डॉ श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. आवडीचा विषय मिळाला आणि ध्येय निश्चित असले की मुले झपाट्याने प्रगती करतात असेच काहीसे लोको पायलट असलेल्या मुलाच्या बाबतीत झाल्याने वडील निश्चिंत होते. त्यात नोकरीतील स्थिरता आणि मान पाहता त्यांनी आनंदाने निर्णय स्वीकारला.
साध्या सरळसोट मध्यमवर्गीय आयुष्याला काही वळण वाटा मिळत जातात तसं काहीस माझ्या आयुष्यात घडेल अस मला कधीच वाटल नव्हत. अवाढव्य मुंबईमध्ये आजोबा आले, तिथेच वडील वाढले, त्या दोघांच्या पुण्याईने मुंबईत कुर्ल्यासारख्या ठिकाणी मला दोन खोल्यांची पाय टेकायला जागा दिली आणि नशिबाने सरकारी नोकरी मिळाली यापेक्षा मराठी माणसाचे भाग्य ते काय? त्यात मुंबईची रहिवासी असलेली घाटकोपरची मुलगी सांगून आली व माझा संसार सुरू झाला. योग्य वेळेस मुलगा झाला. तो व्यवस्थित शिकतोय यात आनंद होता. त्याच्या आईची स्वप्ने तो पूर्ण करेल, का माझ्यासारखा सरकारी बाबू बनेल याची चर्चा आम्ही नवरा बायको करत असतानाच एका दिवशी आमच्या लाडक्याने आम्हा दोघांना मोठाच मानसिक धक्का दिला. रेल्वे इंजिनचा ‘ड्रायव्हर’ बनायचे स्वप्न म्हणे तो लहानपणापासून बघत होता. छोटी छोटी मुले गाडी गाडी खेळताना असली स्वप्न बघतात पण हायस्कूलमध्ये गेल्यावर सुधारतात असा माझा कयास होता. तोही त्याने खोटा पाडला. त्याच्या तेराव्या वाढदिवसाच्या दिवशी आणलेली भेट त्याच्या हाती दिल्यानंतर त्याने ती उघडून सुद्धा पाहिली नाही. का तर म्हणे त्याला इंजिन ‘ड्रायव्हर’ व्हायचे आहे याचा त्याच्या आईला राग आला होता. किशोर वयातील हट्ट म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले व त्याला नेहमीचा बाप म्हणून सल्ला दिला. ‘नीट अभ्यास कर, चांगले मार्क मिळव पुढे काय करायचे ते कर.’
हेही वाचा >>> MPSC मंत्र : अराजपत्रित मुख्य परीक्षा – सामान्य विज्ञान
आमचे चिरंजीव चांगल्या मार्कांनी दहावी झाले, याचा आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला होता. छानशी पार्टी केली आणि लोकलने परत येत असताना त्याने जाहीर केले की, मी डिप्लोमाला प्रवेश घेणार आहे. चला क्लासेसची फी वाचली म्हणून मी सुस्कारा टाकला आणि मुलगा इंजिनीअर होणार यासाठी आईला आनंद झाला. आवडीचा विषय मिळाला की मुले झपाट्याने प्रगती करतात असे बोधवाक्य मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. आमचे चिरंजीवांच्या संदर्भात ते शब्दश: खरे ठरेल असे वाटले नव्हते. आता पाहता डिप्लोमाची तीन वर्षे संपली. कसेबसे मिळणारे ६० टक्के आता ७० चा आकडा ओलांडून गेले. निकालानंतर नोकरी का पुढचे शिक्षण याची चर्चा आम्ही दोघे करत असताना वाढदिवसाच्या दिवशीचा समर प्रसंग घरात पुन्हा उद्भवला.
लोको पायलटची अखिल भारतीय पातळीवरची परीक्षा देण्यासाठी मी अर्ज भरला आहे. मी नोकरी करणार नाही. ती परीक्षा नक्की पास होणार आणि इंजिन ‘ड्रायव्हर’ बनणार असे त्यांनी जाहीर केले. आईचा संताप, नाराजी, अबोला, या कशाचाही त्याच्यावर परिणाम नव्हता. मग, मात्र मी खडबडून जागा झालो.
चौकशीत काय कळले?
एक दिवशी ऑफिसला न जाता अर्धी सुट्टी घेऊन चर्चगेटच्या रेल्वे हेडक्वार्टर्स मध्ये जाऊन पोहोचलो. ही लोको पायलट परीक्षा असते कशी? त्यातनं पगार मिळतो किती? नोकरीचे स्वरूप काय? यावर माझे पूर्ण अज्ञान होते. कधी कोणी इंजिन ‘ड्रायव्हर’ बनले असे ऐकण्यातही नव्हते. सुदैवाने मी सरकारी नोकर आहे हे ऐकून रेल्वे हेडक्वार्टर्सच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने एका तांत्रिकी अधिकाऱ्याकडे मला फोन करून पाठवले. पुढचा अर्धा तास तो जे काही सांगत होता ते सगळे मी अक्षरश: कानात प्राण आणून ऐकत होतो. मला कळल्या त्या काही महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या. चांगला पगार मिळतो. प्रगती अनुभवानंतर, प्रशिक्षण घेत नक्की होते. नोकरी कायम असते. पगारा खेरीज प्रवास भत्ता मिळतो. मला थक्क करणारी शेवटची गोष्ट होती ती म्हणजे निवृत्तीच्या वेळेला समजा तुम्ही मोठ्या महत्त्वाच्या गाडीवर इंजिन ‘ड्रायव्हर’ असाल तर एखाद्या प्राध्यापकासारखा पगार मिळतो. तो मोठाच मान मिळतो. दुसरीकडे लांब बदली झाली तर रेल्वेकडून निवासी खोल्या मिळू शकतात. एकच गोष्ट मला खटकली ती माझ्या नोकरीशी विसंगत होती म्हणून. रोज घरापासून दूर जायचे व फिरत्या वेळानुसार नोकरी करायची. त्या सगळ्या माहिती नंतर माझे तरी मन बरेचसे शांत झाले. घरी येऊन बायकोला हे सांगितले तरी तिला ते पटत नव्हते. मग तिची समजूत पटण्याकरता उगाचच म्हटले, परीक्षेत नापास झाला तर येईल ताळ्यावर. खरे तर घरी येतानाच तो परीक्षा पास व्हावा म्हणून मी देवाला साकडे घालून आलो होतो.
निवड झाल्यानंतर…
लवकरच तो घर सोडून प्रशिक्षणाला दाखल झाला. ते पूर्ण झाल्यावर त्याची नोकरी व पगारही सुरू झाला. वयाच्या २१ व्या वर्षी स्वत:चे तीस हजार मिळवणाऱ्यात त्याचा एकही मित्र नव्हता हे बायकोला जेव्हा कळले तेव्हा तिचे मन थोडेसे शांत झाले. नोकरीची दोन वर्षे झाली आणि ऑफिसमध्ये एके दिवशी त्याचा मला फोन आला. बाबा तुम्हाला पंधरा दिवस आईला घेऊन उत्तर भारतातील स्थल दर्शन मी आखले आहे त्या तारखांचा रजेचा अर्ज आजच द्या आणि मग घरी जा. सगळी रेल्वेची रिझर्वेशन मी करून तुमच्याकडे पाठवत आहे. केवढा मोठा खर्च मुलगा करतो आहे, एसीचा प्रवास कधी न केल्यामुळे या आकड्यांचे दडपण माझ्या मनावर आले होते. तिकिटे आल्यावर मुलाने खुलासा केला हा त्याच्या नोकरीतील हक्काचा भाग असून ही सोय तुम्हाला कायम मिळणार आहे. मुंबई सोडून मला कुठेच नेले नाही ही बायकोची तक्रार आता कायमची मिटणार होती याचाही मला आनंद झाला. आमचा मुलगा इंजिन ‘ड्रायव्हर’ म्हणून छान नोकरी करतो आहे हे आता चाळीत व मंत्रालयातील माझ्या विभागात सगळ्यांना माहिती झाले होते. तो आता त्यांच्या कौतुकाचाही विषय बनला आहे.
(क्रमश:)