Career break : कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण करिअरमध्ये ब्रेक घेतात. भारतात करिअर ब्रेकमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त आहे. कोणी तीन वर्षाचा तर कोणी पाच वर्षाचा करिअर ब्रेक घेतात. अनेक जण १० वर्षाच्या करिअर ब्रेकनंतर पु्न्हा कामावर येण्यास उत्सुक असतात. पण करिअर ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होणे हे एक आव्हान असते. पु्न्हा जबाबदारीने काम करणे , अनेकांना अवघड जाते. पण काही महत्त्वाच्या बाबींवर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला करिअर ब्रेक त्रासदायक वाटणार नाही.
करिअर ब्रेक दरम्यान नेटवर्कमध्ये राहा
करिअर ब्रेक दरम्यान तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या नेटवर्कमध्ये राहा. त्यांच्याबरोबर संवाद कमी करू नका. तुमच्या क्षेत्रातील ट्रेंड, घडामोडी आणि विकसित होत असलेल्या कौशल्याविषयी माहिती घ्या. यामुळे तुमचे एक नेटवर्क तयार होईल ज्याद्वारे तुम्हाला नवनवीन अपडेट मिळेल.
आई झाल्यानंतर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता वाढते.
आई म्हणून तुम्ही मल्टीटास्किंग अशा समस्या सोडवता आणि आव्हानात्मक परिस्थितीत संयम राखता, हे एक कौशल्य आहे. आई झाल्यावर अनेक जबाबदाऱ्या पेलण्याची, वेळेचे महत्त्व समजून घेण्याची आणि परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते. लोकांबरोबर चांगले संबंध निर्माण करणे, सक्रिय राहणे, संवाद साधणे आणि सर्वांनी एकत्रित मिळून काम करणे, ही कौशल्ये आपोआप वाढतात आणि याचा करिअरमध्ये पुढे फायदा होतो.
कुटुंबाचे सहकार्य परत कामावर जाण्यास प्रोत्साहन देते
करिअर ब्रेक नंतर जेव्हा तुम्ही परत कामावर जाण्याचा विचार करता तेव्हा कुटुंबाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता आणि नोकरीमध्ये सक्षमपणे काम करू शकता. करिअरमध्ये ब्रेक दरम्यान आपण आपल्या कौशल्यावर लक्ष देत नाही पण कामावर परत आल्यानंतर तुमची कौशल्ये तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतात.
करिअरमध्ये ब्रेक घेतल्यानंतर परत कामावर येणे कठीण वाटू शकते, परंतु योग्य मानसिकता, नेटवर्किंग, तुमच्या क्षेत्रातील घडामोडींची माहिती आणि प्रियजनांकडून पाठिंबा व सहकार्य मिळवले, तर हे सहज शक्य आहे.