करिअरविषयक नव्या संधी उलगडून दाखवणारी लोकसत्ता मार्ग यशाचा ही कार्यशाळा नुकतीच ठाणे आणि दादर येथे पार पडली. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सारांश.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीसा ताण येतो. तर चांगले गुण मिळाले की नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळेल हे विद्यार्थ्यांच्या डोक्यात असते. परंतु कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्याकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या? याबाबतही विद्यार्थ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारतासह परदेशातही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी तरुण पिढीला ‘कौशल्य विकास प्रशिक्षणा’चे महत्त्व पटवून दिले जात असून त्या अनुषंगाने विविध उपक्रमही राबविले जात आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

सध्याचे युग हे कौशल्यावर आधारित आहे. आपल्याला अवगत असलेली कौशल्ये प्रगत व विकसित करीत राहणे, ही सध्याच्या कंपनींची गरज आहे. आपल्या कामाला कौशल्यांची जोड देणे हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. विविध टप्प्यांवर कौशल्ये ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये कौशल्याधारित शिक्षण दिले जात असून पदवी, पदव्युत्तर, एमबीए, बीबीए, अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. देशातील गुंतवणुकीचा अभ्यास केल्यावर कळते की ‘आयटी’ क्षेत्रावर प्रमुख भिस्त असून या क्षेत्रांत अनेक नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. तसेच, मोठ्या देशांतील विविध कंपन्यांमध्ये ७० टक्के भारतीय कार्यरत आहेत. आजघडीला जपानसह विविध देशांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे परदेशातील नोकरीच्या संधींबाबत माहिती व ज्यांना महाराष्ट्रातून परदेशात जायचे आहे, त्यांना मार्गदर्शन केले जाते.

अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्लेसमेन्टच्या माध्यमातून तुम्हाला नोकरीची पहिली संधी मिळते, पण ती आयुष्यभरासाठी पुरेशी नाही. पहिल्या नोकरीनंतर पुढे काय, या गोष्टीचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये तुमच्या विचारक्षमतेला चालना मिळणे आवश्यक आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासूनच विचार करायला सुरुवात करावी, प्रकल्पावर काम करायला सुरुवात करावी. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एक सर्वोत्तम उत्पादन देऊन बाहेर पडतात. योग्य महाविद्यालय व विद्यापीठांची निवड केल्यास तुमच्या विचारक्षमतेला चालना मिळेल. विद्यापीठांचे कोणकोणत्या उद्याोगसंस्थांशी सामंजस्य करार आहेत, हे पाहणेही आवश्यक आहे. तसेच, शिकत असताना कार्याअंतर्गत प्रशिक्षणही महत्त्वाचे ठरते.

जेव्हा विद्यार्थी हे भारताबाहेर शिकण्यासाठी जातात, तेव्हा आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी तेथील दुकानांमध्ये काम करतात. परंतु, हेच विद्यार्थी भारतात राहत असताना दुकानात काम करायला तयार नसतात. कारण, पालक हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलतात. खडतर परिस्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव हा विद्यार्थ्यांना मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्याही विचारक्षमतेला चालना मिळत नाही. माणूस हा अनुभवातून शिकत जातो. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता वाढीस होणे आवश्यक आहे. मराठी मातृभाषेसह, हिंदी, इंग्रजी आदी विविध ५ ते ६ भाषांचेही ज्ञान असणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is necessary to keep developing the skills in oneself dr apoorva palkar amy
Show comments