प्रवीण निकम
नमस्कार मित्रांनो लेखमालेच्या आजच्या लेखात आपण एका खास फेलोशिप बद्दल जाणून घेणार आहोत. त्याआधी आजच्या लेखाचा विषय नेमका हाच का असावा तर त्यामागेही थोडा इतिहास आहे. जो सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली प्रसारमाध्यमांची भूमिका याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा केला जातो.
जागतिक स्तरावर माध्यमांच्या भूमिकेबद्दल साक्षरता आणण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. सध्याच्या युगात डिजिटल माध्यमं फोफावली असून त्यावर, चुकीची माहिती आणि अफवांचाही प्रसार वाढला आहे, त्यामुळे पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण झाली आहे. विविध विचारधारेची अनेक वृत्तपत्रं जगभर निघत असतात. अशावेळी वैचारिक स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून हा दिवस जागतिक वृत्तपत्र-स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जातो. लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. त्यातल्या चौथ्या स्तंभावर पत्रकारितेवर आणि या क्षेत्रातल्या संधी यावर आज बोलूया. या पत्रकारितेच्या क्षेत्रात तुम्ही तुमचे करिअर करू शकता, आजचा लेख अशा एका परदेशी पत्रकारितेवर आधारित फेलोशिप विषयी. तर ही फेलोशिप आहे रॉयटर्स ऑक्सफर्ड जर्नलिस्ट फेलोशिप. सध्या पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. पत्रकार म्हणून घडत असताना, परदेशी शिक्षणाची धडपड करत असताना फेलोशिप या घटकाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आज आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातील पत्रकारिता कोर्सच्या आधारित कोणती फेलोशिप आहे, हे जाणून घेणार आहोत. प्रतिष्ठित अशा ऑक्सफर्ड विद्यापीठात समूहाच्या रॉयटर्स सहकार्याने रॉयटर्स इन्स्टिट्यूट उभारली गेली आहे. यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी एक फेलोशिप प्रोग्रॅम राबवला जातो. त्या अंतर्गत माध्यमांच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व मीडिया प्रोफेशनल, तसेच मीड-करिअर पत्रकारांसाठी ऑक्सफर्डच्या माध्यमातून ‘रॉयटर्स ऑक्सफर्ड जर्नलिस्ट फेलोशिप’ दिली जाते. सहा महिन्यांच्या शैक्षणिक कोर्ससाठी निवड झालेल्या व्यक्तींचा सर्व प्रकारचा खर्च म्हणजेच ट्यूशन फी, राहण्याचा, जेवणाचा खर्च तसेच प्रवास खर्च देखील स्टायपेंडच्या माध्यमातून दिला जातो.
हेही वाचा >>> MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
प्रत्येक वर्षी जगभरातून फक्त तीसच पत्रकारांची निवड केली जाते. या कोर्सच्या निमित्ताने जगातील वेगवेगळ्या देशातून अनुभवी पत्रकार एकत्र येतात. विविध माध्यमांतील येणाऱ्या अनुभवांची व कल्पनांची देवाणघेवाण होते. इकडे येण्याचा महत्त्वाचा फायदे म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठातील अतुलनीय अभ्यास सुविधा, अग्रगण्य संशोधन केंद्रे आणि जगातील अनुभवी शिक्षक याच्या मार्गदर्शनात अभ्यास करण्याची संधी मिळते. यासाठी कोण-कोण अर्ज करू शकतात तर पत्रकारांना संशोधनात्मक नवीन दृष्टी व अनेक संधी उपलब्ध करून देणारी ही फेलोशिप असून, यासाठीची २०२४-२५ची अर्जप्रक्रिया जानेवारी २०२४ पासून सुरू होईल. ही फेलोशिप साधारणत: – ऑक्टोबर, जानेवारी किंवा एप्रिलमध्ये सुरू होते. या पत्रकार फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार पत्रकारांकडे साधारणत: – पाच वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा क्वचित प्रसंगी आपल्या कामातून समतुल्य कौशल्याचे प्रदर्शनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या फेलोशिपसाठी मुक्त किंवा शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनाही अर्ज करता येतो, परंतु जनसंपर्क किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन्समध्ये काम करणाऱ्यांकडून पत्रकार व्यक्तीचा अर्ज स्वीकारला जात नाही. अशा व्यक्तीची निवडही केली जात नाही. भारतीय पत्रकारांसाठी या फेलोशिपला अर्ज करणे शक्य आहे. या शैक्षणिक कोर्ससाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला कुठलीही इंग्रजीची चाचणी द्यावी देणे आवश्यक नाही, परंतु आपण अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये समजून घेण्यास आणि चर्चेत सामील होण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भव्य लायब्ररीतील वैयक्तिक अभ्यासापासून ते आपल्या जागतिक पत्रकार संघाशी अनौपचारिक संभाषणांपर्यंत, सध्याच्या बातम्यांची आव्हाने आणि संधींबद्दलची तुम्हाला जागरूक करणारा हा कोर्स आहे. या कोर्सच्या दरम्यान जगभरातील प्रतिष्ठित पत्रकार, संपादक, उद्याोग नेते आणि शिक्षणतज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली नियमित सेमिनारमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. सोबतच ऑक्सफर्डमध्ये पत्रकारिता, मीडिया आणि राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, सांस्कृतिक अभ्यास, तंत्रज्ञान यासारख्या व्यापक समस्यांवरील सुरू असलेल्या अनेक चर्चा आणि व्याख्यानांना उपस्थित राहण्याची तुम्हाला परवानगी दिली जाते. जेणेकरून आपल्याला अनेक पैलू समजता यावे. या फेलोशिपमध्ये प्रत्येक सत्राच्या शेवटी पत्रकार फेलोंना एका विशिष्ट घटकावर सादरीकरण द्यावे लागते आणि एका पॅनेल चर्चांसह एक परिसंवादामध्ये भाग घेणे आवश्यक असते. एकंदरीत तुम्ही पत्रकार म्हणून वाटचाल करताना चौफेर, चौकस दृष्टिकोन निर्माण करणाऱ्यासाठी हा कोर्स फायदेशीर ठरेल.
(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेनिंग स्कॉलर आहेत.)