JNU Non-Teaching Recruitment 2023: जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या मेगा भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२३ आहे असे घोषित करण्यात आले होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेने जेएनयूमध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च हा जेएनयू मेगाभरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये विविध विभागातील कर्मचारी पदांसाठी ३८८ जागा असल्याची माहिती समोर आली होती. या रिक्त जागांसाठी जेएनयूतर्फ मेगा भरतीचे आयोजन केले जाणार आहे. यामार्फत सहाय्यक आणि उप-निबंधक (Assistant and Deputy Register), कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant), मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff), लघुलेखक (Stenographer) आणि अनुवादक (Translator) या जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ओपन, ओबीसी, आणि इव्हीए वर्गातील उमेदावारांना A गटामधील पदांकरिता अर्ज करण्यासाठी १,५०० रुपये भरावे लागतील, तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांकडून १,००० रुपये घेतले जातील. B गटातील नोकरी मिळवण्यासाठी ओपन, ओबीसी, आणि इव्हीए या वर्गामधील इच्छुक उमेदवारांकडून १,००० रुपये आणि एससी, एसटी आणि महिला उमेदवारांकडून ६०० रुपये आकारले जातील. या मेगा भरतीमधील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही दिव्यांग व्यक्तीकडून पैसे घेतले जाणार नाही.
उमेदवारांची निवड करताना लावले जाणारे निकष त्या-त्या पदावरुन ठरवण्यात येतील. recruitment.nta.nic.in आणि jnu.ac.in या दोन वेबसाइट्सवर भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.