाजित गणनेसाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या (algorithms), भूमितीवरील शुल्ब सूत्र, भास्कराचार्याचा लीलावती हा गणितावरील ग्रंथ; संस्कृत व्याकरण भाषा आणि भाषाशास्त्रावर पाणिनीची अष्टाध्यायी; नागरिक आणि राजकारणासाठी सुशासन आणि करप्रणालीसह सार्वजनिक प्रशासन, वेदांवर सायनाचे सायना भाष्य, नृत्यासाठी भरतचे नाटय़शास्त्र; अर्थशास्त्रासाठी कौटिल्य अर्थशास्त्र; नैतिक विज्ञान/ मूल्य शिक्षणासाठी विष्णू शर्माच्या पंच तंत्र कथा, तर्कशास्त्र आणि कायद्यावरील गौतमाचे न्याय सूत्र, ऑन्टोलॉजीसाठी कानडाचे वैशेषिक सूत्र इ. सहृदहो, मी या मांडणीसाठी संदर्भ घेतलाय तो ‘भारतीय ज्ञान प्रणालीचा परिचय : संकल्पना आणि अनुप्रयोग’, बी. महादेवन, विनायक रजत भट, नागेंद्र पवना आर.एन., (पीएचआय लर्निग प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली) २०२२ या ग्रंथाचा.’’

प्रा. महेश यांनी विचारलं, ‘‘सर, हा खूपच रंजक आणि आनंददायी अभ्यास ठरू शकेल. आपण  IKS हा एक स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून देऊ शकतो का?’’

प्रा. रमेश उत्तरले, ‘‘वैकल्पिकरित्या, दोन श्रेयांकांचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून  IKS हा विषय दिला जाऊ शकतो. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) यांनी २०१८ मध्ये अभ्यासक्रमात सुधारणा करताना, भारतीय नॉलेज सिस्टीम (IKS) वर एक अनिवार्य पण श्रेयांक नसलेला एक अभ्यासक्रम व भारताचे संविधान आणि पर्यावरण विज्ञान या विषयावर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्च २०२३ मध्ये उच्च शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानाचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की  IKS वरील संशोधन हे भारतातील शाळा, महाविद्यालये आणि सर्व उच्च शिक्षण संस्थांनी हाती घेतलेल्या अनिवार्य कार्यापैकी एक असले पाहिजे आणि उच्च शिक्षणाच्या इतर संस्थांमध्ये  IKS शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग बनला पाहिजे.’’

प्रा. सुनील सरांनी विचारलं, ‘‘सर,  IKS अंतर्गत श्रेयांकांची विभागणी कशी असायला हवी? म्हणजे मुख्य विषयाशी निगडित अशा  IKS च्या श्रेयांकांची टक्केवारी किती असायला हवी?’’

हेही वाचा >>> UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय यांच्यात नेमका फरक काय?

रमेश सरांनी सांगितलं, ‘‘ IKS मध्ये वाटप केलेल्या क्रेडिट्सपैकी किमान ५० टक्के मुख्य विषयाशी संबंधित असले पाहिजेत आणि मुख्य विषयासाठी निर्धारित केलेले असायला हवेत. या IKS अभ्यासक्रमांसाठी लागणारी अभ्याससामग्री – उदा. स्त्रोत ग्रंथ, ऐतिहासिक नोंदी, शिलालेख आणि अन्य नोंदी, विविध प्रकारचं उपलब्ध साहित्य आणि इतर पुरावे, तसेच विविध समुदायांच्या वर्तमान पद्धतींच्या नेमक्या असलेल्या समाजशास्त्रीय नोंदी या सर्व बाबी अस्सल स्रोतांवर आधारित आहे याची खात्री करण्यासाठी अभ्यास मंडळांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी कोणत्याही सांगोवांगीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये.’’

प्रा. महेश सरांनी सजगतेनं विचारलं, ‘‘सर, IKS च्या अभ्यासक्रमरचनेच्या वेळी आणखी कोणती काळजी घ्यायला हवी?’’ रमेश सर उत्तरले, ‘‘प्राचीन काळापासून ते अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकाच्या तुलनेने अलीकडच्या काळामधील भारतीय ज्ञान परंपरांच्या सातत्यांवर, अभ्यासक्रमाच्या आशयाच्या रचनेत भर दिला गेला पाहिजे. भारतीय ज्ञान परंपरांची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि मूलभूत संकल्पना यासारख्या वैशिष्टय़पूर्ण वैशिष्टय़ांवर प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, जे त्यांना जगातील इतर ज्ञान परंपरांपासून वेगळे करतात. जेथे शक्य असेल तेथे, भारतीय ज्ञान परंपरांचे समकालीन उपयोग सूचित करायला हवे.’’

हेही वाचा >>> UPSC-MPSC : ‘एक्झिम बँक’ काय आहे? ती स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता?

अक्षयने प्रश्न विचारला, ‘‘सर, IKS अभ्यासक्रम शिकवण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर करायला हवा? म्हणजे कोणत्या भाषेत शिकवायला हवं?’’

रमेश सर म्हणाले, ‘‘कोणत्याही अधिकृत भारतीय भाषेमधे तुम्हाला IKSचे अभ्यासक्रम शिकवता येतील. आणखी एक महत्त्वाची काळजी तुम्ही घेऊ शकता, ती म्हणजे संस्कृत भाषेतील सर्व संकल्पना/ संज्ञा/ अवतरणे ही देवनागरी लिपीमधे उद्धृत केली जावीत. अभ्यासक्रम जर इंग्रजी भाषेत दिले असतील तर त्या संकल्पना/ संज्ञा/ अवतरणांचे इंग्रजी भाषेत लिप्यंतरण करणे आवश्यक आहे. मित्रहो, मला आशा आहे, तुमच्या मनातील अनेक शंकांचे मी निरसन केले आहे. आज इथंच थांबू या. पुढच्या शुक्रवारी, आपण पुन्हा भेटू या  NEP -2020 च्या नव्या घटकासंबंधी बोलायला. अच्छा!’’ अनुवाद- डॉ. नीतिन आरेकर