स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्याचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास घडवून आणते. यश मिळाले नाही तरी तो त्यातून उत्तमसेवा देण्याचा प्रयत्न करतो. मग तो व्यापारी असो, उद्योजक असो किंवा शेतकरी. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगताहेत, आसामचे साहायक पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ. धनंजय घनवट.
मी सातारा</strong> सैनिक स्कूल मध्ये होतो. माझेही लष्करात जायचे स्वप्न होते. बारावीनंतर तिथे तुमच्या पालकांना बोलावून त्यांचे मत विचारात घेतले जाते. इंजिनीअरिंग, मेडिकल आणि एनडीएची परीक्षाही मी पास झालो होतो. मला तिन्ही क्षेत्रात रस होता. तिन्ही ठिकाणी मला प्रवेश घेता येणार होता. माझ्या पालकांनी मेडिकल क्षेत्र निवडले आणि मी तिकडे वळलो.
जे.जे. रुग्णालयात शिकताना रुग्णाची सामाजिक स्थितीही अभ्यासता आली. सरकारी रुग्णालयांत असणाऱ्या सरकारी योजना, मग त्या बनवतो कोण, त्यासाठी काय अभ्यासले जाते, याची माहिती घेता घेता नागरी सेवा परीक्षांचीही आवड निर्माण झाली. त्यातही मला फॉरेन सर्व्हिसची आवड जास्त होती. कारण वाचनाची आवड होती. जी सैनिक स्कूलमध्ये लागली होती. मेडिकल कॉलेजला असतानीही मी वृत्तपत्र वाचणे कधीच सोडले नाही. अगदी परीक्षा काळातही ही सवय कायम होती. त्यातूनच मग शशी थरूर यांची ओळख झाली. मुंबईत त्यांचे व्याख्यान ऐकता आले. मग त्यातूनच फॉरेन सर्व्हिसकडे वळलो. वैद्याकीय क्षेत्रातून इंडियन फॉरेन सर्व्हिसकडे वळलेले डॉ. शिल्पक आंबुले यांना भेटलो. त्यांचे मार्गदर्शन घेतले. वेळोवेळी अनेकांचे मार्गदर्शन मिळत गेले. ‘आयएफएस’साठी चार मार्क कमी पडले, आणि सैनिक स्कूलच्या पार्श्वभूमीमुळे आयपीएस मिळाले. अर्थात मला त्याचाही आनंद होता. कारण खाकी पोशाख मी १९९० पासून एनसीसीत असल्यापासून घालत होतो.
हेही वाचा >>> महाविद्यालयांसाठी मोठी बातमी, नॅक मूल्यांकनातून आता श्रेणी पद्धत हद्दपार
माझं स्वप्न हळूहळू विकसित होत गेलं म्हणून साकारायला वेळ लागला. तेच काही गोष्टींची माहिती पहिल्यापासूनच असती तर कदाचित कमी वेळेत ते पूर्ण झालं असतं. दोनदा परीक्षा दिल्यानंतर बहिणीचं लग्न करायचे होते, वडिलांची निवृत्ती जवळ आली आहे, इतर काही वैयक्तिक कारणांमुळे मी ड्रॉप घेतला आणि नोकरी करू लागलो. अर्थात डॉक्टर असल्यामुळे माझा प्लॅन बी रेडीच होता. आणि तो असणे खरच खूप गरजेचे आहे. कारण माझा प्लॅन बी तयार असल्याचे मला तो लगेच अमलात आणता आला. ओएनजीसीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जॉइन झालो.
त्यादरम्यान नातेवाईकांच्या, मित्रांच्या भुवया उंचावायच्या, त्याला सामोरे जावे लागले, मात्र तीही एक प्रक्रियाच होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हेही लक्षात घ्यायला हवे. कारण तिथे सगळेच जुळून यावे लागते. तुम्ही तुमच्या महाविद्यालयात, तुमच्या विषयात प्रथम आलात म्हणून तुम्हाला इथेही यश मिळेलच असे नाही. मात्र, ३५ टक्के मार्क मिळवणाराही इथे परीक्षा देऊ शकतो आणि गुणवत्ता यादीत झळकलेला विद्यार्थी. याहून उत्तम व्यासपीठ तुम्हाला सिद्ध करण्यासाठी मिळूच शकत नाही.
सकारात्मक प्रेरणा हवी
आपण करिअर म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पाहतो तेेंव्हा पालक, नातेवाईक यांना वाटणारा प्रतिष्ठेचा मुद्दा दूर ठेऊन या क्षेत्राकडे आले पाहिजे. कारण ती नरारात्मक प्रेरणा असेल. करिअर मग ते कोणतेही असू देत ते निवडताना सकारात्मक प्रेरणा असायला हवी. म्हणजे मला ते आवडते म्हणून मी ते करणार आहे, करत आहे.
स्पर्धा परीक्षांद्वारे तुम्ही एकाच वेळी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता. त्यांचे नेतृत्व करता. तुमचे अधिकार क्षेत्र वाढत जाते. त्यामुळे देशसेवा, लोकसेवा खरी आवड असेल त्यांनीच प्रथम स्पर्धा परीक्षांकडे वळले पाहिजे. अन्यथा अनेकदा घुसमट होऊ शकते.
पॅकेजचीही माहिती घ्या
माझ्या बरोबरचे इंजिनीअर झालेले मित्र परदेशात नोकरी करतात, त्यांना ऐवढे पॅकेज आहे, याने घुसमट होऊ शकते. इथे मोठे पॅकेज नसते. प्रथम विद्यार्थी त्याची माहिती घेत नाही. एक नोकरी म्हणून स्पर्धा परीक्षा दिल्या जातात आणि तुलना करताना मात्र परदेशातील पॅकेजेसशी केली जाते. त्यामुळे इथे येताना पॅकेजेसची माहिती घेऊन यायला हवी. अनेकदा स्पर्धा परीक्षांद्वारे मिळणाऱ्या नोकऱ्यांची माहिती रिल्स, चित्रपटांतून आकर्षक पद्धतीने समोर येते. जसे की लाल दिव्याची गाडी, बंगला वगैरे. मात्र, कामाचे स्वरूप, पगाराचे पॅकेज याबद्दल काहीच सांगितले जात नाही. म्हणून ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी आपल्या ओळखीचे जे स्पर्धा परीक्षांतून कुठल्यातरी पदावर आहेत किंवा जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कामाचे स्वरूप, पगार याची माहिती घ्या, म्हणजे पुढे घुसमट होत नाही.
एकदा तरी परीक्षा द्या
माझा असा आग्रह आहे की प्रत्येकाने एकदा किंवा दोनदा तरी स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. तुम्ही पदवीधर झालात की किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही या परीक्षा जरूर द्याव्यात. त्याने होते काय की एकूण शैक्षणिक पद्धतीचा समग्र अभ्यासक्रम तुम्हाला स्पर्धा परीक्षांत बघायला मिळतो. तिथे तुमच्या सगळ्या निकषांवरती कस लागतो. म्हणजे तुमची व्यक्तिमत्व परीक्षा होते, ज्ञानाची परीक्षा होते, वर्तणुकीची परीक्षा होते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने तयार केला आहे, त्यातून तुमचा सर्वांगिण विकास होतो. तसेच तुम्हाला शालेय अभ्यास किती कळाला हे त्यातून समजते. तुमच्या मूळ संकल्पना कशा तयार झाल्या आहेत हे समजते. त्या अभ्यासातून तुम्ही एक उत्तम नागरिक बनता. व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्यातून तो उत्तम निवड करून सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. मग तो व्यापारी असो, उद्योजक असो किंवा शेतकरी. त्यांना या परीक्षांतून मिळणारे ज्ञान त्यांचा विकास घडवून आणतो.