मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. लिबरल आर्टस् अशीच एक शिक्षण शाखा. जिच्या अभ्यासातून मनोजला स्वत:चा शोध घेता आला.

मी मनोज. जन्म सांगलीचा. माझी नर्सरी, केजी झाल्यावर वडिलांनी दुबईला नोकरी घेतली. पहिली ते सहावी दुबईत शिकलो. सातवीला मध्येच भारतात यावे लागले. वडील दुबईतच राहिले आई मला घेऊन भारतात आली. ऑक्टोबरमध्ये परत आल्यामुळे माझ्या शाळेचे काय हा खूपच मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता. माझ्यासमोर तो प्रश्न कधीच नव्हता, पण आता पप्पा कायम वेगळे राहणार आहेत हे मात्र निघण्यापूर्वी माझ्या मनावर ठसले होते. एकदाचे त्याचे उत्तर मिळाल्यामुळे माझे डोके भारतात आल्याने थोडेसे शांत झाले होते. शाळेचा अभ्यास यापेक्षा घरातील शांतता, दोन-तीन मित्र असणे, एकट्याला इकडे तिकडे भटकता येणे एवढ्याचीच मला मोठी गरज होती.

केरळ, पंजाब, यूपी, एमपी, कन्नड व तेलगू वर्गमित्र असलेल्या शाळेत माझी सहा वर्षे गेली होती. मराठी समजणारा, मराठी बोलणारा, मराठी सणवारांशी जवळीक असलेला, मुंबई सोडून मराठी शहरे माहीत असलेला एकही मुलगा वर्गात नव्हता. ममा पप्पा त्यांच्या मोबाइलला मला अजिबात हात लावू देत नसत. त्यामुळे कॉमिक बुक्स पाहणे व जमेल तेवढा अभ्यास करणे या पलीकडे मला काहीही करावेसे वाटत नसे.

पुण्यात आल्यानंतर एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझी रवानगी झाली. वर्गात सात मुली आणि अकरा मुले होती. आयसीएससी बोर्डातून ६८ टक्के मार्क मिळवून मी दहावी पास झालो. शास्त्र, गणित मला येतही नव्हते, आवडत पण नव्हते. माझ्या मार्कांना सायन्स, कॉमर्सला अॅडमिशन मिळणे शक्य नव्हते. पण दुबईहून पप्पांनी काय जादू केली कळले नाही, मला एका ज्युनिअर कॉलेजमध्ये आर्ट्सला प्रवेश मिळाला. अठरा मुलांच्या वर्गातून शंभर मुलांच्या वर्गात गेल्यानंतर माझा जीव कोंडल्यासारखा झाला. माझा कॉलेजला जाण्याचा इंटरेस्टच संपला. अकरावीला चाळीस टक्के मार्क मिळवून मी जेमतेम पास झालो. महाराष्ट्र बोर्ड नावाचा वेगळाच प्रकार इथे होता. या बोर्डाचे धडे आणि भाषा सगळेच मला चमत्कारिक वाटे. मग पप्पांनी एका दिवशी माझ्या करता एक वैयक्तिक ट्युशन घेणारी टीचर घरी पाठवून दिली. रीटा मॅम हे त्यांचे नाव. अभ्यास आवडत नसला तरी रीटा मॅम बरोबर माझे दोन तास छान जायचे. ममाने कुठेतरी एक नोकरी स्वीकारली होती. त्यामुळे मॅमना दार उघडण्यापासून बाय करेपर्यंत आम्ही दोघेच घरात असत. काही दिवसांनी मला कळले की रीटा मॅम एका संस्थेत एज्युकेशनल कौन्सिलर म्हणून काम करत होत्या. तिथल्या पगारा एवढाच माझ्या ट्युशनचा पगार त्यांना मिळत होता.

माझी बारावी ममा, पप्पा आणि रीटा मॅम यांच्या इच्छेप्रमाणे यथासांग सुखरूप पार पडली. मला चक्क बहात्तर टक्के मार्क पडले होते. ते कसे पडले यावर माझाही विश्वास बसत नव्हता. कारण पहिलीपासून सत्तरचा आकडा मी कधीच ओलांडला नव्हता. आता पुढे काय हा यक्षप्रश्न पुन्हा उभा राहिला. काय शिकायचे यावर माझ्या मनात काहीही ठरले नव्हते. पण शक्यतो ममा पप्पांपासून दूर यूएसला जावे, असे मात्र वाटत होते. निकालानंतर रीटा मॅमने मला छानशी पार्टी दिली. ममाला वेळ नसल्यामुळे आम्ही दोघेच गेलो होतो. त्या दीड दोन तासात माझ्या मनातील स्वप्न मी मोकळेपणाने मॅमला घडाघडा सांगत होतो. दोन दिवस गेले आणि पप्पांचा फोन आला. ‘मनोज तुझी अॅडमिशन झाली आहे. तुला बीए लिबरल आर्ट्स या कोर्सला घातले आहे. एका डीम्ड युनिव्हर्सिटीने यंदाच हा नवीन कोर्स सुरू केला आहे. रीटा मॅम त्यांच्याकडे एज्युकेशनल कौन्सिलर म्हणून जॉईन झाल्या आहेत. त्याच तुला सगळी माहिती देतील. होस्टेलला राहून करायचे का घरातून ते तू आणि ममा ठरवा.’

नवीन सुरुवात

रात्री ममाला मी हे सगळे सांगितले ते तिला सगळे सरप्राईजच होते. पण माझ्या शिक्षणाचा खर्च पप्पा करणार यामुळे तिला कसलीच चिंता नव्हती. नवीनच स्थापन झालेले हे विद्यापीठ घरापासून खूपच दूर असल्यामुळे मी हॉस्टेलला राहणार असे पहिल्यांदाच ठरवून टाकले. दुबईला जशी विविध प्रांतातून आलेली भारतीय मुले माझ्या शाळेत होती, तोच माहोल या विद्यापीठात होता. फरक एकच होता, वर्गातील ऐंशी टक्के मुले विविध बड्या व्यावसायिकांची किंवा मोठे धंदे करणाऱ्यांची होती. उरलेल्या पैकी काही माझ्यासारखी दुबईला पप्पा आहेत किंवा मर्चंट नेव्ही मध्ये काम करतात अशा बड्या नोकऱ्यातील होती. दिवसातून कधीतरी रीटा मॅम समोर येत असल्यामुळे कॉलेजमध्ये मला परके वाटत नव्हते एवढेच.

अभ्यासातून आनंद हे कळले

का कोणास ठाऊक पण वाचायची, अभ्यासाची चर्चा करायची आवड, मला हळूहळू निर्माण होत गेली. बरोबरच्या विद्यार्थ्यांची गप्पा मारताना इतके नवनवीन विषय समोर येत असत की ज्याबद्दल आजवर कधीच मी ऐकले नव्हते. सरकारी कंत्राटे मिळवायची कशी इथपासून परदेशातून माल इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा करायचा या बाबी सहज कानावर पडत. माझा रूम पार्टनर सुट्टीमध्ये घरी न जाता स्वित्झर्लंडची ट्रिप करून आला. वायएमसीएच्या होस्टेलमधील त्याच्या मुक्कामाच्या चित्तरकथा ऐकून मी थक्क झालो होतो. १९ वर्षांचा मुलगा सोलो ट्रिप करून युरोपमध्ये जाऊन येतो हे थरारक होते. दुसऱ्या एकाचा पियानो आणि चेलो वादनाचा आठवड्यातून तीन दिवस क्लास असे. कॉलेजच्या विषयातील म्युझिक हा विषय त्याने निवडला होता. एक अत्यंत हुशार मुलगा गणिती कोड्यांची शिक्षकांबरोबर चर्चा करताना दिवसभर गढलेला असे. यातून विविध विषयांवरील वाचनाची माझी आवड वाढत गेली. आज वयाच्या तिशीमध्ये माझे मलाच आश्चर्य वाटते की माझ्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये २०० पुस्तके मी जमा केली आहेत. चार वर्षे शिकून हाती लिबरल आर्ट्सची पदवी आली आणि मी लगेच माझ्या स्वप्नपूर्ती करता यूएसला रवाना झालो. मार्केट रिसर्च अँड डेटा अनालिसिस यामध्ये एक मास्टर्सचा अभ्यासक्रम मी पूर्ण केला. माझ्या कॉन्व्होकेशनसाठी ममा व पप्पा दोघेही आले होते.

Story img Loader