Career in IAF After 12th Class: १२ वी नंतर आपण काहीतरी भन्नाट करिअर बनवावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. बहुतांश तरुणाईला भारतीय वायुसेनेविषयी फार कुतूहल असतं. जर आपण किंवा आपल्याही ओळखीत कोणी यंदा १२वी ची परीक्षा देत असेल तर आज आपण त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जर आपण भविष्यात इंडियन एअर फोर्समध्ये नोकरी करू इच्छित असेल तर आज आपण तीन मुख्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. भारतीय वायुसेनेत निवड होण्यासाठी १२ वी नंतर नेमका कशाप्रकारे अर्ज करता येईल, परीक्षेचा पॅटर्न काय असेल आणि निवडप्रक्रिया कशी असते याविषयी सविस्तर माहिती सोप्या शब्दात पाहुयात..
१२ वी उत्तीर्ण उमेदवार भारतीय वायुसेनेच्या ग्रुप X व ग्रुप Y पदांसाठी अर्ज करू शकतात. तर वायुसेनेत थेट अधिकारी पदावर निवड होण्यासाठी आपल्याला NDA तर्फे अर्ज करावा लागेल. दोन्ही नोकरीच्या संधी आपण जाणून घेऊयात.
GROUP X: या ग्रुपच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यास उमेदवारांना सुरुवातीला तांत्रिक कामे दिली जातात. पात्रता व आवडीनुसार मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल सह अन्य तांत्रिक विभागात आपली नियुक्ती होऊ शकते.
GROUP Y: या ग्रुपच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यास आपल्या नॉन- टेक्निकल कामे सोपवली जाऊ शकतात, जसे की, अकाउंट, ऍडमिन इत्यादी.
अंतर्गत प्रमोशन: ग्रुप X व ग्रुप Y या दोन्ही गटातून पुढे आपल्या अंतर्गत प्रमोशन मिळवून ऑफिसर पदावर सुद्धा काम करता येऊ शकते. यासाठी आपल्याला रिक्त जागांविषयी माहिती करून घेऊन मग अर्ज करता येतो.
जर आपल्या भारतीय वायुसेनेत थेट अधिकारी पदावर नियुक्त व्हायचे असेल तर आपल्याला NDA च्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. UPSC तर्फे वर्षातून दोन वेळा एनडीएची परीक्षा आयोजित केली जाते. ज्यात उत्तीर्ण झाल्यास निवडीनुसार भूदल, हवाई दल, नौदल यामध्ये तीन वर्षांची ट्रेनिंग पूर्ण करावी लागते
शारीरिक निकष : भारतीय वायुसेनेच्या ग्रुप X व Y अंतर्गत नोकरीसाठी शारीरिक निकष सामान्य आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांची किमान उंची १५२ सेमी असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया: इंडियन एयरफोर्समध्ये भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागते. ग्रुप X मधील पदांसाठी उमेदवारांना भौतिकशास्त्र, गणित व इंग्रजी हे विषय असतात. तर ग्रुप Y मध्ये उमेदवारांना जनरल नॉलेज, इंग्रजी व रिजनिंग (लॉजिक) संबंधित प्रश्न विचारले जातात.
हे ही वाचा<< मुंबई महानगरपालिकेत नोकरी हवीये? टायपिंग येत असल्यास, BMC मधील ‘या’ रिक्त पदांसाठी लगेच करा अर्ज
दरम्यान, माजी कर्नल राकेश मिश्र यांच्या माहितीनुसार, गणित व भौतिकशास्त्राचे २० गुण प्रत्येकी असे प्रश्न विचारले जातात तर जनरल नोलक व इंग्रजीसाठी १० गुण प्रत्येकी विचारले जातात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाते.
ऑल द बेस्ट!