मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. शोध पत्रकारितेचे जग वास्तवात बरेच वेगळेे आहे. त्यातही अजून स्त्रियांचा दबदबा कमीच म्हणावा लागेल. अशा क्षेत्रात नीना पाटील या तरुणीने पाय रोवायला सुरुवात केली. तिच्या वाटचालीची साक्षीदार असणाऱ्या आजीचा तिच्या कर्तृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आमचं बिऱ्हाड. नियतीचे कठोर आघात सोसत माझ्या आयुष्याची वाटचाल चालू आहे ती बहुदा अमेरिकेतच संपेल. स्वत:ची भरभराटीला आलेली कंपनी आणि दोन गोजिरवाणी मुले सोडून माझे यजमान अचानक अपघातात गेले. मुलीने पदवी घेत असतानाच प्रेमविवाह केला. एका नवोदित पत्रकार पाटलाशी. मालकाशी भांडण करून पत्रकारितेतून बाहेर पडल्यावर जावयाने वकिलीचे शिक्षण घेतले. सातारजवळ शेतीवाडी असलेली घरंदाज पाटील मंडळी तशी सधनच होती. जावयाचा तडफदार स्वभाव भांडकुदळ म्हणावा असाच. पण वकिलीमध्ये त्याने छान जम बसवला, नाव पण कमावले. एका बड्या राजकारण्याने एका साध्या सरळ शिक्षिकेवर लावलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात त्या शिक्षिकेचे वकीलपत्र त्याने घेतले होते. त्याची अंतिम सुनावणी करून तो घरी आला आणि सारेच संपले. आठ वर्षाच्या नीनाला घेऊन मुलगी दादरला परत आली. तो खटला राजकारणी हरला आणि नंतर धमक्यांचे सत्र सुरू झाले होते. जेमतेम वर्षभरात नीनाला माझ्याकडे सोपवून मुलीने दुसरे लग्न केले व ऑस्ट्रेलियाला निघून गेली. काही कोटींच्या जायदादीची नीना मालकीण बनली, पण ती सज्ञान होईपर्यंत हे सारे सांभाळण्याची जबाबदारी माझ्या गळ्यात आली.

वाटचाल वकिलीची

शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये असताना तिने वकील व्हायचे ठरवले आणि पुन्हा माझ्या मनात धसका उभा राहिला होता. थोडाफार वडिलांसारखाच नीनाचा स्वभाव असल्याने जुन्या आठवणी उफाळून आल्या. तशी ती जात्याच अभ्यासू व हुशार असल्याने सर्व शैक्षणिक वाटचाल चांगली झाली.

पुढे काय करायचे याबद्दल तिचे काहीच ठरत नसताना अचानक माझा धाकटा मुलगा अमेरिकेतून आला. नीनाचे पुढचे शिक्षण तिने अमेरिकेत घ्यावे. वाटल्यास नंतर तिथे राहावे किंवा परत यावे. मात्र, मला त्याने कायमचे अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी सारी कागदपत्रे तयार करून आणली होती. एका प्रकारे जुन्या साऱ्या आठवणींवर पडदा पाठवून सगळ्यांची आयुष्य नव्याने सुरू होणाऱ्या आनंदात मी होते. कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण नीना घेईल याविषयी माझ्या मनात फारशी शंका नव्हती. पण तिने जो शोध घेतला तो मात्र मला धक्कादायक होता. नीनाचे वडील सुरुवातीला पत्रकार होते ही गोष्ट आजपर्यंत तिला मी कधीही सांगितलेली नव्हती. आता वडिलांप्रमाणे वकील बनलेली नीना आता पत्रकारितेमध्ये, तेही इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझममध्ये प्रशिक्षण घेणार यातून नवीन काही भलते सलते घडू नये याची मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. अमेरिकेतील वास्तव्यामध्ये वृत्तपत्रे, पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील लव्ह हेट रिलेशनशिप रोजच पाहायला, वाचायला, ऐकायला मिळत होती. ज्युलियन असांजच्या बातम्या ठळकपणे वाचताना माझी नात काय करणार याची काळजी मन पोखरत असे. माझे वास्तव्य मुलाकडे तर नीना ८०० मैल दूर शिक्षणाकरता एकटीच राहिलेली. तिचा मामा व आई दोघांनाही यातील गांभीर्य कळत असले तरी वयानुसार त्यांनी त्याकडे सहज दुर्लक्ष केले होते.

कामाला सुरुवात

नीनाचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच तिची इंटर्नशिप सुरू झाली. राजकीय दृष्ट्या जगातील अनेक देशात उलथापालथीचा काळ सुरू झालेला होता. डिजिटल मीडियाने प्रिंट मीडियावर आक्रमण करून त्याला झाकोळून टाकले होते. तरीही मुद्देसूद पुराव्यानिशी एखाद्या विषयाच्या मुळाशी जाण्याच्या पद्धती अनुभवातून शिकणे ही भारतीय पद्धत. या ऐवजी रीतसर अभ्यासक्रमातून शिकणे या नीनाच्या प्रशिक्षणाची दखल नवीन मीडियाने घेतली. हे मात्र मला हळूहळू सुखावणारे घडत होते.

मागच्याच आठवड्यात हिंदू कॉलनीमधील माझ्या जुन्या शेजारणीकडून नीनाने केलेल्या मुंबई मेट्रोच्या कार शेड वरील वादातील मुद्द्यांवर एका सखोल विश्लेषणातून लिहिलेल्या वार्तांकनाचे कौतुक सोशल मीडियावर वाचल्याचे कळवले. हे सारे नीना अमेरिकेत असतानाच घडायला सुरुवात झाली होती.

मराठीमध्ये रुळलेला ‘शोध पत्रकारिता’, हा शब्द मला अमेरिकेत नव्याने भेटत होता तोही माझ्या नातीच्या नावाने. पत्रकार नीना पाटीलची मी आजी आहे हे माझ्या मुंबईकर मैत्रिणींना आता चांगले माहिती झाले आहे.